कोरोना काळात अनेक वेगवेगळे अनुभव प्रत्येकाला आले. प्रत्येकाने आर्थिक समस्या तर झेलल्याच आहे. त्यावेळेत सौभाग्याने अनेक गरजू लोकांची मला मदत करता आली, ही माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे. आणि त्यादरम्यान नागपूरला, माझ्या रहात्या शहरी, रस्यावर राहणारे अंदाजे किती गरीब लोकं आहे याचा अनुभव आला. बघायला गेलो तर बहुतेक हि संख्या लाखाच्या घरात सहज जाईल. नागपूर हे शहर खुप मोठं आहे. त्यामुळे असे रस्यावर राहणारे लोकांची संख्यासुद्धा जास्तच आहे. त्याकाळात आम्ही, म्हणजे मी आणि माझे काही मित्र अन्न, पाणी आणि गरजू वस्तूंचं वाटप या गरीबांमध्ये करत होतो. एप्रिलचा महिना आणि नागपूरची गर्मी! अश्या स्थितीत हे लाॅकडाउन. मला प्रश्नच पडायचा की, हे लोकं कसे राहतात या अवस्थेत? बहुतेक जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती!
असंच एकदा नागपूरच्या प्रताप नगरला मला नेहमी एक गरीब दिसायचा, मला त्याची आठवण झाली आणि त्याला अन्न, पाणी आणि इतर गोष्टी त्याला मिळतात आहे का हे बघायला मी गेलो. तो नेहमी दिसायचा तो तिथेच बसलेला मला आढळला. तो दोन रस्त्याच्या मधल्या दुभाजकावर बसलेला असतो. एक खुप जुना कोट, कानाला माकड टोपी, पायात फाटके जोडे, तोंडात नेहमी एक बीडी आणि त्याच्यासोबत एक गाठोडं आणि एक पिशवी. मी त्याला बघितलं आणि त्याच्या जवळ गेलो. त्याला विचारलं, “काका, जेवले का?” तो हिंदीत बोलला, “परसों खाया था।“ म्हणजे तो उपाशी आहे हे कळलं. त्याला लगेच मी माझ्याजवळ असलेल्या दोन अन्नाच्या थैल्या दिल्या. “खाना है। खा लेना।“, मी त्याला म्हटलं आणि पुढे निघालो. मग पुढे काही दिवस सतत त्याला ही अन्नाची थैली देत राहीलो. एक दिवस जेव्हा सगळेच रस्ते सुनसान झाले तेव्हा त्याने मला विचारलं, “सब लोग कहां मर गये? कोई दिख नहीं रहा।“ मग त्याला जी परिस्थिती आहे ती सांगितली. ते ऐकून तो हसला आणि म्हणाला, “यह जिंदगी ही एक बीमारी है। एक दिन सबको मारेगी। तो यह विषाणू से क्या डरना?” आणि तो हासला. मग म्हणे, “पर जिंदगी मिली हैं, तो उसे पुरा जीना यहीं इस बीमारी का इलाज है। चाहे जैसा जीना पडे।“
तो जे त्या दिवशी बोलला ते आजपण कानात फिरत असतं. आयुष्य मिळालं आहे तर ते पुर्ण जगलं पाहीजे. मग ते कसं ही का नसो. आज अनेकांवर अनेक संकटं, परिस्थिती, वेळ येते जेव्हा अनेक लोकं हताश, निराश होऊन जातात. आयुष्यात काहीच उरलं नाही आहे किंवा आहे ती स्थिती ते हाताळू शकत नाही, म्हणून आत्महत्येस प्रेरित होतात आणि आयुष्य ससंपवतात. हा मुर्खपणा आहे. पण तरी काही लोकं हेच करतात. अशी काही बातमी वृत्तपत्रातून किंवा समाज माध्यमांवर ऐकली किंवा आपल्याच ओळखीच्याने हे पाऊल उचललं असं कळलं की, मला हे गरीब लोकं आठवतात. यांच्याजवळ पैसा नाही, डोक्यावर छत नाही, कोणी विचारणारं नाही, खायला दोन वेळचं अन्न नाही, कोणतंच सुख नाही. तरीसुद्धा हे लोकं जगतात. रोज भीक मागतात. तरी देखील स्वतःला संपवायचा मार्ग नाही अवलंबवत. मग ज्यांच्या जवळ काहीतरी तर आहे फक्त परिस्थिती अवघड आहे, ते लोकं का असा मृत्यूचा मार्ग वापरतात? आणि अश्या लोकांमध्ये तर काही धनवान लोकं देखील आढळून येतात. आश्चर्य आहे. म्हणून मला कधी कधी ह्या रस्त्यांवर राहणाऱ्या गरीबात अमीर लोकं दिसतात. हे गरीबातले अमीर लोकं आहे.
तुम्हाला काय वाटतं?