सकाळी दारावरची bell वाजली. दार उघडलं तर दारात स्वयम चा नव्या स्वरूपातला वर्ष पाहिले अंक अकरावा येऊन पडला होता आणि परांजपे काका वनवासी कल्याण आश्रमाची calenders घेऊन आले होते.
साल २०१५ संपल्याची वर्दी मिळाली. वर्ष संपत आले सुध्दा? वर्षभरातल्या सुख दुखाच्या घटना, काय मिळवलं काय गमावल? याचा आढावा घ्यायला गेला तर आनंदी आठवणीनी मन प्रसन्न होतं तर ज्या गोष्टी गमवाव्या लागल्या त्यांनी मन कातर होतं.
वर्षभरात कुणीतरी जीवाभावाच आपल्यापासून दूर गेलेलं असतं. अत्यंत आनंदाच्या क्षणी लेकीचं लग्न होतं तेव्हा लेकीला निरोप देताना, आता रोज भेटणार नाही दिसणार नाही हे दु:ख, नवीन माणसात रमेल नं? जमवुन घेतील ना? हि काळजी. आजवर केलेले संस्कार, नाती बांधुन ठेवण्याचं स्त्रीचं अंगभुत कौशल्य या सगळ्या जबाबदाऱ्या ती नीट पार पाडू शकेल नं? हि काळजी, उरात दाटून येते. निरोप देण्याची कित्तीही मानसिक तयारी झालेली असली तरी होणाऱ्या विहिणीला “ओटीत घातली मुलगी विहीण बाई असं म्हणुनच आई लेक जावयाचा निरोप घेते.
“ढल गया दिन हो गयी श्याम जाने दो जाना है” या तिच्या आर्जवाला “अभी ना जो छोडकर के दिल अभी भरा नाही” असं म्हणणारा तो आता एकमेकांचा कंटाळा येईपर्यंत एकत्र येतात. नोकरी व्यवसायानिमित्त एकमेकांचा निरोप घेतला गेला तरी मनाच्या तारा जोडल्याच असतात. पण तरीही एकमेकांचा विरह त्रासदायकच. आपल्याला सोडुन लांब जाणाऱ्या आपल्या जोडीदाराच्या खुशालीची काळजी मन व्याकुळ करते आणि भरल्या डोळ्यांनी पुसट प्रतीमेतच त्याचा निरोप घ्यावा लागतो. पण सीमेवर जाणाऱ्या वीराला मात्र ती वीरपत्नी “पहा टाकले पुसूनी डोळे, गिळला मी हुंदका, रणांगणी जा सुखे राजसा परतुनी पाहू नका” असा निग्रही निरोप देते. कर्तव्याची जाणीव तिला कठोर करते आणि निग्रही निरोप घ्यायला भाग पाडते. कठोर असला तरी हा निरोप केविलवाणा असतो. आपला जोडीदार परत येईल ना? ह्याची शाश्वती नसते. पण पंढरीतल्या विठूरायाला काल्पनिक निरोप देणारी सावळारामाची रुख्मिणी मात्र पंढरपुरातल्या दाम्भिकातेला कंटाळून “यायचे तर लवकर बोला नाही तर द्या हो निरोप मजला” असा धमकीवजा निरोप देते.
पत्नीचा अकाली वियोग हि पुरुषासाठी अतिशय केविलवाणी गोष्ट असते. या जगाचा तिने निरोप घेतलाय हि गोष्टच मान्य न झालेल्या एका जीवाचा आक्रोश मांडताना “धरिला असं अबोला की बोल बोलवेना अजुनी रुसुनी आहे खुलता कळी खुलेना”असं म्हणुन तिला बोलतं करण्याचा प्रयत्न कवी अनिलांनी इतका तंतोतंत शब्दबद्ध केलं आहे की ऐकताना आपल्याही घशात हुंदका दाटून येतो. “संधीप्रकाशात अजून तो सोने तो माझी लोचने मिटू यावी”अशी याचना बोरकर करतात तेव्हा सुध्दा हाच केविलवाणा भाव जाणवतो. इतक्या वर्षांची समृद्द्ध साथ तिच्या पश्चात येणाऱ्या पोरकेपणाची भावना त्या गृहस्थाना वेळीच तिचा निरोप घेण्यास उद्युक्त करते. “तूच ओढलेले त्यासवे दे पाणी थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे” या शब्दात सगळे कृतज्ञ भाव ह्या पोरकेपणाच्या भावनेमुळे उफाळून येतात. एका पतिव्रतेच्या खरंतर नवऱ्याच्या अनंत काळाच्या मातेच्या डोळ्यात कृतार्थ भाव आणणारी हि शब्द रचना!!
