“माधुरी तुझी पुजा झाली की या लाईटांकडे बघ जरा.बराच वेळेपासून लागत नाहीयेत”पोळ्या लाटता लाटता अनिता पुजा करणाऱ्या माधुरीला म्हणाली.
“बस आरती झाली की बघतेच तिकडे.अगं ताई हा श्री ही का रडतोय कळत नाहीये”
“त्याला काहीतरी त्रास नक्कीच होतोय.बघशील जरा त्याच्याकडे”
“बरं बघते”
माधुरीने आरती म्हणायला सुरुवात केली.आरती झाल्यावर तिने स्टूल घेऊन फ्यूज पाहीला.तिच्या अंदाजानुसार तो उडालाच होता. नवीन फ्यूज तार बसवून तिने तो व्यवस्थित केला. पण किचनची ट्युब अजून चालूच होत नव्हती. मग तिने तिथलाही फाँल्ट शोधून काढला. स्टार्टरची निघालेली वायर तिने जोडली तशी ट्यूब सुरु झाली. माधुरी नुकतीच इलेक्ट्रिकल इंजीनियर झाली होती. टेक्नीकल गोष्टी करायला तिला फार आवडत.
अनिताने भाजीला फोडणी टाकली तशी माधुरी श्री च्या खोलीत गेली. श्री जन्मतःच मतिमंद होता. त्याला बोलता येत नव्हतं. तोंडातून लाळ सारखी गळत असायची. स्वतःच्या हाताने त्याला जेवताही येत नसायचं. या दोघी बहिणीच त्याचे दात घासून देणं,अंघोळ घालून देणं,चहा पाजणं,जेवू घालणं करायच्या. दोन मुलीनंतर वंशाला दिवा पाहीजे म्हणून त्याला जन्म देण्यात आला पण जन्मतःच तो विद्रूप दिसत होता. त्याला पाहून डाँक्टर म्हंटलेही होते ‘कशाला त्याला जिवंत ठेवता’ म्हणून. पण नवस, उपास तापास करुन झालेला मुलगा मारायची कल्पनाच अनिता आणि माधुरीच्या आईला-सुनंदाबाईंना सहन झाली नव्हती. मोठा होईल तसा नाँर्मल होईल या आशेवर त्याला वाढवण्यात आलं. काय नाही केलं त्याच्यासाठी?सगळे निष्णात डाँक्टर्स, वैद्य झाले. देवधर्म झाले. पण त्याच्यात कोणत्याही सुधारणा झाल्या नाहीत. आज तो सतरा वर्षाचा होता. शरीराने, उंचीने वाढला होता. पण बुध्दीने मंदच होता.
माधुरी त्याच्या खोलीत गेली. तो अजूनही रडतच होता. तिने सहजच त्यांच्या अंगाला हात लावला. चांगलाच तापला होता. ती अनिताला हाक मारणार तेवढ्यात अनिताच खोलीत आली.
“खुप ताप आहे ताई त्याला.डाँक्टरांकडे घेऊन जाऊ?”माधुरीने विचारलं.
“माझा अजून स्वयंपाक व्हायचाय. तुलाच त्याला न्यावं लागेल. लवकर जा म्हणजे मग मला आँफिसला गाडी घेऊन जायला बरं पडेल.”
अनिता नुकतीच चार्टर्ड अकाउंटंट झाली होती. प्रँक्टिसकरता एका फर्ममध्ये नोकरी करत होती.
माधुरीने अँक्टिव्हावर आपल्या भावाला बसवलं.तो पडू नये अशी देवाला प्रार्थना केली. आणि दवाखान्याकडे निघाली.
अनिताने स्वयंपाक झाल्यावर आपला डबा भरुन घेतला. बाकीचं सगळं व्यवस्थित टेबलवर झाकुन ठेवलं. आपली तयारी केली.आणि माधुरीची वाट बघू लागली.
