एका पेशंटच्या दाढेची ट्रिटमेंट झाल्यावर सुबोधने दुसऱ्या पेशंटला खुर्चीत बसायला सांगितलं.त्याच्या दाढांचं तो निरीक्षण करीत असतांनाच रिसेप्शनिस्ट काचेचा दरवाजा ढकलून आत आली. “सर ते मनोहर पाटील नावाचे पेशंट आहेत ना, ते म्हणताहेत की आता त्यांच्याकडे फक्त एक हजार आहेत. बाकीचे दोन हजार पुढच्या आठवड्यात आणून देणार म्हणताहेत”
सुबोधला याच गोष्टीची चिड होती. कपड्यांवरुन तर पेशंट चांगला सधन दिसत होता. शिवाय तो नेहमी कारने येतो हेही त्यानं पाहिलं होतं. बरं त्यांना अगोदरच तीन हजार खर्च येणार असल्याची कल्पना दिली होती. तरी सुध्दा त्यांनी पैसे आणू नयेत याचा त्याला संताप आला. प्राँब्लेम हा होता की तिथं जमलेल्या पेशंटच्या गर्दीसमोर असं त्यांना संतापून बोलणंही त्याच्याबद्दल पेशंटच्या मनात असणाऱ्या प्रतिमेला छेद देणारं होतं. त्याने नरमाईने घ्यायचं ठरवलं.
“ठिक आहे. त्यांचा मोबाईल नंबर लिहून घे आणि त्यांना सांग पुढच्या आठवड्यात नक्की आणून द्या” रिसेप्शनिस्ट गेली. तो आपल्या कामाला लागला पण मनातली ती खदखद काही कमी होईना. खरं पहाता तो शहरातला सगळ्यात यशस्वी दंतवैद्य होता.गरीबीची जाण असल्यामुळे त्याने आपली फी माफक ठेवली होती. कामात तर तो निष्णात होताच. वर मिठास बोलणं.त्यामुळे तो सर्वांना डाँक्टरपेक्षा आपला मित्रच वाटायचा. अर्थातच त्याचा दवाखाना कायम पेशंटने तुडूंब भरलेला असायचा. सकाळी नऊ पासून ते रात्री दहापर्यंत त्याचं काम चालायचं. महिन्याला दहा लाखाच्या आसपास त्याची कमाई होती.लोकांनी त्याची उधारी बुडवली नसती तर हीच कमाई अकरा बारा लाखापर्यंत गेली असती.
दुपारी दोन वाजता त्याने काम थांबवलं. त्याला आणि स्टाफलाही भुक लागली होती. पंधरा मिनिटात त्याने जेवण संपवलं कारण बाहेर पेशंट ताटकळत बसले होते. बेसिनमध्ये हात धुत असतांनाच मोबाईल वाजला. हात कोरडे करुन त्याने तो घेतला.
“हँलो सुबोध मी चंदन बोलतोय. फ्री आहेस ना? जरा बोलायचं होतं” पलीकडून आवाज आला
“आताच जेवून हात पुसतोय बघ. बोल काय म्हणतोस?”
“अरे जरा घराचं काम सुरु केलंय. दोनतीन लाखाची मदत केलीस तर बरं होईल”
“चंदन यार, मी तुझ्या पाया पडतो. तू दुसरं काहीही माग. माझ्या घरी सहकुटुंब रहायला ये. खाणंपिणं सगळं मी करीन. पण प्लीज यार मला पैसे मागू नकोस. तुला सांगतो ज्यांनीज्यांनी माझ्याकडून उधार पैसे नेलेत त्यांनी ते मला कधीच परत केले नाहीत. तीसचाळीस लाख माझे लोकांकडे अडकलेत. पैसे द्यायचं कुणी नावच काढत नाही “सुबोध उसळून म्हणाला
“अरे पण मी तुझा मित्र आहे. तुझे पैसे बुडवेन असं तुला वाटलंच कसं?”
