मी खूप शोध घेतला…पण नाही मिळाली ती…इतकी ती दुर्मिळ कशी झाली ?
अनेक पुस्तकांतून..कवितांतून मिळायचे तीचे काही अंश…लेखक कवींच्या माध्यमातून किंचीत दर्शन घडायचे
रात्रीच्या काळ्याकुट्ट विचारांच्या डोहात…काही तुकडे चमकायचे…पण काहीच क्षणांचं ते समाधान…जास्त तहान जागवायचे
अनेक चित्रातून…त्यातील रंग रेषा प्रकारातून…झिरपायचं काहीतरी आत…तीचेच काही कण…पण पूर्णता नाहीच
उंच डोंगरावर शोधमोहिम घेऊनही…ढकललो गेलो वारा वादळाच्या ताकतीने मागे…तिथंच दोन साधूंचा संसार असावा ?
दूरच्या डोंगराच्या आडोशाला…निखळ झरा खळखळताना पाहिला….काही वेळाने तोही कर्कश वाटला…
शहराच्या आवाजी प्रदुषणात…गाड्या..कारखाने..प्रार्थनांचे कर्णे दुमदुमताहेत…साठवणुकीची गोदामे सारी…
समुद्रही आता रोरावतोय…गर्जना करतोय..त्याच्या लाटाही विचारताहेत जाब… उग्र रुप घेऊन धडकताहेत…किना-याला
एके ठिकाणी थांबलो…विश्वासच बसेना…एक शेतकरी पाण्याच्या पाटाला वाट करुन देताना…मातीला गोंजारत होता..पाणी गिरक्या घेत..न खळखळता पुढे सरकत होतं….
ही खरी शांतता होती..ती..जी मला हवी होती ! अन् तिथंच बंधा-यावर..मी बुजगावण्यासारखा निश्चल झालो !