भले बुरे जे…घडुन गेले…
विसरुनी जाऊ… सारे क्षणभर…
जरा विसावु…या वळणावर…
या वळणावर….!
लहान पणी केंव्हा तरी… रेडिओवर…भले बुरे जे घडून गेले… विसरुनी जाऊ सारे क्षणभर… हे गाणं हलकंस पहिल्यांदा कानावर पडलं…!
हळूहळू ते गाणं कानात झिरपत होतं नी पडुन रहावसं वाटलं… ऐकत… अर्थपूर्ण कडवे सगळे…सुरेख चाल…! तेंव्हापासुन collection मधलं हे ही एक नितांत आवडीचं गाणं…!
खरंच आहे…आयुष्यात किती तरी वळणे येतात… कधी संकटातुन.. वेदनेतून…कधी आनंदात… ही वळणं येतातच येतात.. मग ते वळण कौटुंबिक स्तरातील असो अथवा नात्या समाजातलं, मित्रपरिवार असो… किंवा कामाच्या ऑफिसच्या ठिकाणी…! अगदी शाळा, कॉलेज, कर्त्या-निवृत्त वयातलं सुद्धा… पुढचा प्रवास बदलणारा असतो… हेच वळण जे निर्विकार असतं.. एक वाट संपुन दुसरं सुरू होणार असल्याचं एक अंतराळ…अवकाश…! भलं बुरं.. घडामोडी घडुन गेलेल्या असतात नि त्यामधला हा विसावा असतो क्षणिक या वळणावर…!
खुप उन्हांनं बेजार झाल्यावर जसं पाऊस पडण्यापुर्वीचं आभाळ तयार होतं किंवा खूप पाऊस पडून कंटाळवाणं झाल्यावर पावसाने उघडीप दिल्यानंतर जसं स्वच्छ ऊन पडतं ना अगदी तसं..!
ह्याच वळणावर जरा आयुष्य संथ झालेलं असतं… मनाला वाटतं की घडामोडींना पूर्णविराम मिळालाय पण वास्तव मध्ये तो स्वल्पविराम असतो…… जसं एक वाक्य संपत असतं नी दुसरं वाक्य सुरू होण्याच्या बेतात जणू काही…!
पान उलटणार असतं नि माहिती नसतं पुढच्या पानावर काय ओळी लिहिल्यात ते…….! पुस्तक बंद करता येतं हो एकवेळ पण आयुष्याचं पुस्तक शेवटच्या श्वासापर्यंत वाचावंचं लागतं…! नको असलेली पानं सोडून पुढं जाता येत नाही… अन हवी असलेली मागची पानं परत कधीतरी वाचताही येत नाहीत…! ती आपोआप पालटत असतात…! पलटवावीच लागतात…नवीन वाचावीच लागतात….! फक्त विसावा काय तेवढा आपला… बाकी वळणांचं नशिबावर सोपवुन आपण जीवन प्रवास करायचा…!
आज एक वळण संपतय, नवीन चालू होतंय…
येणाऱ्या नववर्ष २०२४ च्या हार्दिक शुभेच्छा !!