” मित्र?अरे बाबा मित्र तर मित्र माझे भाऊ,बहिणी,मेव्हणे,काका,मामा ,सासरे सगळ्यांना पैसे देऊन बसलोय.एक रुपया मला परत मिळाला नाही. मिळालं ते फक्त टेंशन,मनस्ताप आणि शिव्या.पैसे मागितले तर म्हणतात ‘ तुम्हांला काय कमी आहे ,पैसा धो धो वाहतोय.पैसे देणारच आहोत ,बुडवणार थोडीच आहे! ‘. तुला जर वाटत असेल की आपली मैत्री कायम रहावी तर प्लीज मला पैसे मागू नकोस.हा पैसा सगळे संबंध खराब करतो बघ”
समोरुन फोन कट झाला. तो रागानेच कट केला असणार हे त्याच्या लक्षात आलं. त्याने परत आपलं काम सुरु केलं पण त्याच्या मनातून तो विषय जाईना. उधारीचे पैसे परत का मिळत नाही हे विचारायला मागे तो एका ज्योतिष्याकडे गेला होता. ज्योतिषाने त्यांची कुंडली पहाताच त्याला सांगितलं. “दुसरं काही सांगण्याच्या आत एक गोष्ट सांगतो.तुम्ही कुणालाही उधार पैसे देऊ नका.उधारीचे पैसे तुम्हांला कधीही परत मिळणार नाहीत. तुमचे भाऊबहिण, साले,मेव्हणे,जवळचे नातेवाईक, मित्र सगळेच तुमचे पैसे बुडवतील. तसंच कुणालाही जामीन राहू नका त्यातही तुम्हीच फसाल. तुमच्या कुंडलीतले योगच तसे आहेत”
“याला काही उपाय?”त्याने विचारलं होतं. ज्योतिषाने नकारार्थी मान हलवली.
“उपायापेक्षा बचाव केव्हाही चांगला. कोणी कितीही कळकळीने पैसे मागितले तरी द्यायचे नाहीत. संबंध खराब झाले तरी चालतील कारण पैसे देऊनही संबंध खराबच होणार आहेत किंवा मग पैसे द्यायचे आणि ते दिले आहेत हेच विसरुन जायचं म्हणजे टेंशनचं कामच नाही. तुमच्या नशिबात पैसा भरपूर आहे. तेव्हा पैसा बुडाल्यामुळे तुम्हांला फारसं जाणवणार नाही.”
ही गोष्ट खरी होती.त्याच्याकडे पैसा येतांना दिसत होता म्हणून तर लोक मागत होते आणि तो बुडवल्यामुळे त्याला काही फरक पडणार नाही म्हणून निर्लज्जपणे बुडवत होते. तेव्हापासून त्याने पैसे उधार देणं बंद केलं होतं. पण दवाखान्यातली उधारी त्याला काही बंद करता आली नाही.
रविवार उजाडला. खरं तर रविवारीही त्याचा दवाखाना बंद नसायचा. असिस्टंट डाँक्टर्स काम करत असायचे. सुबोधही एखाद दुसरी चक्कर टाकायचा. आज मात्र त्याला साठ किलोमीटरवरच्या एका खेड्यातल्या लग्नाला जायचं होतं म्हणून तो दवाखान्यात जाणार नव्हता. खेड्यातली लग्नं विशेष म्हणजे त्यातलं जमीनीवर बसून केलेलं जेवण त्याला फार आवडायचं. लहानपणीच्या आठवणी त्यानिमित्ताने जाग्या व्हायच्या. देशविदेशात अनेक महागड्या हाँटेल्समध्ये तो जेवला होता पण या जेवणातली त्रुप्ती त्याला कधीही तिथं मिळाली नव्हती.
लग्न आणि लग्नातलं जेवण आटोपून तो आपल्या आलिशान कारमधून घरी परतायला निघाला. त्याच्या शहरापासून साधारण पंचवीस किमी.अंतरावर असतांना त्याला दुरुनच एक माणूस येणाऱ्या वाहनांना थांबवण्यासाठी हात देतांना दिसला. पण वाहनं न थांबता त्याला वळसा घालून जात होती. जसा सुबोध त्याच्याजवळ आला त्याला दिसलं की रस्त्यावर त्या माणसाशेजारीच एक बाईक आणि माणूसही पडला आहे. सुबोधला रहावलं नाही त्याने त्याच्याजवळ गाडी थांबवली.
“काय झालं?” खिडकीची काच खाली करुन त्याने विचारलं
“दादा अँक्सीडंट झालाय. पोराला दवाखान्यात न्यावं लागीन”
वयाची सत्तरी उलटलेला तो म्हातारा सांगू लागला
“एक मिनीट थांबा” त्याने गाडी साईडला घेतली
“अहो कशाला या भानगडीत पडता. एक तर रविवार मिळतो तर घरी चलून आराम करा ना” बायको त्राग्याने म्हणाली.
तिच्याकडे दुर्लक्ष करुन तो खाली उतरला आणि म्हाताऱ्याकडे गेला.
