घरातलं आवरुन मनीषा धुण्याभांड्याच्या कामासाठी निघाली तशी तिची भाची,सायली तिला म्हणाली
” लवकर येजो आत्या.परवाले माह्या हँपी बर्थडे हाये .मले नवा फराक घेनं हाये ना?”
मनीषा हसली. “हा वं! माह्या ध्यानात हाये. मी आली की जाऊ आपण बाजारले”
मनीषाने जाण्यासाठी चपला पायात अडकवल्या. तशी तिची मुलगी सरला सायलीला म्हणाली
“जाती का वं सायली मां संग? ते वकीलसायेब छोट्या पोराईले चाँकलेट देता”
चाँकलेट म्हणताच सायलीचा चेहरा खुलला. तरी पण तिने विश्वास न बसून मनीषाला विचारलं
” हा वं आत्ये? खरंच चाँकलेट देता?”
” हाव. चलती का मंग?” मनीषाने विचारलं तशी छोट्या सायलीने सरळ चप्पल घातली. मनीषाने तिचा हात धरला आणि दोघीही झोपडपट्टीतल्या छोट्या गल्लीतून चालू लागल्या.
सायली ही मनीषाच्या भावाची मुलगी. भाऊ एका खेड्यात शेतमजुराचं काम करायचा. त्याची बायको चित्रा हीसुद्धा मजुरीला जायची. अख्ख्या गावात चित्रासारखी सुंदर आणि उफाड्याची दुसरी बाई नव्हती. पण गरीबीतलं सौंदर्य शापित असतं असं म्हणतात. गावाच्या पाटलापासून तरण्याताठ्या पोरांचा तिच्यावर डोळा होता. गावापासून जवळच एक साखर कारखाना होता. कारखान्याच्या चेअरमनच्या पोराने एकदा चित्राला पाहिलं आणि वेड लागल्यागत तो तिच्या मागे लागला.” मी लगीन झालेली बाई हाये. मले एक पोरगी बी हाये. तुम्ही माह्या मागे लागू नका “असं चित्राने त्याला निक्षून सांगितलं.पण पोरगा ऐकत नव्हता. एकदा शेतातून परत येत असतांना चेअरमनच्या पोराने तिला गाठलं. तिचा हात धरला.चित्राने आरडाओरड तर केलीच पण पोराच्या थोबाडीत मारली. गोष्ट पोलिसांपर्यंत गेली. ड्युटीवरच्या हवालदाराने चित्राची तक्रार नोंदवून घेतली तर नाहीच उलट तिलाच दमदाटी केली. प्रकरण चिघळलं तसे तालुक्याचे आमदार धावत आले. त्यांनी दोघात समेट घडवून आणला. पुन्हा चित्राच्या वाट्याला जाणार नाही या बोलीवर चेअरमनच्या पोराला सोडून देण्यात आलं. काही दिवस शांततेत गेले. एक दिवस चेअरमनच्या पोराने चित्राच्या नवऱ्याला बेदम दारु पाजली. दारु पिऊन तो बेहोश झाल्यावर त्याला मित्रांच्या मदतीने गावाबाहेरच्या शेतात टाकून दिलं.
रात्री अकरा वाजता गावात सामसुम झाल्यावर चेअरमनचा पोरगा दोन मित्रांसोबत चित्राच्या झोपडीजवळ आला. चित्राने दार उघडताच तिचं तोंड दाबून तिघं आत शिरले. चित्राची पोरगी सायली शांतपणे झोपली होती. तिघांनी आळीपाळीने चित्रावर सामुहिक बलात्कार केला. चित्रा संधी साधून जशी किंचाळली तशी सायलीला जाग आली. समोरचं द्रुश्य पाहून ती थरथर कापू लागली. तशाही परीस्थितीत ती बाहेर येऊन ओरडू लागली. ते ऐकून चित्रानेही ओरडायला सुरुवात केली. त्या ओरडण्याला संतापून चेअरमनच्या पोराने जवळचाच कोयता उचलला आणि चित्रावर सपासप वार करुन चित्राची हत्या केली. एव्हाना सायलीच्या ओरडण्याने आख्खी झोपडपट्टी जागी झाली. चित्राला तसंच रक्तबंबाळ अवस्थेत सोडून चेअरमनचा पोरगा मित्रांसोबत धावत सुटला.
लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण हातातल्या कोयत्याचा धाक दाखवून तो आपल्या गाडीने पळून जाण्यात यशस्वी झाला. जातांना एका पोराने आपल्या मोबाईलवर त्याचा आणि गाडीचा फोटो काढला. चित्राचा नवरा सकाळी घरी आला. ज्यांनी आपल्याला दारु पाजली त्यांनीच आपल्या बायकोवर बलात्कार करुन तिचा खुन केला हे ऐकून त्याला जबरदस्त धक्का बसला. चित्राचा पोस्टमार्टेम नंतर अंत्यविधी झाला तसा चित्राचा नवरा गुपचुप शेताकडे पळाला. तिथे पडलेलं किटकनाशक पिऊन त्याने आत्महत्या केली. सहा वर्षाची सायली अनाथ झाली.वहिनीच्या अंत्यविधीला आलेल्या मनीषाला भावाचाही अंत्यविधी पहावा लागला.
