फेर घालते मनात माझ्या,
कृष्ण सख्याची रासलीला !
क्रीडा त्याच्या अनंत रंगी,
भुलवीत जाती मम मनाला!
रासक्रीडा तुझी राधे संगे,
राधाकृष्ण अगम्य मीलन!
एक बासरी एकतानता,
कृष्ण भक्तीचे राधा जीवन!
मोरपिसांचे अनंत डोळे,
जणू राधेचे अक्षय ध्यान!
नजर खिळविते राधेची,
मयुरा सम ती वळवी मान!
धुंद सावळ्या सायंकाळी,
कृष्ण मेघांची नभात दाटी !
जणू वाटते कान्हा -राधा,
खेळ रंगला यमुना काठी !