“कसं आणि केव्हा झालं हे?”
“दादा म्या आणि पोरगा गावाकडे जात होतो. ट्रकवाल्याने मागून धडक मारली आणि पळून गेला. म्या झाडीत फेकल्या गेलो म्हुन मले काही झालं नाई पण पोराच्या अंगावरुन ट्रक गेला” म्हातारा आता रडू लागला. सुबोधने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माणसाकडे नजर टाकली. बापरे! प्रकरण गंभीर दिसत होतं. तो पटकन खाली वाकला. आणि त्याची नाडी तपासली.नाडी सुरु होती. पटकन अँक्शन घेतली तर वाचूही शकला असता. त्याने उठून म्हाताऱ्याकडे पाहिलं. तो हात जोडून उभा होता.डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
“दादा अर्ध्या तासापासून गाड्यांना हात देऊ लागलो. कुणीच थांबत नाही. पोराला दवाखान्यात घेऊन चला दादा तुमचे लई उपकार होतीन” सुबोधने क्षणभर विचार केला. मग त्याने झटकन चेंदामेंदा झालेल्या खटारा बाईकला रस्त्याच्या बाजुला टाकलं. मग म्हाताऱ्याच्या मदतीने त्याने त्याच्या पोराला गाडीच्या मागच्या सीटवर टाकलं. त्याच्या शेजारीच म्हाताऱ्याला बसवून स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून त्याने गाडी सुसाट सोडली. गाडी चालवतच त्याने मोबाईल काढला. शहरात अँक्सीडंट हाँस्पिटल असलेल्या डाँक्टर मित्राला त्याने फोन लावला.
“शेखर सुबोध बोलतोय. इमर्जन्सी केस आहे. दवाखान्याबाहेर स्ट्रेचर तयार ठेव. ओ.टी. तयार ठेव. मी ब्लडबँकेला रक्त तयार ठेवायला सांगतो. पंधरावीस बाटल्या रक्त लागणार आहे. मी वीस पंचवीस मिनिटात पेशंटला घेऊन पोहोचतोय”
“सुबोध अरे आज रविवार आहे आणि अँक्सिडंटची केस असेल तर पोलिसांना…”
“मी करतो सगळं मँनेज. तू फक्त तयार रहा. आणि तुझ्यासारखाच माझाही रविवार आहे. सो प्लीज बी फास्ट. माझ्या जवळच्या नातेवाईकाची केस आहे असं समज”
याच शेखरला सुबोधने हाँस्पिटलच्या उभारणीसाठी पाच लाख उधार दिले होते. शेखरने त्याला फक्त दोन लाख परत केले होते.पण या उधारीवर बोलण्याची ही वेळ नाही याची जाणीव सुबोधला होती.
शेखर दिलेल्या शब्दाला जागला. त्याने खरोखरच सगळी तयारी करुन ठेवली होती. त्या म्हाताऱ्याला बाहेरच बसवून त्याच्या पोराला आँपरेशन थिएटरमध्ये तो घेऊन गेला. रक्तदाब झपाट्याने कमी होत असल्यामुळे ब्लड ग्रुप तपासून त्याने रक्ताच्या बाटल्या मागवल्या. सुदैवाने ब्लड बँंकेत ओ पाँझिटिव्हचा भरपूर साठा होता. एक्सरेतून कमरेचं, खांद्याचं, उजव्या पायाचं हाड तुटल्याचं त्याच्या लक्षात आलं. तिन्ही ठिकाणी आँपरेशनची गरज होती.
तातडीने हालचाल केल्यामुळे पेशंट धोक्याबाहेर असल्याचं थोड्यावेळाने सुबोधला शेखरने सांगितलं तेव्हा सुबोधला एकदम हायसं वाटलं. त्याने बाहेर येऊन म्हाताऱ्याला सांगितलं तेव्हा म्हातारा त्याच्या पाया पडू लागला. सुबोधने लगेच त्याचे हात धरले.
“देवाचे आभार माना काका, त्यानेच तुमच्या मुलाला वाचवलं. बरं घरी कळवलं की नाही?”
“दादा पोराकडेच मोबाईल व्हता तोबी तुटी गेला. कसं कळवू?”
“अरे बापरे! मग आता?”
म्हाताऱ्याने खिशातून एक छोटी मळकट डायरी काढली. त्याच्यातून छोटू या नावाचा नंबर त्याने सुबोधला दाखवला.