बराच वेळाने माधुरी परत आली.
“का गं इतका वेळ?”अनिताने विचारलं
“अगं श्रीला डाँक्टरांना दाखवलं आणि परत निघाले तर गाडी सुरुच होईना. जवळपास गँरेज नव्हतं. शेवटी पँनल उघडून स्पार्क प्लग साफ केला तेव्हा गाडी सुरु झाली”
“बरं काय म्हणाले डाँक्टर?”
“त्यांनी काही टेस्ट सागितल्या आहेत करायला.सध्या साथ आहे म्हणे टायफॉईड, मलेरियाची”
“बापरे तसं काही नसावं श्री ला. आधीच काही सांगता येत नाही बिचाऱ्याला. तू असं कर जेवून घे आणि मग रिक्षाने घेऊन जा त्याला लँबमध्ये.मला लागेल गाडी.टेस्ट्सचे रिझल्ट्स कळव मला”
“ओके तू निघ. मी बघते काय करायचं ते”
अनिता गेल्यावर माधुरीने श्रीला झोपवलं आणि त्याला वरणभात भरवायला सुरुवात केली. पण त्याने चारपाचच घास खाऊन तोंड फिरवलं. अशा तापात त्याला काही खावंसं वाटणार नाही हे तिच्या लक्षात आलं. तिला स्वतःला अजिबात खायची इच्छा नव्हती. शेवटी तिने दरवाजाला कुलुपं लावली. चौकातून रिक्षा आणली आणि श्रीला त्यात बसवून लँबकडे निघाली.
लँबमध्ये प्रचंड गर्दी होती. श्रीचा हात धरुन माधुरी आत शिरली तसे सगळे लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पहायला लागले.माधुरीला अशा नजरांची सवय झाली होती. त्यामुळे तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. नर्स ने श्रीचं रक्त घेऊन दोन तासांनी रिपोर्ट घेण्यासाठी यायला सांगितलं. माधुरी श्रीला घरी घेऊन आली. शंकाकुशंकांनी तिचं मन भरुन आलं होतं. ती आठ वर्षांची असतांना तिची आई अशीच अल्पशा आजाराचं निमित्त होऊन वारली होती. त्यावेळी श्री फक्त पाच वर्षाचा होता तर अनिता दहा वर्षाची. माधवरावांना त्यांच्या नातेवाईकांनी दुसरं लग्न करण्याचा खुप आग्रह केला पण मुलांवरच्या प्रेमामुळे अवघ्या ३५ व्या वर्षीही त्यांनी दुसऱ्या लग्नाला नकार दिला. श्रीपादसारख्या मतीमंद मुलाला सांभाळत त्यांनी दोन्ही मुलींवर उत्तम संस्कार केले.मानसिक आणि शारिरीकरीत्या कणखर बनवलं होतं. दोन्ही मुलींनी कराटेत ब्लँकबेल्ट मिळवला होता. अनिता बँडमिंटन चँपियन तर माधुरी स्विमिंग चँपियन होती. दोघींनी राष्ट्रीय स्पर्धात राज्याचं प्रतिनिधित्व केलं होतं. स्वयंपाक आणि घरकामातही दोघी निपूण होत्या. जाणत्या झाल्या तशी भावाची जबाबदारीही त्यांनी स्विकारली होती. वेडगळ भावाची त्यांनी कधी किळस केली नव्हती की त्याला हिडीसफिडीस केली नव्हती. राखीपोर्णिमेला आणि भाऊबिजेला त्याला त्या प्रेमाने ओवाळायच्या.