अनाथ झालेल्या भाचीला छातीशी कवटाळून मनीषा शहरात आपल्या घरी आली. सुदैवाने मनीषाचा नवरा चांगल्या स्वभावाचा होता. पण घरात आधीच तीन पोरं होती.त्यात सायलीची भर पडली होती. मनीषाचा नवरा मार्केटमध्ये हमाली करायचा. संसाराला हातभार म्हणून मनीषा चार घरची धुणीभांडी करायची. तीन पोरांना पोसतांना सायलीची अडचणच होणार आहे हे मनीषाही जाणून होती. पण आपल्या घासातला घास ती पोरक्या झालेल्या सायलीला भरवत होती.
सायलीला घेऊन ती वकीलसाहेबांच्या घरी आली. या बंगल्यात काम करायला मनीषाला खुप आवडायचं. वकिलसाहेबाची बायको खडूस असली तरी वकीलसाहेब दिलदार होता. दर दिवाळीला साडीचोळी तर मिळायचीच शिवाय बोनस आणि पगारवाढही असायची. वकीलसाहेब गरीबीतून वर आला होता असं ती ऐकून होती. वकीलसाहेबांना लहान मुलं फार आवडायची. तीची मुलं तिच्यासोबत असली की हमखास चाँकलेट नाहीतर काहीतरी खाऊ मिळायचा. मुलं खुष होऊन जायची. त्यांची स्वतःची मुलं मोठी होऊन मुंबईत शिकत होती. आज सायलीची बडबड ऐकून ते बाहेर येतील आणि सायलीला चाँकलेट देतील असं तिला वाटून गेलं. झालंही तसंच. थोड्याच वेळात ते बाहेर आले.
“कोण ही बडबड करणारी गोड मुलगी?”त्यांनी विचारलं.
“माह्या भावाची पोरगी हाये”
” अस्सं!काय नाव बेटा तुझं?”
” सायली” सायली लाजून म्हणाली
” अरे व्वा!छान नाव आहे. शाळेत जातेस का?”
” हाव. पयलीत हाये”
“वा छान! चाँकलेट आवडतं का तुला?”
सायलीने खुश होऊन जोरजोरात मान हलवली. वकिलसाहेब आत गेले. एक मोठं कँडबरी चाँकलेट घेऊन आले. ते एवढं मोठं, महागडं चाँकलेट पाहून सायली हरखली. असं चाँकलेट तिने फक्त टिव्हीवर पाहिलं होतं. तिच्या हातात चाँकलेट देऊन वकीलसाहेब आत जाणार तेवढ्यात सायली एकदम म्हणाली “माह्या नं परवाले हँपी बर्थडे हाये.आत्या मले फराक घीसन देणार हाये” वकीलसाहेब जोरात हसले. मनीषाला म्हणाले.
“मनीषाताई परवा हीला घेऊन या माझ्याकडे.मी तिला गिफ्ट देईन. काय सायली हवं ना गिफ्ट?”
सायलीचा चेहरा एकदम उजळला. तिने हसून जोरजोरात मान हलवली. वकीलसाहेब आत निघून गेले. सायली चाँकलेटकडे हसऱ्या चेहऱ्याने पाहू लागली. भाचीला खुश पाहून मनीषालाही आनंद झाला. वकीलसाहेब आत गेले तेव्हा त्यांचे तीन असिस्टंट त्यांचीच वाट बघत होते. वकीलसाहेबांनी डायरी उघडून आजच्या खटल्यांवर नजर टाकली. असिस्टंटना सुचना करुन त्यांना आँफिसमध्ये भेटायला सांगितलं. दोन खटल्यात त्यांना स्वतःला आर्ग्युमेंट करायचं होतं. एकंदरीत आजचा दिवस व्यग्र असला तरी काळजीचा नव्हता.
वकीलसाहेब म्हणजे अँड.रत्नाकर नाईक आज जिल्ह्यातले नावाजलेले वकील होते.जिल्ह्यातच नव्हे तर हायकोर्टातही त्यांचं चांगलंच वजन होतं. अतिशय बुध्दीमान,अभ्यासू, धुर्त, चाणाक्ष नाईकसाहेबांकडे केस दिली आणि ते हरले असं कधीच होत नव्हतं. किंबहुना त्यांचं नाव ऐकलं की विरोधी पक्षकारांचे वकील थरथर कापायचे. आपण हरणार हे त्यांना अगोदरच समजून जायचं इतका त्यांचा दरारा होता. त्यांनी आर्ग्युमेंट सुरु केलं की न्यायाधीशही मंत्रमुग्ध व्हायचे. त्यांचे मुद्दे खोडून काढणं इतर वकीलांना अतिशय कठीण जायचं.