“याले फोन करा”
“हे कोण?”
“धाकला पोरगा हाये”
“ओके” सुबोधने स्वतःच्या मोबाईलवरुन तो फोन डायल केला. अपघाताची तीव्रता त्याने सौम्य भाषेत सांगितली. ‘काळजी करु नका’ असं तीनतीनवेळा सांगितलं.
“दादा किती दिवस लागतीन आणि किती पैसे लागतीन हो?”
म्हाताऱ्याने विचारलं. त्याच्या प्रश्नातल्या काळजीने सुबोधचं काळीज हललं. म्हाताऱ्याची काळजी खरंच समजण्यासारखी होती.
आजकाल डाँक्टरकडे पेशंटला अँडमिट करणं म्हणजे कसायाच्या हातात बकरी सोपवण्यासारखं होतं. आपण डाँक्टर असल्यामुळे शेखरने अजून पैशाची मागणी केलेली नाही नाहीतर रक्ताची बाटली लावण्यापुर्वीच शेखरने पन्नाससाठ हजार जमा करायला लावले असते हे काय तो जाणत नव्हता?
“काका डाँक्टरांनी अजून तरी काही सांगितलं नाहिये पण महिनाभर तरी तुमच्या मुलाला इथं रहावं लागेल हे नक्की. पैशाचं मी विचारुन सांगतो. डाँक्टरसाहेब माझे मित्र आहेत. तुमच्या घरची मंडळी येईस्तोवर तुम्हांला कुणी पैसे मागणार नाहीत. पण घरच्यांना पन्नाससाठ हजार तरी आणायला सांगा”
म्हाताऱ्याचा चेहरा काळवंडला. त्याने सुबोधला परत फोन लावायला सांगितला. मग तो बाहेर जाऊन आपल्या मुलाशी बोलत बसला.सुबोधचं एकदम आपल्या बायकोकडे लक्ष गेलं. ती रागाने त्याच्याचकडे पहात होती. “अजून संपलंच नाही का? अहो संध्याकाळ झालीये. पोरं आपली वाट पहाताहेत.झालं ना?. पार पाडलं तुम्ही तुमचं कर्तव्य? आता तरी चला” ती वैतागून म्हणाली. तिचंही म्हणणं योग्यच होतं. ती स्वतः फिजीओथेरपिस्ट होती. सुबोध इतकी तिची प्रँक्टिस नसली तरी तिलाही फुरसत रविवारीच मिळायची.
“साँरी साँरी. बस एकच मिनिट हं शमा. शेखरला मी सांगून येतो” तो आत गेला. शेखरकडून अपडेट्स घेऊन आणि गरज भासल्यास बोलवायचं सांगून तो बाहेर आला. म्हाताऱ्याला आपलं कार्ड देऊन म्हणाला”काका मला आता अर्जंटली घरी जायचंय. हे माझं कार्ड असू द्या. काही गरज लागली तर मला फोन करा. तुमची मंडळी येतीलच थोड्या वेळात”. म्हाताऱ्याने हात जोडले. सुबोध बायकोला घेऊन निघाला.
“गाडी बघितली का? मागचं सीट आणि दारं रक्ताने भरलीत. तुम्हालाच काहो इतकी उठाठेव असते? जणू माणुसकी फक्त तुमच्यातच उरलीये” ती नाराजीच्या सुरात म्हणाली. तो फक्त हसला.तिच्याशी वाद घालायची त्याची इच्छा नव्हती
“आणि काहो या शेखरलाच तुम्ही पाच लाख दिले होते ना? दिले का त्याने ते परत?”
“दोन लाख दिलेत. तीन बाकी आहेत. देईल लवकरच बाकीचे”
“आता तुमचं येणं होईलच. मागून घ्या सगळे. काय बाई लोक असतात. सात आठ वर्षांपूर्वी घेतलेले पैसे अजून परत करत नाही माणूस” ‘तुझ्या भावानेही तर सात लाख नेलेत. एक रुपया तरी परत केला का?’ असं विचारायचं त्याच्या अगदी ओठावर आलं होतं पण तो चुप बसला. शेवटी भाऊ आणि मित्रात फरक असतोच ना?
या घटनेनंतर सुबोध परत आपल्या दवाखान्यात व्यस्त होऊन गेला. दहाबारा दिवसांनी त्याला शेखरचा फोन आला
“सुबोध तू आणलेला तो अँक्सीडंट झालेला पेशंट, शामराव पाटील, अरे त्याचं आँपरेशन करायचंय पण त्याचे नातेवाईक पैसे संपले असं म्हणताहेत.काय करु?”