आपल्या जोडीदाराच्या पाठी एकट रहाणं हि नुसती कल्पना सुध्दा असह्य होऊन रामाबाईसारखी साध्वी माधवरावांच्या आजारपणात सतीची वस्त्र मागवते, आपल्या सख्या सोबतच या जगाचा निरोप घेन्याचा त्यांचा निर्धार खरोखर अचंबित करणारा. निग्रही निरोप म्हटलं की कुंतीच विस्मरण होणं निव्वळ अशक्य!! अजाणतेपणी घडलेल्या चुकीची शिक्षा. आपल्या तेजस्वी अलौकिक पुत्राला एका पेटाऱ्यात घालून नदीत सोडुन देण्याला, त्या अल्लड कुमारिकेची प्रगल्भता म्हणावी की समाजाला तोंड देण्याची भीती? त्या एवढ्याशा जीवाला नदीत सोडताना भीती नसेल वाटली? का हे करताना परमेश्वरावराचा अढळ विश्वास हे कृत्य करायला सामर्थ्य देऊन गेला असेल? कुंतीनं मुलाला जिवंत सोडलं होतं. कुठे ना कुठे तो सुखरूप राहील अशी आशा होती, पण पुत्रवियोगाचं दु:ख ओढवत त्या मातेचं काय? “राजहंस माझं निजला“ या कवितेत गोविंदाग्रजांनी मातेचा विलाप व्यक्त केला आहे. पण पुत्र वियोगाचं दु:ख वडिलांनाहि तितकच होतं. वडिलाना होणारं दु:ख तिळभरही कमी नसतं.
“आज आठवे मजसी श्रावण
शब्द्वेधती मृगया भीषण
पारधित मी वधिला ब्राह्मण
त्या विप्राच्या अंध पित्याचे उमगे दु:ख अपार “
दोन पित्यांच्या पुत्र वियोगाचं वर्णन गीत रामायणात ग. दि. माडगूळकरानी केलं आहे. एक अंध पिता ज्याने दु:खावेगाने शापवाणी उच्चारली आणि दुसरा दशरथ वचनपुर्ती साठी मुलाला वनवासात जाण्याची आज्ञा करावी लागली. “जेथे राघव तेथे सीता” म्हणून रामाला निरोप नाकारणाऱ्या सीतामाईच्या दु:खाचं यथायोग्य मूल्य मापन झालं, पण “भावाचा वियोग सहन करू शकत नाही” असं म्हणणाऱ्या लक्ष्मणाच्या पत्नीला आपल्या नवऱ्याचा निरोप घ्यावाच लागला. त्याला निरोप देताना काय असतील तिच्या भावना? विरहाचं अपार दु:ख, जाऊबाईना नेणार आणि मला नाही हि तक्रार की “भावाच्या तुलनेत आपल्याला नाकारल्याचं वैफल्य?” तिच्या भावना ह्या कायम उपेक्षितच!! वनवासात जाताना अयोध्या नगरीने
“आज अयोध्या प्रथम पराजित
थांब सुमंता थांबावी रे रथ”
अश्या व्याकुळ भावनेने निरोप दिला होता तर वृंदावनाच्या प्रजेने अकृराला क्रूर ठरवत
“नकोस नेऊ आनंदाचा ठेवा” म्हणत श्री कृष्णाला निरोप दिला होता.