आज मिळत असलेली किर्ती नाईकसाहेबांना सहजासहजी मिळालेली नव्हती. त्यांचं बालपण अतिशय गरीबीत गेलं होतं. ते फक्त दोन वर्षांचे असतांना त्यांचे वडील कसल्याशा आजाराने वारले. आई अशिक्षित. मुलगा गेला म्हणून सासरच्यांनी तिला हाकलून दिलेलं. माहेरही दरीद्री. झोपडपट्टीत शेजारी राहणाऱ्या भाजीवालीकडून तिने भाजी विकायचा व्यवसाय शिकून घेतला. भल्यापहाटे उठून मार्केटला जायचं. लिलावात विकत घेतलेली भाजी टोपलीत घालून ती जड टोपली डोक्यावर ठेवायची आणि उन्हातान्हात गल्लोगल्ली फिरायचं. दुपारी घरी येऊन शेजारपाजारच्या झोपड्यात खेळणाऱ्या छोट्या रत्नाकरला स्वयंपाक करुन खाऊ घालायचं.
दुपारनंतर परत गल्लोगल्ली फिरायचं असा तिचा रोजचा दिनक्रम. पोराने शिकून मोठं व्हावं ही त्या माऊलीची इच्छा. रत्नाकर नगरपालिकेच्या शाळेत जाऊ लागला. शाळेची अवस्था भयंकर होती. भिंतींचा रंग उडालेला. पावसामुळे त्यांना ओल आलेली. जागोजागी फरशी उखडलेली. तुटलेले बाक. असं असूनही रत्नाकरला ती शाळा आवडायची. झोपडपट्टीतल्या नरकात जगण्यापेक्षा दिवसातले पाच तास इथे घालवायला त्याला आवडायचे.मुळातच बुध्दिमान असलेला रत्नाकर शाळेत पहिला येऊ लागला.हे ऐकलं की त्याच्या आईचं ह्रदय अभिमानाने भरुन यायचं. आपला लेक नक्की मोठा साहेब होणार याची तिला खात्री वाटू लागली. सगळं ठिक चाललं असतांना रत्नाकरच्या आईला दम्याचा आजार जडला. रात्रीबेरात्री खोकून खोकून तिचा जीव अर्धमेला व्हायचा.
ती उठून खोकत बसली की आईच्या वेदनांनी छोटा रत्नाकर कासावीस व्हायचा. तिला पाणी दे, तीची पाठ चोळ इतकं करुनही तिला आराम पडला नाही की त्याला रडू यायचं. हतबल होऊन तो आईजवळ रात्ररात्र बसून रहायचा. सकाळी अवजड भाजीची टोपली घेऊन गल्लोगल्ली फिरतांना आईचा दम निघायचा. खोकल्याची उबळ आली की तिला चालणं मुश्कील व्हायचं. आईला आता काम करणं शक्य नाही हे छोट्या रत्नाकरच्या लक्षात आलं. झोपडपट्टीतल्या एका माणसाने रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे त्याला कामाला लावून दिलं. सकाळी शाळा आणि दुपारी ठेकेदाराकडे रस्ते खोदायचं काम रत्नाकर करु लागला. त्याची आई आता भाजीची टोपली घेऊन भाजीबाजारात बसू लागली.
दम्यामुळे तिथं बसणंही तिला असह्य व्हायचं पण रत्नाकरसाठी तरी तिला काहीतरी कमवणं आवश्यक होतं. रत्नाकरला पुढे पैसे लागतील म्हणून ती स्वस्ताची औषधं आणायची. कुणी काही देशी उपाय सांगितले की ते करुन पहायची ज्यांचा काही उपयोग व्हायचा नाही. रत्नाकर दहावीला असतांना थंडीच्या दिवसात ऐके दिवशी पहाटे रत्नाकरची आई खोकत खोकतच मरुन गेली. रत्नाकर पोरका झाला. आईला अग्नी देतांना तो मनातून पेटून उठला. आपल्याला मोठा साहेब करण्याचं आईचं स्वप्न पुर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही असा निश्चयच त्याने केला.
दहावीच्या परीक्षेत तो पुर्ण शहरातून पहिला आला. सगळे त्याचं अभिनंदन करत असतांना तो मात्र आईचा फोटो हातात धरुन ढसाढसा रडत होता. कुण्या भल्या माणसाने त्याला काँलेजला अकरावीत अँडमिशन घेऊन दिली. रस्त्याचं काम सोडवून एका फँक्टरीत नोकरीही मिळवून दिली. एकदा शेजारच्या घरात टिव्हीवर त्याने सिनेमातला कोर्टरुम ड्रामा पाहिला. त्यातल्या वकीलाचा रुबाब, त्याचे संवाद, प्रतिपक्षाला कोंडीत पकडण्यासाठी त्याने खेळलेल्या चाली पाहून रत्नाकरने ठरवलं व्हायचं तर वकीलच व्हायचं.