दोन तासांनी माधुरी रिपोर्ट घ्यायला लँबमध्ये गेली. थरथरत्या हाताने तिने ते रिपोर्ट वाचले आणि तिला प्रचंड धक्का बसला. ज्याची भिती होती तो टायफॉईड श्रीपादला झाला नव्हता तर त्याला डेंग्यूची लागण झाली होती. गेल्या २-३ महिन्यात डेंग्यूमुळे मेलेल्यांच्या बातम्या माधुरीच्या डोळ्यासमोर आल्या आणि तिचे डोळे पाणावले. तिने पटकन मोबाईल काढून डाँक्टरांना फोन केला.रिपोर्टबद्दल माहीती दिली. त्यांनी तिला श्रीपादला ताबडतोब हाँस्पिटलमध्ये अँडमीट करायला सांगितलं. मग तिने वडिलांना-माधवरावांना फोन केला ते अमरावतीला मिटींगमध्ये होते. मिटींग सोडून ते नागपूरला यायला निघाले. नंतर तिने अनिताला फोन केला. अनिता लगेच घरी यायला निघाली. एक दिड तासांतच दोघींनी श्रीला दवाखान्यात अँडमीट केलं.
माधुरीच्या डोळ्यातलं पाणी पाहून अनिताने तिला जवळ घेतलं.
“रडू नकोस.काही होणार नाही त्याला”
“ताई मला आईची खुप आठवण येतेय गं!ती अशीच आपल्याला सोडून गेली होती.”
आईच्या आठवणीने अनितालाही गहिवरुन आलं.पण तिला असं भावूक होऊन चालणार नव्हतं.तिने माधुरीच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाली
“बाबा येतील लवकरच.ते सगळं व्यवस्थित सांभाळतील.मला सांग तू जेवली आहेस ना?”
“नाही गं.मला भुकच नाही लागली श्री च्या काळजीने”
” अगं वेडी आहेस का?जा खाली जाऊन काँफी तरी पिऊन ये.नाही तर चल मीही येते तुझ्याबरोबर!तू तशी जाणार नाहीस”
संध्याकाळी माधवराव आले.दोघी मुली त्यांना बिलगल्या.
चार दिवसानंतर श्रीपाद ची तब्येत जास्तच बिघडली. प्लेटलेट्स खुप कमी झाल्या. बी.पी.कमी झाला. त्याला आय.सी.यु.मध्ये हलवलं गेलं. आँक्सिजन लावण्यात आला. ब्लडबँकेतून आणून प्लेटलेट्स देण्यात आल्या. त्याने थोडासा दिलासा मिळाला. मात्र सातव्या दिवशी तो जास्तच क्रिटीकल झाला आणि दुपारी चार वाजता त्याची प्राणज्योत मालवली. त्याचं म्रुत शरीर बाहेर आणलं तशी दोन्ही मुली त्याला मिठी मारुन रडू लागल्या. माधवराव सुन्न अवस्थेत एका कोपऱ्यात बसून राहीले. त्यांच्या वंशाचा दिवा न चमकताच विझून गेला होता.
श्रीपादचं शव घरी आणण्यात आलं. शेजाऱ्यापाजाऱ्यांची, नातेवाईकांची गर्दी जमा झाली. दोघी मुलींना रडतांना पाहून एक बाई म्हणाली. “जाऊ द्या मुलींनो गेला तर गेला तुमचा भाऊ. असाही कोणत्या कामाचा होता तो!” ते ऐकताच अनिता उसळून म्हणाली “असं कसं म्हणता काकू!कसाही असला तरी तो आमचा भाऊ होता आणि आमचं खुप प्रेम होतं त्याच्यावर”
दिवस उलटत गेले. मनावरच्या जखमा मिटवण्याची फार मोठी ताकद काळात असते हे काळाने पुन्हा एकदा सिध्द केलं. अनिता आणि माधुरीच्या लग्नाची बोलणी सुरु झाली. माधुरीही आता नोकरीला लागली होती. पण एकना एक दिवस स्वतःची इंडस्ट्री सुरु करण्याचं तिचं ध्येय होतं. अनितालाही तिची स्वतःची फर्म सुरु करायची होती. दोन्ही मुली दिसायला सुंदर,सुशील त्यातून कमावत्या होत्या. खुप स्थळं सांगून येत होती. काही परदेशातीलसुध्दा होती. पण दोन्ही मुलींनी लग्न करु तर नागपुरातच करु,बाबांना एकटं सोडून आम्ही कुठेही जाणार नाही असा हट्ट धरला होता. माधवरावांनी त्यांना समजवण्याचा खुप प्रयत्न केला पण त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या. शेवटी योगायोगाने दोघींनाही नागपुरातच चांगली स्थळं मिळाली.
