पंढरपुरी वारी जाई ,
विठ्ठलाच्या दर्शनाला l
जाती पाय वेगे वेगे,
आतुरले ते भेटीला …..१
विठू राहे पंढरीत ,
जमे भक्तांचा मेळावा l
माहेराची ओढ जशी,
लागते लेकीच्या जीवा …..२
चहूबाजू येती सारे,
टाळ, चिपळ्या घेऊन l
विठ्ठलाची गाणी गाता,
मन जाई हे रंगून …३
आषाढाची वारी येता ,
वारकऱी मन जागे l
भेटीस आतुर होई,
पांडुरंगी ओढ लागे …४
वारी निघे पंढरीला,
कानी टाळांचा गजर l
वेग येई पावलांना,
राऊळी लागे नजर ….५
जसा जसा मार्ग सरे,
मन होई वेडे पिसे l
डोळ्यापुढे मूर्ती येई,
विठ्ठल सर्वत्र दिसे ….६