“त्यांनी काहीच पैसे दिले नाहीत का?”
“एक लाख दिलेत पण एक लाखात काय होतंय? तीन आँपरेशन्स होती त्याची त्यातलं कमरेच्या हाडाचं केलं मी. हाताचं आणि पायाचं बाकी आहे. मेडिकल इंश्युरंसदेखील नाहीये त्यांचा” एक क्षण सुबोधला वाटलं, झटकून टाकावी जबाबदारी. माणुसकीखातर आपण त्या माणसाला दवाखान्यात पोहचवलं. पैशाचं मँटर शेखरने पहावं, आपला काय संबंध? नसेल देत पैसे तर हाकलून दे दवाखान्याबाहेर. पण तो असं करु शकणार नव्हता. नव्हे त्याचा तो स्वभावच नव्हता म्हणूनच तर लोकं त्याला आजपर्यंत फसवत आले होते.
“साधारण किती पैसे लागतील शेखर पुर्ण ट्रिटमेंट, रुमचं भाडं, मेडिसीन्स वगैरेला?”
“अडिच लाखाच्या आसपास”
“ठिक आहे तू कर आँपरेशन. बाकीच्या दिड लाखाचं काय करायचं ते बघतो मी “तो मनाविरुद्ध बोलून गेला. मग त्याने रिसेप्शनिस्टला बोलावून सांगितलं
“ज्या ज्या पेशंटकडे पैसे बाकी असतील त्यांना फोन कर आणि बाकी लवकरात लवकर पे करायला सांग”
रात्री तो दवाखाना बंद करुन घरी गेला. ज्या ज्या लोकांना त्यानं पैसे उधार दिले होते त्यांची लिस्ट केली. मग बायकोच्या नातेवाईकांना सोडून सगळ्यांना फोन लावायला सुरुवात केली. म्रुत्युच्या दाढेत असलेल्या एका मित्राच्या उपचारासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचं सांगून ताबडतोब पैसे देण्याची विनंती केली. पण कुणालाच त्याच्या मित्राच्या जीवाशी देणंघेणं नव्हतं. सगळेच पैसे न देण्याचे बहाणे सांगत होते. त्याच्याच पैशासाठी त्याला भीक मागावी लागत होती आणि घेणारे त्याला खेळवत होते. थकून त्याने फोन ठेवला. ज्या लोकांना दुसऱ्याच्या प्राणांचीही पर्वा नाही त्यांच्या अनावश्यक गरजांसाठी आपण उसने पैसे द्यावेत याचा त्याला भयंकर संताप आला. स्वतःला शिव्या देतच तो झोपायला गेला.
दुसऱ्या दिवशी परत शेखरचा फोन आला.त्याला काय उत्तर द्यावं या विचारात असतांनाच त्याला एक कल्पना सुचली.फोन उचलून तो म्हणाला “शेखर असं कर ना,तुझ्याकडे माझे तीन लाख बाकी आहेत.त्यातले दिड लाख तू वापरुन घे.दिड लाख तू मला पुढच्या वर्षी दिले तरी चालतील” पलीकडे एकदम शांतता पसरली. मग क्षणभराने शेखर म्हणाला “ते पैसे नंतर दिले असते मी सुबोध. तुला तर माहितच आहे माझ्या आसपास बरेच अँक्सीडंट हाँस्पिटल आहेत त्यामुळे माझी कमाई काही तुझ्याइतकी नाही आणि ओळखपाळख नसलेल्या लोकांसाठी तू तरी का स्वतःचे पैसे वाया घालवतोय? करतील ते त्यांचं कसंही. तुला वाटतं का ते तुला पैसे परत करतील म्हणून?”
“मग तू मला फोनच का केला? हाकलून द्यायचं असतं त्यांना. झक मारुन आणले असते त्यांनी पैसे”
सुबोध चिडून म्हंटला तशी शेखरची बोलती बंद झाली. मग सुबोधच नरमाईच्या सुरात म्हणाला
“हे बघ शेखर सात आठ वर्ष झालीत तुला पैसे देऊन. मी कधी तुला बोललो? कधी तुला पैसे मागितले? आताही मी तुला तीन लाख मागत नाहीये. शामरावसाठी जे वरचे दिड लाख अजून लागताहेत तेच फक्त मी तुला मागतोय”
शेखरने लवकर उत्तर दिलं नाही. मग म्हणाला “ठिक आहे करतो मी अँडजस्ट.पण मला दोन वर्षतरी पैसे मागू नकोस”
“ओके. डन. आणि तुला सांगू का शेखर, मला हा परोपकाराचा आणि मदतीचा किडा चावलाय म्हणून मी उठसुठ कुणालाही मदत करत असतो. काय करु स्वभावच आहे माझा. कुणाचं दुःख पहावल्या जात नाही माझ्याकडून. नाही तर तुला एका फटक्यात पाच लाख कशाला काढून दिले असते मी?”