गोरगरीबांना न्याय मिळवून द्यायचा. गरीबांची पिळवणूक करणाऱ्या श्रीमंत लोकांना तुरुंगाची हवा खायला लावायची. त्याने चौकशी केली आणि बारावीत चांगले मार्क्स मिळवून लाँ काँलेजला अँडमिशन घेतली. पण आता फँक्टरीत जाणं मुश्किल होतं म्हणून ती नोकरी सोडून त्याने एक आँटोरिक्षा भाड्याने घेतली. दिवसा काँलेज आणि रात्री रिक्षा चालवणं सुरु झालं.एल.एल.बी.झाल्यावर त्याने एका वकीलाकडे त्याचा असिस्टंट म्हणून काम सुरु केलं. वकीलाकडे येणारे गरीब पक्षकार आपली मोलमजुरी सोडून दिवसभर कोर्टात बसून रहायचे. दर तारखेला वकीलांना पैसे देतांना त्यांच्या चेहऱ्यावरचे दिनवाणे भाव पाहून रत्नाकरला गहिवरुन यायचं तर श्रीमंत पक्षकारांपुढे वकीलांना गोगलगाय होतांना पाहून त्याला चीड यायची.
पुरेसा अनुभव आणि सनद मिळाल्यावर रत्नाकरने स्वतंत्र वकीली करायचा निर्णय घेतला. उरात होतं गरीबांना न्याय मिळवून देण्याचं आणि गुन्हेगारांना फासावर लटकवण्याचं ध्येय. खोट्या आणि लबाड लोकांच्या केसेस घ्यायच्या नाहीत हा त्याने निर्धार केला होता. पण या निर्णयामुळे एक वर्षातच उपासमार होऊ लागली. बाकीच्या वकीलांमध्ये तो हसण्याचा आणि टिंगलटवाळीचा विषय होऊ लागला. काहीजणांनी तर त्याला वकीली सोडून परत रिक्षा चालवण्याचा सल्ला देऊन टाकला. रत्नाकरला निराशा येऊ लागली. त्याच्या मनात आत्महत्येचे विचार घोळू लागले. दिवसभर तो वकीलाचा कोट घालून कोर्टात बसायचा पण कुणी त्याच्याकडे ढुंकून पहात नव्हतं. त्याच्यासोबतच वकील झालेल्या मित्रांकडे तीन तीन चार चार केसेस होत्या.
निराश होऊन तो एक दिवस ज्या वकिलांकडे असिस्टंट म्हणून काम करत होता त्यांच्याकडे गेला. काहीतरी काम देण्याची विनंती केली. वकील हसले. मग म्हणाले “माझ्याकडे सध्या आधीच खुप असिस्टंट्स आहेत. त्यामुळे तुझ्याकरता काहीच काम नाही. मात्र माझ्याकडे एक छोटी केस आहे. पहा तुला तुझ्या तत्वात बसत असेल तर. “वकीलांच्या चेहऱ्यावरचं छद्मी हास्य पाहूनच त्याला केसबद्दल अंदाज येत होता. तरीही त्याने ती नाईलाजाने स्विकारली.
केसचा अभ्यास केल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याचा पक्षकार सरळसरळ समोरच्या पार्टीची फसवणूक करत होता. केस फेकून द्यावी असं त्याला वाटत होतं पण वर्षभराची बेकारी त्याला ती केस घेण्यासाठी विनंतीआर्जव करत होती. शेवटी लाचारीचा विजय झाला. त्याने ती स्विकारली आणि जिंकूनही दाखवली. त्याच्या पक्षकाराने त्याला खुष होऊन पार्टी तर दिलीच शिवाय त्याच्या बदमाश मित्रांच्या केसेसही आणून दिल्या. रत्नाकरने त्याही जिंकून दिल्या.हळूहळू रत्नाकर गुन्हेगारांचा, अपराध्यांचा, भ्रष्ट सरकारी अधिकारी, पुढाऱ्यांचा,करचुकव्या व्यापारी आणि उद्योजकांचा वकील म्हणून नावारुपाला येऊ लागला.
रत्नाकर त्यांच्याकडून मनमानी फी उकळायचा. तेही कितीही पैसे खर्च करायला तयार असायचे. रत्नाकरची वकीली जोरदार सुरु झाली.झोपडपट्टीत आख्खं आयुष्य काढलेल्या रत्नाकरचा थोड्याच वर्षात बंगला उभा राहिला. फोर व्हिलर झाली. रत्नाकरची प्रगती पाहून एका सिनीयर वकीलाने त्याच्या सुंदर,उच्चशिक्षित मुलीचं लग्नं रत्नाकरशी लावून दिलं. रत्नाकरने आता आपल्या तत्वांना तिलांजली दिली होती. भरपूर फी मिळवून देणाऱ्या कोणत्याही केसेस तो स्विकारु लागला. केसेस वाढू लागल्या. डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्टच्या चकरा वाढू लागल्या. मोठमोठे नेते, पुढारी, उद्योजक त्याच्या आँफिसमध्ये नंबर लावून बसू लागले.
