सकाळची वेळ! भरपूर कामाचा पसारा, पण दहा मिनिटे रिकामा वेळ होता, काय करायचं? सगळ्या घरात फेऱ्या मारून झाल्या, प्रत्येक खिडकीमधून बाहेर डोकावून झाले, सगळीकडे नवीन काय नजरेला पडते का हे पण पाहून झाले, तरीपण वेळ उरलाच, मग म्हटले चला काहीतरी लिहुयात, म्हणून पेन वही घेतली, पण ना विषय आणि डोक्यात कल्पना, लिहिणार काय माझं कप्पाळ! आणि हे असं विचित्र काहीतरी लिहून ठेवलं…. आणि असल्या लिखाणाला आता व्हाट्सअप वर पाठवणार! आणि मग माझ्या मैत्रिणी मला हरभऱ्याच्या झाडावर चढवायला एकदम तत्पर! त्या म्हणणार, ग्रेट काय मस्त ग.. माझी कॉलर एकदम ताठ 😀 अरे हो कॉलर कुठेय? गाऊन तर आहे अंगावर, मग काय? असं म्हणायला हवं माझा गाउन काय मस्त घेरदार आहे….. स्वतःच्या आकारामुळे तो वाटतोय हे काही भान नाही…. आहे ना गंमत?
चला आता आठ वाजायला आले, सकाळचा ब्रेकफास्ट मिळावा म्हणून घरातील मंडळी चार वेळा इथे डोकावून गेली, बिचारे बोलू, विचारू पण शकत नाहीत. काही विचारलं तर मांजरीसारखे फिसकारेल! अन् मिळणाऱ्या ताज्या नाश्त्याला मुकावे लागेल, बिस्किट टोस्ट किंवा पाव खाऊन रहावे लागेल, ही भीती डोळ्यातून ओसंडून वाहत होती…. तिरक्या डोळ्यांनी त्यांचा भुकेने आणि शंकेने व्याकूळ झालेला चेहरा पाहिला, मनातल्या मनात जरा आनंदाच्या उकळ्या फुटल्या, कसे आता गप्प बसतात? पूर्वी आपण असेच गप्प बसत होतो, आता रोल बदलला…. केवढी वाढली आपली हिम्मत! अगदी मनातल्या मनात आपण काय वट निर्माण केली, इथपासून ते सगळेजण कसे घरातील कोणताही निर्णय घेताना आपल्या तोंडाकडे बघतात … आपला शब्द रास्त मानतात याची पुरेपूर खात्री पटलेली असते….
उगीचच हसू आले मला, हो आपण बदललो आहोत असे वाटते. पण यामध्ये स्वतःचा स्वार्थ कधीच बघितला नाही. याचीही जाणीव आहे. सार्या कुटुंबाला शिस्त लावण्यासाठी
आपल्याला हा असा रणचंडीकेचा अवतार अधून मधून धारण करावाच लागतो. नाहीतर घरातील सगळे जण लगाम नसलेल्या घोड्यासारखे स्वैर उधळतील,
कधीही, केव्हाही बाहेर जावे, मनाला वाटेल तेव्हा घरी यावे, कसलाही, कोणाचाही विचार न करता आवडले ते खाऊन टाकावे. पसारा करून ठेवावा, मन मानेल तेव्हा आंघोळ करावी, हे काही कुटुंब म्हणून राहणाऱ्या घरातील व्यक्तींना शोभत नाही म्हणून ते असे महिन्या दोन महिन्यांनी अवतार धारण करणे गरजेचे असते…..
चला आता बराच वेळ झाला, आता इतका अंत पाहणे बरे नाही…. आता स्वयंपाक घरात जाऊन अन्नपूर्णेचा रोल करणे गरजेचे आहे… बरेच काही लिहावे असे आहे, तूर्तास एवढेच! जरा गंमत हो… नाहीतर निष्कर्ष काढून मोकळे व्हाल? असं आहे तर तिच्या घरात!…
काय? बहुतेक स्वत:पण असेच अवतार कार्य करत असाल ना?
सतत पाऊस पाणी चिखल, आणि ठिकठिकाणी झालेला विध्वंस, आक्रोश वेदना पाहून मनाला विषण्णता आली होती म्हणून जरा असे हलकेफुलके लिहून.. रिलॅक्स होत आहे….