सन २०११ च्या जून महिन्यातील एक पावसाळी सकाळ. रविवारचा दिवस होता. पुण्याहून मुंबईला येणारी प्रगती एक्सप्रेस दादर स्टेशनात येऊन थांबली. मी, माझी पत्नी आणि मुलासह खाली उतरलो. तसं पाहिलं तर मुंबईला येण्याची ही काही माझी पहिलीच वेळ नव्हती. पण यावेळी मनात असणारी उत्सुकता (आणि थोडी अनिश्चिततेची चिंता) काही वेगळीच होती.
गेली अनेक दशके आपल्या दैवी सुरांनी संपूर्ण जगाला भुरळ घालणाऱ्या स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रत्यक्ष भेट घेण्याच्या उद्देशाने मी मुंबईत पाऊल ठेवले होते. काही दिवसांपूर्वीच मी लता दीदींचे एक चित्र काढले होते. ते चित्र त्यांना दाखवून त्यांचा आशीर्वाद घ्यावा असे मनांत होते. ज्या व्यक्तीने आपल्याला इतकी वर्षे भरभरून संगीताचा आनंद दिला त्या व्यक्तीला भेटायला जाताना, फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण स्वतः केलेली एखादी कलाकृती सोबत घेऊन गेलं पाहिजे, अशी माझी धारणा आहे.
पुण्याच्या घैसास गुरुजी वेद पाठशाळेचे संचालक श्री मोरेश्वर घैसास गुरुजी यांचा मंगेशकर कुटुंबियांशी प्रत्यक्ष परिचय असल्याने त्यांचा या बाबत सल्ला घेतला. ते म्हणाले, १२ जूनला मला मुंबईत एका कामासाठी जायचे आहे. त्यावेळी आपण प्रभुकुंज वर जाऊ या. मात्र दीदींची भेट होईलच याची खात्री देता येत नाही. मी म्हटलं ठीक आहे. प्रभुकुंज मध्ये प्रवेश मिळणे ही सुद्धा माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट असेल.
दादरला उतरल्यावर प्रथम जवळच राहणाऱ्या माझ्या आत्याच्या घरी गेलो. तेथे जेवण वगैरे करून ठरल्या प्रमाणे ठीक एक वाजता प्रभुकुंजला जाण्यासाठी निघालो. श्री घैसास गुरुजी आधीच तेथे पोहोचले होते. वरळी, प्रभादेवी, हाजीअली मार्गे टॅक्सी पेडर रोडवर आली आणि समोर ‘प्रभुकुंज’ची उंच इमारत दिसू लागली. टॅक्सीतून उतरून सोसायटीच्या सेक्युरिटीपाशी आलो. त्याने विचारले “कहां जाना हैं?” मी सांगितले ‘फ्लॅट क्र. १०१ , लता मंगेशकर’. त्याने फोन करून आम्ही आल्याची वर्दी दिली आणि माझ्याकडे वळून म्हणाला “आप उपर जा सकते हो” ते ऐकतांच इतका वेळ शांत असलेल्या छातीत धडधड सुरू झाली. अंगावर रोमांच उभे राहिले. जिना चढून पहिल्या मजल्यावर गेलो. समोरच्याच दारावर ‘लता मंगेशकर’ अशी पल्लेदार अक्षरांतील नावाची पाटी दिसली. थरथरत्या हाताने दारावरची बेल वाजवली. काही क्षणांतच घरातील एका नोकर मुलीने दार उघडले. आत गेल्यावर डाव्या हाताला दीदींचे देवघर आहे. तेथून सरळ पुढे गेल्यावर एक मोठा दिवाणखाना लागला. तेथे सोफ्यावर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी सौ भारती मंगेशकर बसलेल्या होत्या. तसेच श्री. घैसास गुरुजी सुद्धा उपस्थित होते. सोफ्यावर बसल्यावर एकवार चौफेर नजर टाकली. बाजूच्या भिंतीवर दीदींचा भला मोठा हासरा फोटो लावला होता. शेजारच्या शोकेस मध्ये त्यांना मिळालेले असंख्य पुरस्कार आणि मानचिन्हे ठेवली होती. सौ भारती ताई यांनी मिठाई देऊन आमचे स्वागत केले. आज दीदींची तब्येत बरी नसल्याने त्या भेटू शकणार नाहीत हे समजल्यावर आमचा थोडासा हिरमोड झाला. मात्र सौ. भारती ताईंनी मला त्यांचा घरचा फोन नंबर दिला व दीदी फोनवर नक्की तुमच्याशी बोलतील असा विश्वास दिला. त्याच बरोबर हा फोन नंबर unlisted (म्हणजे टेलिफोन डिरेक्टरीत नसणारा) आहे, तेव्हा तो दुसऱ्या कोणाला देऊ नका, असे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.
