बालपणी वाड्यातलं कुठलंच घर परकं नव्हतं. पण पौगंडावस्थेत मुलांचे आणि मुलींचे वेगवेगळे कंपू होण्याचे दिवस होते ते. त्यातून त्याचं आणि तिचं तर खेळातही कधी पटलं नाही.
संध्याकाळी नाक्यावर नेहमीप्रमाणे टवाळांचा कंपू बसलेला बघून ती बिचकतच चालत होती. तेवढ्यात तो येऊन तिच्याशेजारी उभा राहिला. तिला धीर देत म्हणाला, “पटत नसलं, बोलत नसलो, तरी वाड्यातल्या सगळ्या मुलींसारखीच तू ही माझी जबाबदारी आहेस.”