रत्नाकरचा संसारही वाढू लागला. दोन मुलं झाली. पुण्यामुंबईत करोडोंचे फ्लँट झाले. गावाकडे शंभर एकर शेती झाली. बँक बँलन्स अनेक पटींनी वाढला. या सगळ्या प्रवासात रत्नाकरचं लहान मुलांबद्दलचं प्रेम तसुभरही कमी झालं नाही. आपलं बालपण जसं गरीबीमुळे करपलं तसं इतर मुलांचं करपू नये असं त्याला वाटायचं. त्यामुळे मुलांच्या वाढदिवसाला झोपडपट्टीतल्या मुलांना जेवणं देणं. शाळातल्या गरीब मुलांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप करणं, बालसुधारगृहांना देणग्या देणं नेहमी चालू असायचं.
वकीलसाहेबांच्या घरुन निघालेली मनीषा सायलीला घेऊन बाजारात गेली. रेडिमेड कपड्यांच्या दुकानात ती सायलीसाठी फ्राँक पाहू लागली. पण स्वस्तातला एकही फ्राँक सायलीला पसंत पडत नव्हता. शेवटी सेल्समनने कंटाळून तिला भारीतला फ्राँक दाखवला. सायलीला तो एकदम आवडून गेला. मनीषालाही तो आवडला.
“हावं आत्या हाच फराक पाहिजे मले” सायली उड्या मारत म्हणाली
“कितीचा हाये हा फ्राँक?” मनीषाने सेल्समनला विचारलं
“फक्त एकवीसशे रुपये”
मनीषाच्या डोळ्यासमोर तारे चमकले. तिची पुर्ण महिन्याची कमाई तेवढीच होती. “बापा बापा एकवीसशे?? नका दादा, मले दुसरा फ्राँक दाखवा”
“नाही आत्या मले हाच फराक पाहिजे” सायली रडक्या आवाजात म्हणाली.
“तू चुप वं. इतले पैसे नाही ना वं माह्याकडे. दादा तुम्ही दुसरे फ्राँक दाखाडा”
“नही नं आत्ये मले तोच फराक पाहिजे” सायली पाय आपटत म्हणाली. सेल्समनने तो फ्राँक ठेवून दुसरे फ्राँक दाखवायला सुरुवात केली. पण सायली त्यांच्याकडे ढुंकून बघत नव्हती. ती आता रडायला लागली.
“मले तोच फराक पाहिजे आत्ये” तिचं एकच पालुपद सुरु होतं मनीषा विचारात पडली.
त्या आईबापाविना पोरीचं मन दुखावणं तिच्या जीवावर आलं होतं. पण संपूर्ण महिन्याची कमाई एका फ्राँकावर उधळून लावण्याची तिची ऐपत नव्हती. तिच्या मुली आता बऱ्यापैकी मोठ्या झाल्या होत्या. त्यांनासुद्धा तिनशेच्यावर ती ड्रेस घेत नसे. शिवाय पाहूणेरावळे, आजारपण असे घरचे खर्च पेलतांना ती मेटाकुटीला यायची. एकवीसशे रुपये एका फ्राँकवर खर्च केल्यावर घरात होणारी अडचण तिच्या लक्षात आली आणि तिने निर्णय घेतला.
“सायली तुले तो फ्राँक काही मिळणार नाही.हा बघ हा बी चांगला हाये”
“मले तोच फराक पाहिजे” सायली रडतरडत म्हणाली. मनीषाला आता संताप आला. तिने सायलीच्या पाठीत एक धपाटा मारला आणि तिचा हात धरुन ती दुकानाबाहेर पडली. घरी येईपर्यंत सायली रडत होती आणि तिला खेचतखेचत उदास मनाने मनीषा डोळ्यातून अश्रू गाळत होती.
वाढदिवसाच्या दिवशी मनीषा सायलीला घेऊन वकीलसाहेबांकडे गेली.आज ते सायलीला गिफ्ट देणार होते.त्यांच्या गिफ्टमुळे तरी हिरमुसलेली सायली खुष होऊन जाईल आणि तो फ्राँक विसरुन जाईल अशी तिला आशा वाटत होती.ती भांडी घासत असतांना सायली तिला वकीलसाहेब केव्हा गिफ्ट देणार आहे याबद्दल विचारुन भंडावून सोडत होती.मनीषा तिला उडत उडत उत्तरं देत होती.खरं तर तिचे डोळे दाराकडे लागले होते.कधी एकदा दार उघडतं आणि वकीलसाहेब बाहेर येऊन सायलीला गिफ्ट देतात असं तिला झालं होतं.पण तिचे कपडे धुवून झाले तरी दार बंदच राहिलं.तिने सायलीकडे पाहिलं,ती रडवेली दिसत होती.
