प्रिय प्राणाहुनी जन्मभूमी ही
महाराष्ट्र माझा
त्रिवार वंदन महाराष्ट्रा तुज
जय जय जय गर्जा!।।
उभा पाठिशी कणखर खंबीर
बंधू सह्याद्री
सुखे लाभते भाव भक्तीची
नित्य तया तंद्री
आनंदवन भुवन येथेचि
प्रतापी शिव राजा
त्रिवार वंदन महाराष्ट्रा तुज।१।
सुपीक खडकाळी ही भूमी
सुजला सुफला ही
कृष्णा गोदा भीमा पावन
पवित्र जलवाही
राष्ट्रभक्तीचे वंश नांदती
धन्य देश माझा
त्रिवार वंदन महाराष्ट्रा तुज।२।
टिळकांची स्वातंत्र्यवीरांची
सावरकर यांची
देशभक्तीची ज्योत तेवते
आजही तेजाची
सीमेवरती सज्ज सैन्य हे
विजयी या फौजा
त्रिवार वंदन महाराष्ट्रा तुज ।३।
संतांच्या पदस्पर्शे पावन
वीरप्रसू माती
टाळ मृदुंगासवे तळपती
तलवारी पाती
उच्च संस्कृती न्याय नीती ती
आदर्श येथ प्रजा
त्रिवार वंदन महाराष्ट्रा तुज
जय जय जय गर्जा।४।