आयुष्य सरते.. वर्ष संपते…
तीच सकाळ. तोच सूर्य…
काय बदलते..
कालचे असते ते आजचे होते…
कालचक्राची गती अधिक गतिमान होते….
आयुष्य जगलेले दिवस आठवणीत जाऊन बसतात…
आणि येणारा नवीन दिवस
तोही भूतकाळ होणार आहे हे विसरून प्रारब्धा प्रमाणे जगत राहतात…
काय दिले.. काय घेतले..
किती हिशोब केले तरी…
गेले ते गेलेच.. परत फिरून येणे नाही… मग ते माणसाच्या बाबतीत आणि अचेतन वस्तूच्या बाबतीतही होते…
वर्ष संपले… आपल्या आयुष्यातील या जन्माचा राहण्याचा कालावधी कमी झाला..
किती उन्हाळे किती पावसाळे पहाणे बाकी? याचा हिशोब मनात सुरू झाला…
सारे कसे अघटीतच.. विज्ञान किती पुढे गेले तरी मानवी मनाचा शोध अपूर्णच राहिला…
पृथ्वीची उंची खोली मोजून झाली…
साऱ्या चल अचल पंचतत्त्वांची बेरीज करून झाली…
पण अजूनही मानवाच्या आयुष्याची मोजमाप अपूर्ण राहिली…
ग्रह तारे, ज्योतिषीय भाकिते हस्तरेखा.. सारे सारे ढुंडाळून झाले…
पण जगण्याचे अंदाज चुकत गेले….
कोणाला कुठे हवे असते… दुःखाचे, वेदनेचे, अश्रूंचे, गरीबीचे आयुष्य…
श्रीमंती, वैभव, सुखासीन ऐश्वर्य संपन्न.. अशीच कामना असते…
पण प्रारब्धाप्रमाणे प्राप्तन प्राप्त होते….
जीवा सवे आयुष्य येते.. वर्ष सरते तसे आयुष्य सरते…
सरासरी आयुष्याचा कालमान पाहताना…
जगात अनेक अद्भुत घटना घडून गेल्या…
सामान्य जीवाला त्या कोठे स्पर्शून गेल्या…
त्याचे आपले जगणे आणि जगण्यासाठी संघर्ष करणे इतकेच काय ते उरले….
सध्या राममय झालेले जग…
अयोध्या.. अक्षता कलश..
विरोधी पक्षाचा थयथयाट…
येत्या वर्षाच्या निवडणुका…
आणि संजय राऊत च्या ऐवजी सतत टीव्हीवर दिसणारा जरांगे पाटील …
काय काय म्हणून लक्षात ठेवायचे…
काही झाले तरी शेतकऱ्यांच्या समस्या…
आम्हा नोकरदारांचे काय?
कुठे बसतो आम्ही…
आरक्षण नाही… रक्षण नाही..
आयुष्य जगण्याच्या कल्पना आम्ही करू शकतो….
पण त्यासाठी पोषक वातावरण नाही…
सरते वर्ष… आशा पल्लवीत ठेवूनच पुढे सरकायचे….
आपले आयुष्य आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा आपल्याच हिमतीवर आपणच पूर्ण करायच्या…
कोणी देईल , कोणी करेल ह्या अपेक्षा नाही ठेवायच्या ….
नरदेह सर्वात समृद्ध जन्म..
पाप पुण्य.. बरे वाईट याचे आकलन असते…
आत्म्याचा परमात्म्याकडे सुरू झालेला प्रवास असतो….
म्हणूनच सरत्या वर्षाला बाय बाय करताना… येणाऱ्या वर्षाचे ज्याने त्याने आपल्या परीने आनंदाने स्वागत करावे…
प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना, सुखाचा उपभोग घेण्याच्या कल्पना वेगळ्या असतात…
म्हणून आपल्या इच्छांचे ओझे दुसऱ्यावर लादू नये…
होता होईल तो मनास जपावे…
मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची….
तू चाल पुढ…. तुला भीती पर्वा कशाची…
अगदी अशीच वाटचाल करावी…
चला इथेच थांबते….
अस्तमानी सूर्य चालला आहे…
त्या तेजाला उद्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आतापासूनच माझ्या नेत्र ज्योतींच्या पायघड्या घालण्यास सुरुवात करते….