फुटतया रडू
रानातली वस्ती
खोपटापुढं शाळा
घंटा होते…जीव
आत आत गोळा..।।१।।
लहान बहिणी भाऊ
घरात अंध आजी
टोपलंभरुन भाकरी
तूच कर भाजी..।।२।।
आई बा जातात
रोजंदारी वर
कशापायी शाळा?
काम घरचं कर..।।३।।
भावड्याला मात्र म्हणतात
पळ शाळेकडे
नापास गाडी त्याची
जात नाही पुढे..।।४।।
मोती अक्षर माझं
नंबर पहिला आला
तरीही आई म्हणते
दे सोडून शाळा..।।५।।
नको गं आई मला
शाळेतून काढू
सांगताना ही मला
फुटतया रडू..।।६।।