ही मात्रा बरोबर लागू होणार होती. शेखर शब्दही काढू शकला नाही. एक महिन्यानंतर सुबोधला शेखरचा फोन आला. शामराव पाटीलला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळणार होता. शामराव आणि त्याच्या कुटूंबाची सुबोधची भेट घेण्याची इच्छा होती.’त्यांना तुझ्या घरी पाठवू की क्लिनिकमध्ये’असं विचारत होता. सुबोधने त्याला तो स्वतः शेखरच्या हाँस्पिटलमध्ये येत असल्याचं सांगितलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच सुबोध शेखरच्या हाँस्पिटलमध्ये पोहचला. शामरावच्या हाताला आणि पायाला अजूनही प्लास्टर होतं. त्याच्याभोवती बसलेलं त्याचं कुटुंब सुबोधला पहाताच उठून उभे राहिले. शामरावच्या वडिलांनी हात जोडले तर धाकटा भाऊ पाया पडायला लागला. सुबोधने त्याला उठवलं तर तो रडायला लागला.
“डाँक्टर साहेब तुमचे खुप उपकार आहेत. तुमच्यामुळे माझा भाऊ आज आम्हांला डोळ्यासमोर दिसतोय”
“अरे बाबा मी निमित्त आहे. त्या देवानेच हे घडवून आणलं”
“दादा तुमीच आमचे देव” शामरावचे वडील म्हणाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वहात होते” दादा दादा समद्या नातेवाईकाकडे भीक मागत फिरलो. एकानेबी एक रुपया काढून देला न्हाई. आणि तुमी ना आमच्या जातीचे ना पातीचे, ना नात्यातले ना गोत्यातले. आम्हांले ओळखतबी न्हाई तरी तुम्ही दिड लाख काढून दिले. मंग सांगा तुमी देव नाही तर काय आमचे. सुनबाई पाया पड या दादांच्या. त्यांच्यामुळे तुह्यं कुकू साबुत हाये”
शामरावाची बायको पाया पडायला लागली तसा सुबोध एकदम बाजुला होत म्हणाला “अहो नको नको.शामरावांची काळजी घ्या. नवीन जन्म मिळालाय त्यांना”
“डाँक्टरसाहेब तुमचे पैसे व्याजासहीत आम्ही लवकरच परत करु”शामरावचा भाऊ म्हणाला
“अरे व्याज कमावण्यासाठी थोडीच मी तुम्हांला पैसे दिले. आणि मला काही घाई नाही. तुमच्या फुरसतीने पैसे परत करा. शामरावांना चांगलं ठणठणीत बरं होऊ द्या मग परत करा. ओके? बरं मी निघू? काळजी घ्या”
त्या सर्वांना नमस्कार करुन सुबोध बाहेर पडला. मगाशी “पैसे परत केले नाही तरी हरकत नाही” हे ओठावर आलेलं वाक्य बोलू दिलं नाही याबद्दल त्याने देवाचे आभार मानले.
सहा सात महिने झाले तरी शामरावच्या भावाचा फोन आला नाही तेव्हा सुबोधच्या लक्षात आलं की ही उधारीही आपली बुडाली आहे. त्याच्याकडे शामरावच्या भावाचा फोन नंबर होता पण का कुणास ठाऊक त्याला फोन लावून पैसे मागायला त्याचं मन धजावेना. शामराव शेतकरी होता. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या तो वर्तमानपत्रात वाचत होताच. आपण पैशासाठी तगादा लावावा आणि शामरावाने त्या काळजीपोटी आत्महत्या केली तर? त्या विचाराने तो शहारायचा. ‘जाऊ दे. देतील तेव्हा देतील. नाही दिले तर नेहमीप्रमाणे बुडले असं समजून घेऊ’ या विचाराने तो चुप बसला.