लग्नं ठरली त्यादिवशी माधवराव खुप आनंदात होते.पण मुलींच्या चेहऱ्यावर उदासिनता दिसत होती.
“का गं मुलींनो अशा उदास का?तुम्हाला आनंद नाही झाला?”
“बाबा तुम्हांला सोडून जायच्या कल्पनेनेच जीव घाबराघुबरा होतोय”अनिता म्हणाली.तिचे डोळे आसवांनी भरुन आले होते.
“बेटा ही जगरहाटी आहे आणि ती योग्यसुध्दा आहे”माधवराव म्हणाले
“ताई आपण असू करुया का?बाबांना तुझ्याकडे सहा महिने माझ्याकडे सहा महिने असं ठेवायचं का?”माधुरीने विचारलं. माधवराव हसले.
“आपल्या सासूसासऱ्यांना आईवडील मानणारे जावई फार थोडे असतात बेटा.मात्र मुलीने आपल्या सासूसासऱ्यांना आईवडील मानलंच पाहीजे असा अट्टाहास केल्या जातो”
“माधुरी आपण बाबांचं लग्न लावून द्यायचं का?”अनिता म्हणाली तसे माधवराव जोरात हसले. मग गंभीर होत म्हणाले
” तुम्ही लहान असतांना मला तशी संधी चालून आली होती. पण नव्या बायकोने तुमच्याशी वाईट वागणं मला सहन झालं नसतं. आताही माझ्या लग्नानंतर तुम्ही माहेरपणाला आल्यानंतर तिने तुमच्याशी वाईट वागणं मला सहन होणार नाही. मला आहे तसाच राहू द्या. रिटायर झाल्यावर मी मला समाजसेवेला वाहून घेणार आहे. तुम्हाला माहीत आहेच की मी एल.एल.बी.केलंय.वडिलांना मी वकील होणं पसंत नव्हतं म्हणून मी वकिली केली नाही. पण आता मी निराधार, अत्याचारीत,हुंडाबळी स्त्रियांच्या केसेस मोफत लढणार आहे.ते माझं स्वप्न आहे.”
दोघी मुलींची एकाच मांडवात लग्नं झाली.निरोपाच्या वेळी दोघा मुलींनी वडिलांना मिठी मारुन केलेला आक्रोश अनेकांच्या डोळ्यात पाणी आणून गेला.
लग्नानंतर सात महिन्यांनी अनिताचा माधवरावांना फोन आला
“बाबा उद्या तुमचा वाढदिवस आहे.त्यानिमित्त एक कार्यक्रम मी आणि माधुरीने आयोजित केलाय.नक्की या.मी गाडी पाठवते”
माधवराव आश्चर्यचकित झाले.
“कोणता कार्यक्रम बेटा?”
“काही नाही अगदी साधा कार्यक्रम आहे”
“ठिक आहे.येतो.कुठे यायचं?”
तिने पत्ता दिला.
दुसऱ्या दिवशी तिने पाठवलेल्या आलिशान गाडीत ते त्या पत्त्यावर गेले. एका शानदार आँफिससमोर गाडी उभी राहीली. बाहेर बोर्डवर लिहीलं होतं”अनिता माधव पाटकर-चार्टर्ड अकाउंटंट”ते आत गेले. आतमध्ये गेल्यावर भिंतीवर त्यांचा मोठा फोटो फ्रेम करुन लावला होता. त्यावर लिहिलं होतं “माझे प्रेरणास्थान, माझे बाबा-माधवराव पाटकर” माधवरावांचे डोळे भरुन आले तेवढ्यात अनिता आणि तिचा नवरा समोर आले. दोघं त्यांच्या पाया पडले. त्यांना उठवून माधवरावांनी विचारलं
“हे काय आहे बेटा?”