ज्या वास्तूत गेली पन्नासहून अधिक वर्षे लता मंगेशकर नावाच्या अलौकिक स्वराचे वास्तव्य आहे, जी वास्तू त्यांच्या रोजच्या संगीताच्या रियाजाची साक्षीदार आहे, जी वास्तू मंगेशकर भावंडांबरोबरच इतरही असंख्य दिग्गज कलाकारांच्या चरण स्पर्शाने पावन झाली आहे, अशा वास्तूमध्ये आज मी बसलो आहे, लता दीदींची प्रत्यक्ष भेट झाली नाही तरी हजारों वर्षांत एकदा जन्माला येणारा तो दैवी आवाज माझ्या समोरील भिंती पलीकडे असलेल्या आतल्या खोलीत उपस्थित आहे, ही कल्पनाच अतिशय रोमांचक आणि मनाला सुखावणारी होती. दीदींसाठी खास पुण्याहून आणलेली चितळ्यांची बाकरवडी आणि आंबा बर्फी सौ. भारती ताईंकडे सुपूर्द करून आम्ही त्यांचा निरोप घेतला.
अतिशय भारावलेल्या अवस्थेत आम्ही प्रभुकुंज मधून बाहेर पडलो. पावसाची एक जोरदार सर पडून गेली होती. रविवार असल्याने रस्त्याला तुरळक गर्दी होती. पेडर रोड, ऑपेरा हाऊस, मेट्रो सिनेमा … छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने टॅक्सी धावत होती. सुरांच्या राणी कडून रुळांच्या राणी कडे आमचा प्रवास चालला होता. लता दीदीं पेक्षा फक्त एक वर्षाने लहान असणारी आणि त्यांच्या इतकीच लोकप्रिय असणारी ‘दक्खनची राणी’ आमची वाट बघत होती.
पुण्याला परतल्यावर काही दिवसांनी ‘त्या’ नंबर वर फोन केला. पलीकडून घरातील एका नोकराने फोन उचलला. त्याला माझा थोडक्यांत परिचय देऊन दीदींशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. थोड्याच वेळांत स्वतः लता दीदी फोनवर आल्या. त्यांचे लता बोलतेय हे शब्द ऐकले आणि माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आले. गेल्या चार पिढ्या संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणारा, आजवर विविध दृकश्राव्य माध्यमांतून ऐकलेला तो आवाज आज चक्क फोनवरून माझ्याशी बोलतोय यावर माझा विश्वासच बसत नव्हता. काही क्षण मी पूर्णपणे निःशब्द झालो. थोडं सावरल्यावर मी माझा परिचय दिला व भेटायची इच्छा व्यक्त केली. पण त्यांच्या तब्येतीच्या वा इतर कारणांमुळे ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
या गोष्टीला आता दहा वर्षे उलटून गेली आहेत. आज लता दीदी आपल्यात नाहीत. पण त्यांनी गायलेल्या असंख्य गाण्यांप्रमाणेच त्यांचे गद्य शब्द लता बोलतेय हे आजही माझ्या कानांत घुमत आहेत आणि नेहमीच राहतील.
ती. लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