एक दिवस तो सकाळी क्लिनीकमध्ये येऊन बसला. नेहमीप्रमाणेच पेशंटनी दवाखाना तुडूंब भरला होता. देवाच्या फोटोची पुजा करुन पहिल्या पेशंटला तो आत बोलावणार तेवढ्यात रिसेप्शनिस्ट दरवाजा ढकलून आत आली.
“सर ते सोयगांव बुद्रुकची माणसं आलीहेत. तुम्हांला फक्त भेटायचं म्हणताहेत”
“सोयगांव बुद्रूक?”त्याच्या डोक्यात काही प्रकाश पडेना
“काय नाव त्यांचं?”
“शामराव पाटील “
एकदम त्याच्या लक्षात आलं
“ओके ओके पाठव त्यांना”
शामराव आणि त्याचे वडील आत आले
“नमस्कार डाँक्टर साहेब” शामराव हात जोडून म्हणाला
“या या नमस्कार. अरे वा ठणठणीत बरे झालेले दिसताय”
“साहेब सगळी तुमची क्रुपा आहे “सुबोधचे हात हातात घेत शामराव म्हणाला. सुबोध हसला. न बोलता त्याने देवाचे फोटोकडे हात केला आणि हात जोडले
“कर्ता करविता तो आहे” त्याने असं म्हंटल्यावर त्या दोघांनीही देवाला हात जोडले
“बोला. सगळं ठिक आहे ना?”
“दादा तुमचे पैसे द्यायला आलतो” म्हातारा म्हणाला आणि त्याने शामरावाला इशारा केला. तसं शामरावाने खिशातून पैसे काढून टेबलवर ठेवले. सुबोध डोळे विस्फारुन त्या पैशांकडे बघत राहिला. आजपर्यंत त्याने अनेक जणांना त्यांच्या संकटसमयी पैशाची मदत केली होती. पण कुणीही त्याला अनेक वेळा मागुनही इमानदारीने पैसे आणून दिले नव्हते. किंबहूना परतच केले नव्हते. काम झालं की लोक उपकार विसरतात हेच तो आजपर्यंत पहात आला होता.” याला म्हणतात उपकाराची खरी जाण” त्या पैशांकडे बघत त्याच्या मनात विचारलं.
“मोजून घ्या डाँक्टरसाहेब.पुर्ण दिड लाख आहेत.”
“राहू द्या. तुमच्यावर विश्वास आहे माझा. खुप खुप धन्यवाद” असं म्हणत सुबोधने ते पैसे ड्राँवरमध्ये टाकले.
“चला येऊ दादा?” म्हातारा हात जोडत म्हणाला
“अहो थांबा. चहा घेऊन जा”
सुबोधने रिसेप्शनिस्टला बोलावून तीन चहा पाठवायला सांगितलं.
“काय म्हणतं यंदाच पीक पाणी? चांगलं उत्पादन झालेलं दिसतंय”
सुबोधने असं म्हणताच दोघांचे चेहरे काळवंडले.
“साहेब शेतकऱ्याचं नशीब इतकं कुठं चांगलं आहे? तीन वर्षात झालं नाही असं जोरदार पीक यंदा झालं होतं. पण कापणीला आलेलं सगळं पीक अवकाळी पावसानं खराब करुन टाकलं” शामराव म्हणाला. सुबोधने पाहीलं म्हातारा उपरण्याने भरुन आलेले डोळे पुसत होता.
“अरे बापरे! बरोबर. पंधरा दिवसापूर्वी तीन चार दिवस पाऊस वेड्यासारखा कोसळत होता. आता हे काय पावसाचे दिवस आहेत?”
मग अचानक काहीतरी सुचून त्याने विचारलं “हंगाम पुर्ण वाया गेला म्हणताय मग हे पैसे कुठून आणलेत? सावकाराकडून?”
दोघा बापलेकांनी एकमेकांकडे पाहिलं. काहीतरी नजरांनी इशारे केले.
“नाही साहेब. तुम्ही …तुम्ही काही बोलू नका. मी काही सांगणार नाही”
शामराव गडबडीने म्हणाला “अहो सांगा ना!मी तुमच्या घरचाच आहे असं समजा. सांगा, सांगा”
शामराव चुप बसला. पण म्हातारा बोलू लागला. “दादा नातीच्या लग्नासाठी पैपै करुन साठवले होते पैसे. शाम्याचा अँक्सीडंट झाला. लई पैसे त्यात खर्च झाले. आधीच बँकेचं कर्ज. सावकारही समोर उभा करेना. शेतीचा तुकडा विकला तवा दवाखान्याचे पैसे भरता आले. पण काई घोर नव्हता. पीक पाणी उत्तम होतं. त्याचा पैसा आला की नातीचं लग्न उरकवून टाकू असं ठरवलं होतं. पण पावसाने समदं शेत उजाडून टाकलं. तुमचे पैसे तर द्यायचे होते. म्या म्हनलं नातीचं लग्न पुढे ढकलू पण डाँक्टर साहेबांचे पैसे द्यावेच लागतीन…”
सुबोधला धक्का बसला. त्याचे वडिलही शेतकरीच होते. त्यांचे शेतीसाठी झालेले हाल त्याला आठवले.