“काही नाही बाबा मी आजपासून माझी स्वतंत्र फर्म सुरु करतेय. तिचं उद्घाटन तुमच्या हस्ते करायचंय”
“अगं पण तुझं आडनांव आता बदललंय.मग माहेरचं आडनांव का?”
” बाबा तुम्ही मला सी.ए.केलंत तेव्हा माझं आडनांव पाटकर होतं ते मी का बदलावं?”
माधवरावांनी काळजीने जावयाकडे पाहीलं. तो हसून म्हणाला
“हो बाबा अनिता योग्यच म्हणतेय. आज जी ती आहे ती तुमच्यामुळे”
माधवराव समाधानाने हसले.
माधवरावांच्या हस्ते उद्घाटन झालंं.त्यांनी केक कापल्यावर मुलींना भरवला. अनिता दोन शब्द वडिलांबद्दल बोलली. माधवरावांचं मन भरुन आलं. कार्यक्रम झाल्यावर माधुरी त्यांना म्हणाली
“चला बाबा “
“आता कुठे?झाला ना कार्यक्रम”
“अहो माझ्याकडचा कार्यक्रम राहिलाय.आता काही विचारु नका”
सगळे बाहेर आल्यावर अनिताने वडिलांच्या हातात एक चावी दिली.
“हे काय?”
“ही आम्हा बहिणींकडून तुम्हाला छोटीशी भेट”
कोऱ्या करकरीत कारकडे बोट दाखवत अनिता म्हणाली. माधवरावांना काय बोलावं ते सुचेना. अनिता आणि माधुरीने त्यांचे हात धरुन त्यांना गाडीत बसवलं. थोड्या वेळाने गाड्या औद्योगिक वसाहतीत शिरल्या आणि एका इंडस्ट्रीजवळ उभ्या राहील्या .माधवराव गाडीबाहेर आले. फँक्टरीच्या गेटवर बोर्डवर लिहिलं होतं “माधव इंडस्ट्रीज” सगळे आतमध्ये गेले. एका हाँलमध्ये उद्घाटनाची तयारी दिसत होती. माधुरी स्टेजवर माधवरावांना घेऊन गेली.
“बाबा ही माझी फँक्टरी.आज हिचं उद्घाटन तुम्हीच करायचंय”
“अग बेटा एखाद्या मंत्र्याला किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला बोलवायच होतं. मी काही एवढा मोठा माणूस नाही”
“बाबा तुम्ही तुमच्या सुखाची पर्वा न करता आम्हाला एवढं मोठं केलंत. आमच्यासाठी तुमच्यापेक्षा कोणीही मोठं नाही”
माधव इंडस्ट्रीजच्या बोर्डला हार घालून आणि नारळ वाढवून माधवरावांनी उद्घाटन केलं.
माईकवर माधुरी वडिलांबद्दल सांगताना गहिवरत होती. खुर्चीवर बसलेले माधवराव विचारात बुडून गेले होते. वंशाचा दिवा विझून गेला होता पण या वंशाच्या पणत्या दैदिप्यमान प्रकाशाने आसमंत उजळवून टाकत होत्या. लग्नानंतरही त्यांनी बापाचं नांव अजरामर करुन टाकलं होतं.
माधुरी वडिलांच्या एकेक आठवणी सांगत होती आणि माधवरावांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वहात होत्या. आता उठावं आणि दोन्ही मुलींना छातीशी धरावं असं त्यांना प्रकर्षाने वाटू लागलं.