“कवा देणार आहे वं आत्ये मले गिफ्ट?” तिनं विचारलं तशी मनीषाच्या मनाची घालमेल सुरु झाली. मनाचा हिय्या करुन तिने दाराची कडी वाजवली. दार उघडून नोकर बाहेर आला
“काय झालं? काय पाहिजे?”
“दादा ते वकीलसाहेब हायेत का?”
“नाही. ते कोर्टात गेलेत. आज वकील संघाची निवडणूक आहे. साहेब बहुतेक अध्यक्ष होणार आहेत. आज साहेब खुप बिझी आहेत भेटणार नाहीत.”
निराशेचा डोंगर मनीषावर कोसळला
” का काही कामं होतं का साहेबांकडे?” नोकराने विचारलं
” या पोरीचा आज वाढदिवस हाये.साहेब तिला आज गिफ्ट देणार होते”
नोकर हसला. तिच्याजवळ येऊन हळू आवाजात म्हणाला
“अहो ताई ही मोठी माणसं. दुसऱ्यांकडून “गिफ्ट” घेणारी. आपल्यासारख्या गरीबांना ती गिफ्ट देणार व्हय? त्यातून साहेब लुच्च्या, लफंग्यांचे, बनेल पुढाऱ्यांचे वकील. ते काय तुम्हांला गिफ्ट देणार?”
तो मोठ्याने हसला पण मनीषा हसली नाही. तिनं सायलीकडे पाहिलं. तिचा रडवेला चेहरा पाहून तिला गहिवरुन आलं. तीचा हात धरुन ती तरातरा बाहेर आली. “आत्ये ते सायेब मले गिफ्ट देणार हाये ना?” सायली तिला विचारत होती पण तिला उत्तर द्यायची मनीषाला हिम्मत होत नव्हती.
संध्याकाळी सायलीला घरीच ठेवून ती बाजारात गेली. तीनशे रुपयांचा एक बऱ्यापैकी फ्राँक घेऊन आली. सायलीला ओवाळून झाल्यावर तो फ्राँक सायलीला दिला. सायलीला तो आवडणार नव्हताच पण आत्याने काहीतरी गिफ्ट आणलं हे पाहून ते बालमन थोडंफार खुश झालं. मनीषाने गाडीवरचं आईस्क्रीम सगळ्यांसाठी आणलं होतं ते खाऊन सायली समाधान झाल्यासारखी वाटली.
दुसऱ्या दिवशी तिने सायलीला काही वकीलसाहेबांकडे नेलं नाही. तिला गिफ्टची आठवण येईल आणि ती भंडावून सोडेल अशी तिला भिती वाटत होती. चौथ्या दिवशी मात्र सायली हट्ट करुन तिच्यासोबत आली. बंगल्याचं गेट उघडून जशी ती आत शिरली वकीलसाहेब अचानक दार उघडून बाहेर आले.तिला आणि सायलीला पाहून म्हणाले
“अहो मनीषाताई या मुलीचा वाढदिवस आहे ना या एक दोन दिवसात?”
मनीषा संतापली पण मनावर नियंत्रण ठेवून म्हणाली
” झाला तिचा वाढदिवस. तीन दिवस झाले “
” अरे बापरे!कामाकामात मी विसरुनच गेलो. अहो मी तिच्यासाठी गिफ्ट आणलंय. चला आत मला तिला द्यायचंय”
आनंदाचा एक धक्का मनीषाला बसला. सायलीला घेऊन ती आत गेली. ते आलिशान सुंदर घर ती पहिल्यांदाच आतून बघत होती.
” बसा ” सोफ्याकडे हात दाखवत वकीलसाहेब म्हणाले. पण मनीषा खाली गालीच्यावर बसली.
” अहो वर बसा ना! संकोचू नका “
ती संकोचूनच सोफ्यावर बसली. ते घर बघून भांबावलेली सायली तिला बिलगून बसली
” अरे शाम ते गिफ्ट घेऊन ये रे “
नोकर दोन बाँक्सेस घेऊन आला.
” ये बेटा जवळ ये.” वकीलसाहेबांनी सायलीला जवळ बोलावलं. सायली संकोचत, लाजत त्यांच्याजवळ गेली. वकीलसाहेबांनी एक बाँक्स उघडून त्यातून एक फ्राँक बाहेर काढला तो फ्राँक पहाताच सायली आनंदाने ओरडली
” आत्ये हा तोच फराक आहे ना?”