“मग आता कधी होईल तिचं लग्न? आणि त्यासाठी कुठून आणणार पैसे?”
दोघा बापलेकांनी परत एकदा एकमेकांकडे पाहिलं. मग शामराव म्हणाला
“बघू साहेब. पुढच्या वर्षी करु तिचं लग्न”
“मुलाकडचे तयार आहेत का?”
“नाही तयार झाले तर सोडून देऊ हे स्थळ. दुसरा मुलगा पाहू” शामराव हे म्हंटला खरा पण त्याचे भरुन आलेले डोळे सुबोधच्या नजरेतून सुटले नाहीत. त्याने क्षणभर विचार केला आणि ड्राँवरमधून दिड लाख काढून शामरावसमोर ठेवले
” हे घ्या शामराव. मुलीचं लग्न पुढे ढकलू नका”
दोघंही एकदम गडबडले. शामराव उठून उभा राहीला. त्याने ते पैसे उचलून सुबोधच्या हातात कोंबले “नाही साहेब. याकरीताच मी तुम्हांला काही सांगत नव्हतो. पण आमच्या बाबांना काही रहावलं गेलं नाही. हे पैसे तुम्हांला घ्यावेच लागतील. शपथ आहे तुम्हांला.आणि आम्ही आता निघतो”
दोघंही जायला लागले तसं सुबोधने शामरावचा हात धरुन त्याला खाली बसवलं “शामराव ऐका माझं.तुमची मुलगी म्हणजे माझी मुलगी. माझ्या मुलीचं लग्न असं लांबणीवर टाकलेलं मला आवडणार नाही. हे पैसे ठेवा. मला पुढच्या वर्षी द्या. दोन वर्षांनी द्या. मी कुठे आताच मागतोय पैसे”
“नाही दादा. शेतीचा काय भरंवसा. दोनतीन वर्ष तुमचे पैसे देणं जमलं नाही तर आमाले घास गिळवणार नाही. तुम्हाले हे पैसे ठेवणंच पडीन” म्हातारा म्हणाला
“ठिक आहे. नका देऊ मला पैसे” सुबोध एकदम बोलून गेला “मला गरज नाही या पैशाची. देवक्रुपेने माझ्याकडे भरपूर आहे.”
दोघा बापलेकांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. मग दोघांचे चेहरे नाराजीने भरुन गेले.
“डाँक्टर साहेब तुम्ही मला जीवन दिलं. तुमच्याकडूनच पैसे घ्यायचं पाप मी कसं करु?”
“शामराव हे पैसे मी तुम्हांला देतच नाहिये. माझ्या मुलीला देतोय “त्याच्या हातात पैसे कोंबत सुबोध म्हणाला. हातातले पैसे शामराव बघत राहिला आणि मग एकदम बांध फुटल्यासारखा ढसाढसा रडू लागला. सुबोध खुर्चीतून उठून पुढे आला. शामरावला जवळ घेऊन त्याच्या पाठीवर थोपटत राहिला. चहा आला. तो पिऊन दोघांनी त्याला नमस्कार केला आणि निघाले
“साहेब मुलीच्या लग्नाला या बरं. मी लवकरच पत्रिका घेऊन येतो. आणि तुम्ही आशिर्वाद दिल्याशिवाय मी तिला सासरी पाठवणार नाही. तेव्हा जरुर जरुर या”
दोघं गेले. सुबोध परत आपल्या खुर्चीत बसून विचार करु लागला. ज्योतिषी म्हंटला होता ते परत एकदा खरं ठरलं होतं. त्याची उधारी परत एकदा बुडीत खात्यात गेली होती. पण यावेळी ती बुडायला तो स्वतःच जबाबदार होता. पण गंमत अशी होती की यावेळी त्याची त्याला ना खंत होती ना राग. उलट समाधानाने त्याचं मन भरुन आलं होतं.