उज्वला सहस्रबुद्धे
मन आभाळ आभाळ,
कधी सान, कधी विशाल!
कधी पाण्याचा डोह,
कधी सागर नितळ!
कधी असे ते पाखरू,
तेजापाशी झेपावलेले
कधी असे ते निश्चल,
कूर्मापरी स्थिरावलेले!
कधी अतीच चपळ,
निमिषातच दूर धावे!
कधी असते निश्चल,
वज्रासारखे एक जागे!
मना तुझा ठाव,
घेता येईना जीवाला!
फिरते मीही तुझ्या संगे,
गिरकी सोसेना ती मला!