मनीषाने पाहिलं. हो! हा तोच तर महागडा फ्राँक होता जो सायलीला आवडला होता पण मनीषा तो महाग असल्याने घेऊ शकली नव्हती. मनीषाचं मन आनंदाने भरुन गेलं. “अरे तुम्ही अगोदर पाहिला होता वाटतं हा फ्राँक?” वकीलसाहेबांनी आश्चर्यचकीत होऊन विचारलं. सायलीने खुश होऊन मान हलवली
” काय योगायोग बघा. मलाही तोच आवडला म्हणून घेऊन आलो. बरं तुम्हांला आवडला ना? नाहीतर दुसरा घेऊन येऊ”वकीलसाहेबांनी विचारलं
” नाही नाही. लय आवडला “मनीषा घाईघाईने म्हणाली.
” आणि ही मिठाई ” एक किलो मिठाईचा बाँक्स मनीषाच्या हातात देत वकीलसाहेब म्हणाले.
मनीषा आणि सायली दोघी त्या गिफ्टकडे हरखून पहात असतांनाच वकीलसाहेबांनी विचारलं
” मनीषाताई सायली तुमच्याचकडे असते का? तिचे आईवडील कुठे असतात? नाही म्हणजे बऱ्याच दिवसापासून तिला बघतोय म्हणून विचारलं”
वकीलसाहेबांनी जखमेवरची खपली काढली होती. ती जखम भळाभळा वाहू लागली. मनीषाने त्यांना तिच्या दुर्देवी भाऊभावजयीची कहाणी सांगायला सुरुवात केली. ती कहाणी सांगत असतांना वकीलसाहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव सारखे बदलत होते. त्यांची नजर सारखी त्या निरागस, गोड सायलीवर जात होती. मनीषाने कहाणी संपवली. बोलताबोलता तिचा कंठ दाटून आला होता.
डोळ्यातून अश्रू वहात होते. तिला तसं रडतांना पाहून आईच्या खुनाची प्रत्यक्ष साक्षीदार असलेली सायली कावरीबावरी होऊन मनीषाला बिलगली आणि रडू लागली. तिला तसं रडतांना पाहून गुन्हेगारांचे वकीलपत्र घेणाऱ्या,अपराध्यांचे खटले लढवून जिंकणाऱ्या, निर्ढावलेल्या वकीलसाहेबांच्या काळजाला असंख्य भोकं पडली. ते उठून सायलीजवळ गेले आणि तिला जवळ घेऊन म्हणाले
” नको रडू बेटा. हा मामा आहे ना तुझा. तुला काहीच कमी पडू देणार नाही” मग मनीषाकडे वळून म्हणाले
” मनीषाताई तुम्ही काहीच काळजी करु नका. आजपासून सायली माझी जबाबदारी आहे. आपण तिला चांगल्या शाळेत टाकू. तिला चांगलं शिक्षण देऊ. तिच्या लग्नापर्यंतचा सगळा खर्च माझ्याकडे लागला. जशी ती तुमची भाची आहे तशी आजपासून माझीही भाची “
मनीषा थक्क होऊन ते ऐकत होती. तिचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तिने सायलीकडे पाहिलं. सायलीला सख्खा मामा नव्हता. आज मिळालेल्या नवीन मामाला ती बिलगून बसली होती. तिचं रडणं थांबलं होतं. डोळ्यात मामाबद्दलचा विश्वास दिसत होता.
दोघी निघून गेल्यावर वकीलसाहेब घाईघाईने आपल्या स्टडीरुममध्ये आले. टेबलवर पडलेली फाईल त्यांनी उघडली. हो. हीच तर ती फाईल होती. सायलीच्या आईवर बलात्कार करुन तिचा खुन करणाऱ्या नराधमांची. तीन दिवसांपुर्वीच साखर कारखान्याच्या चेअरमनचा खास माणूस ती देऊन गेला होता. चेअरमन स्वतःही आँफिसमध्ये येऊन भेटून गेले होते. वकीलसाहेबांनी सगळं प्रकरण वाचून वकीलपत्र घेणार की नाही याबद्दलचा निर्णय राखून ठेवला होता. प्रकरण वाचून त्यांच्या लक्षात आलं होतं की सगळे पुरावे चेअरमनच्या मुलाच्या विरोधात असले तरी काही बारीक सारीक मुद्दे होते ज्यामुळे चेअरमनचा मुलगा निर्दोष सुटू शकला असता.
असे लुप होल्स शोधण्यात वकीलसाहेब फार हुशार होते. म्हणून तर आजपर्यंत एकही खटला ते हरले नव्हते. त्यांना हेही माहित होतं की ही केस कोणताही वकील हातात घेणार नाही. फक्त तेच ही केस हाताळू शकतात आणि जिंकूही शकतात.
आज चेअरमनचा फोन येणार होता. त्यांना काय सांगायचं हा प्रश्न होता. वकीलसाहेबांनी एक मोठा श्वास घेऊन सोडला. त्यांचा निर्णय पक्का झाला होता.
मोबाईल वाजला. चेअरमनचाच फोन होता.
