‘कशी आहे ती?’ शेवटी तिच्या कष्टानाही मर्यादा असतेच ना!
आताची स्त्री समाजाभिमुख झाली. तिचे कार्यक्षेत्र बदलले. त्यानुरूप पोषाख ही बदलला. स्त्री सौंदर्याच्या कल्पना ही बदलल्या. लांबसडक केसांची निगा राखण्यास वेळ कमी मिळू लागला. त्यामुळे तिथेही शॉर्टकट शोधण्यात आले. आताच्या काळात खऱ्या दागिन्यांनी मढण्यापेक्षा आर्टिफिशियल, आकर्षक दागिने बाजारात आले. अर्थात सोन्याच्या दागिन्यांना चोरीचा धोकाही होताच! कामाला जाण्यासाठी लागणारा वेळ, कामाच्या तासाच्या वेळा जर वेगवेगळ्या असतील तर असे नटून-थटून जाणे स्त्री ला आवडत तर नाहीच पण सोयीचेही नसते!
त्यामुळे स्त्रीची एक वेगळीच प्रतिमा गेल्या दहा-वीस वर्षात आपल्या डोळ्यासमोर उभी झाली आहे. पारंपारिक गोष्टींचा काही प्रमाणात त्याग करावा लागला आहे. तरीही स्त्रीची नटण्याची हौस ही संपलेली नसते. ती स्वतःला सोयीनुसार सजवून आकर्षक ठेवते.यातून तिची जगण्याची उर्मी दिसते. लोकल मधून जाणाऱ्या मुंबई-पुण्याच्या स्त्रिया लोकल मध्येच सण उत्सव साजरे करतात. अगदी केळवण, डोहाळजेवण, हळदीकुंकू यासारखे कार्यक्रम सुध्दा हौसेने करतात. स्त्री अशी उत्सवप्रिय आहे. ती मायाळू आहे. आयुष्य जगण्याची तिला आस आहे. स्त्रीचे सारे जगणे एक उत्सव आहे. लहानपणापासूनच मुलगी म्हणून स्त्री स्वतःला व्यक्त करत असते. संसार मांडण्याची तिला आतून ओढ असते. पूर्वीच्या काळी छोट्या मुली चूल,बोळकी घेऊन खेळत असत. आत्ताच्या मुलींच्या खेळात मायक्रोवेव्ह, फ्रीज, गॅस या सारख्या उपकरणांची खेळण्यात भर पडली आहे. परकर पोलकं घालणारी आणि आईला साडीत पाहणारी मुलगी आता लहानपणापासून च ड्रेस,मिडी,मॅक्सी यामध्ये सहजतेने वावरते. हे बदल आपल्याला आता दिसतात.
स्त्रीचे पोषाखा बरोबरच व्यक्तीमत्व ही बदलत गेले आहे.
काळ बदलला, आता स्त्री ही पायपुसण्यासारखी नसून ती समाजात स्वतंत्रपणे वावरणारे व्यक्तिमत्व आहे! शैक्षणिक सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात आपला ठसा ती उमटवत असते. अजूनही खेड्यापाड्यातल्या स्त्रीला अजूनही हे स्वातंत्र्य पूर्णतः मिळालेले नाही, तरीही शिक्षणाची धडपड आणि इतरही क्षेत्रात तिचा कार्यभाग नक्कीच वाढला आहे. नजीकच्या काळात असे भाग्य, उत्कर्ष स्त्रीच्या वाट्याला येणार हे नक्कीच! तिला समानतेच्या सर्व संधी उत्तरोत्तर मिळोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!