आई – उच्चारलेले पहिले नाव
आनंद वेदना प्रत्येक प्रसंगात ओठी येणारे तेच नाव
जवळ असते तेंव्हा नसते भान
आणि नसते तेंव्हा अडते प्रत्येक पान
मोठे झालो दूर गेलो पण
आई पाशी कायम लहानच राहिलो
सण-वार आले की तिच्या हाताची चव आठवते
आणि मनात उमाळे दाटून येतात
मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात तिच्या अनेक आठवणी आहेत
तिच्या मुलालाच फक्त कळावेत असे काही शब्द आहेत
आई असते घरातील एक धागा
घरातील सगळ्या फुलाचा हार करून
त्यांना दाखवते योग्य जागा
पाऊस येतो ओले करून जातो
आईच्या प्रेमाच्या पावसासाठी आपण कायमच आसुसलेले राहतो
वर वर तिचे अस्तित्व जाणवत नाही
ठेच लागली तर तिच्याशिवाय कोणाला साद जात नाही
आई सर्वांची काही वेगळी नसावी
माझ्या सारखीच तुमची असावी
खरच आई बाळाची माउली
आई भर उन्हात शांत सावली
आई दुधातली मलई
आई भांड्यांना तेजावणारी कल्हई
आई जशी कृष्णाने द्रौपदीला दिलेली थाळी
कधीही न संपणारी तिची प्रेमाची झोळी
सर्व मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा !!!