” नमस्कार वकीलसाहेब मी चेअरमन बोलतोय”
” नमस्कार साहेब,बोला “
” मग ठरलं ना? घेताय ना आमचं वकीलपत्र?”
” नाही साहेब. साँरी मी तुमच्या केसला वेळ नाही देऊ शकणार”
” काय म्हणता काय? वकीलसाहेब तुम्ही कितीही पैसे घ्या पण माझ्या मुलाला यातून सोडवा. मला खात्री आहे फक्त तुम्हीच त्याला सोडवू शकता”
” साँरी साहेब”
“मी तुम्हांला पाच लाख देईन”
” नाही साहेब “
” वीस लाख”
” साँरी साहेब “
” पन्नास लाख “
” साहेब सगळे साक्षी,पुरावे तुमच्या मुलाविरुध्द आहेत.त्याचं वाचणं कठीण आहे “
” वकीलसाहेब असे कितीतरी गुन्हेगार तुम्ही सोडवले आहेत”
” साहेब माझ्याकडे आज दोन हजारांपेक्षा जास्त केसेस आहेत. कसा वेळ देऊ मी तुमच्या केसला?”
” वकीलसाहेब तुम्ही पैशासाठी काहीही करु शकता हे मला चांगलं माहित आहे आणि कोणत्या केसला किती महत्व द्यायचं, किती वेळ द्यायचा हे माझ्यापेक्षा तुम्हांला जास्त समजतं. त्यामुळे तुम्हांला काहीच अवघड नाहिये”
” चेअरमनसाहेब मी जरी क्रिमीनल लाँयर असलो तरी मी माझ्या पक्षकारांशी प्रामाणिक आहे. फक्त पैशांसाठी मी गरीब पक्षकारांवर अन्याय होऊ देत नाही, देणारही नाही “
क्षणभर शांतता पसरली. मग चेअरमनचा आवाज आला.
” तुम्हांला एक कोटी चालतील साहेब?”
ते ऐकून वकीलसाहेबांचा श्वास थांबला. एक कोटीची रक्कम काही मामुली रक्कम नव्हती. त्या रकमेत अर्धी जगप्रदक्षिणा नक्कीच झाली असती. कोण कुठली धुणीभांडी करणाऱ्या बाईची भाची.
तिच्यासाठी एक कोटी रुपयांवर पाणी सोडणं त्यांच्या व्यवहारात नक्कीच बसत नव्हतं. वकीलसाहेबांचं डोकं चक्रावलं. काय निर्णय घ्यावा ते समजेना. मोह विवेकावर भारी पडू लागला होता. दुसऱ्या क्षणाला गोड, निरागस सायलीचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर तरळून गेला.आणि तिच्या आईवडिलांच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या आणि तिचं बालपण करपून टाकणाऱ्या नराधमांचा त्यांना संताप येऊ लागला. नाही. त्या गोड पोरीवर ते अन्याय होऊ देणार नव्हते.
” साँरी साहेब, तुम्ही एक कोटी काय दहा कोटी दिले तरी मी तुमची केस घेऊ शकत नाही. तुम्ही दुसरा वकील पहा ” आणि त्यांनी रागाने फोन बंद केला.
बराच वेळ त्यांचा श्वास वरखाली होत राहिला. नंतर मात्र अतीव समाधानाने त्यांचा चेहरा फुलून गेला. बऱ्याच वर्षांनी सद्गुणी, सज्जन रत्नाकर जागा झाला होता. त्यांची नजर भिंतीवर लावलेल्या आईच्या फोटोवर गेली. समाधानाचं स्मित जणू त्या माऊलीच्या चेहऱ्यातून व्यक्त होत होतं. त्यांनी ठरवलं सायलीच्या आईच्या खुन्यांना फासावर लटकवल्याखेरीज आता शांत बसायचं नाही. त्या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फक्त सायली होती. तिला सांभाळणं गरजेचं होतं. कोर्टात सायलीच्या साक्षीची गरज भासली तर ते तिच्या बाजूने लढणार होते.
आज वकीलसाहेबांनी सायलीला एक सोडून तीन गिफ्ट दिले होते. तिला सुंदर फ्राँक तर दिलाच होता पण तिच्या पालनपोषणाची जबाबदारी स्विकारुन दुसरं गिफ्ट दिलं होतं. तिसरं गिफ्ट तर फारच महत्वाचं होतं. तिच्या आईवडिलांच्या म्रुत्युला कारणीभुत ठरलेल्या नराधमांना फासावर लटकवण्याच्या मार्गावर त्यांचा स्वतःचा मोठा अडथळा होता. तो आज त्यांनी दुर केला होता.त्यासाठी त्यांनी एक कोटी रुपयांवर पाणी सोडलं होतं. कालांतराने सायलीला हे सर्व माहित होणार होतं. आज मात्र ती त्यांनी घेतलेल्या फ्राँक वरच खुप खुश होती.