स्नेही जीवाचा निरोप घेणं क्लेषकारकच पण घरातल्या आता कदाचित निरुपयोगी झालेल्या रोजच्या वापरातल्या वस्तु टाकून देताना सुद्धा “टाकवत नाही हि भावना असते” तर ज्याच्यावर आपलं राहत घर बदलावं बदलण्याची वेळ येते, त्यांना ती वास्तू सोडताना किती यातना होत असतील? संदीप खरेनी म्हटल्या प्रमाणे
“का रे इतकं लळा लावूनी नंतर मग हि गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते”
म्हणुनच मग स्वप्नात जेव्हा “घरात” एखादी घटना घडते तेव्हा घरातली माणसं कुणीही असोत या “आठवणीचा ठिपका बनलेल्या घरातच” स्वप्नातल्या अनेक घटना घडत असतात.
नुकतीच whats app वर एक post वाचली. शाळेतल्या दहावीच्या निरोप समारंभाबाबत होती ती. शाळेत जायला आपली सुरुवात होते तेव्हा आई वडिलांच्या सुरक्षित कोषातून बाहेरच्या जगात पहिलं पाउल टाकतांना देखिल अपार दु:ख डोळ्यातून आक्रोश करत असतं. मुलाला शाळेत सोडुन परतणाऱ्या आई वडिलाना कठोरपणे हात सोडवून घ्यावाच लागतो तेव्हा पुढचं जग खुलं होतं. ज्या शाळेत प्रवेश घेताना रडतो त्या शाळेतून बाहेर पडताना देखिल दु:खच!! निरोप हा क्लेशकारक असला तरी हितकरच ठरतो, हे माहित असूनही निरोप घेताना मन व्याकुळ होतच. आपल्या सारख्या सर्व सामन्यांच्या आयुष्यातही बदल्यामुळे असे निरोपाचे हळवे प्रसंग अनेकदा येत् असतात.
माणुस आपल्या भावतालातल्या प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूवर जीव लावातो तेव्हाच त्याचा भवताल सुंदर होतो. या सुंदर विश्वातून बाहेर पडताना एकःद्याचे डोळे ओलावत असतील तर त्याच्या बरोबर इतरानाही ते क्लेश्कारच होतं. सचिन तेंडूलकरने क्रिकेटचा घेतलेला निरोप हा त्याच्या सोबत इतरानाही चटका लावून जाणारा. ज्या मैदानावर तो खेळला त्या पिचला नमस्कार करूनच प्रथम दर्जाच्या क्रिकेटचा त्याने निरोप घेतला.
चार दिवसात नव वर्ष सुरु होईल. गेल्या वर्षात काय गमावल काय कमावलं ह्याचे हिशोब मांडले जातील. कमावलं काय ते पटकन आठवणार नाही पण गमावल काय ते चटकन लक्षात येईल. जे गमावल, ते आपलं होतं! हे गमावल्या नंतरच जाणवतंय हे सुध्दा लक्षात येणार नाही कदाचित. कुणाला दुखावलं असेल कुणी आपल्याला दुखावलं असेल. जाणुन बुजुन नाही पण नकळत!! मनुष्य स्वभाव आहे तो ह्यात गैर काहीच नाही. लहानपणी म्हणजे खरंतर सोळाव्यात चिंचेच देठ घेऊन एक एक पान तोडत “he loves me he loves me not” असा मुर्खपणा अनेकांनी केला असेल. आता ह्या वळणावर स्वत:च्या चुका त्या एकेका पानासारख्या तोडत perfection कडे जाण्याचा प्रयत्न करायला हवाय.
या वयात पुन्हा मनानं षोडश वर्षीय होण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? मनाने सोळा वर्षाचे झालो तरी षोडश वर्षातल्या मुलं मुलींसाठी काय आदर्श उभे करणार आपण? ह्याची जाणीव ठेवायलाच हवी ना? पार्थिव गणेशाला निरोप देताना जी प्रार्थना आहे
“निरोप घेतो आता आम्हाआज्ञा असावी
चुकले अमुचे काही त्याची क्षमा असावी”
नेमकी हिच भावना आज हया वर्षाचा निरोप घेताना आहे
डिसेंबर २०१५