एक केसरी फेटा माझा
माझ्या बापूंचा ठेवा
सन्मान मिळवला केसरीयाने
समाजमनी केला रावा
अडीअडचणीस धावून गेले
अपुले परके नच भेद कधी
संकटा मानिले शत्रू अपुला
मानवता सदैव मनी !
शेतात कष्टले…मातीत गुंतले
घामावरी श्रद्धा कायमची
व्यर्थ..वाया काही ना जाऊ दिले
मोल जाणिले तयांप्रती !
मुलगा..पती..बाप..आजोबा
कर्तव्या ना मागे हटले
आदर्श राहिला मनी आमच्या
असे होते बापू अमुचे !
नातवा पाहुनिया..चमकती डोळे
कौतुकाचा डोह…नेत्री दिसे
बोबड्या बोलांचे मानिले सोहळे
अखंड समाधानाची छाया असे !
जरीपटका पाहतो आता.. जेंव्हा जेंव्हा
फेटा सन्मानाचा मज आठवतो
कर्तव्यांचे भान ठेवुनिया..
मी बापूंना नित्य स्मरतो !