अतिपरिचयात् अवज्ञा।
अतिपरिचयादवज्ञा संततगमनादनादरो भवति।
मलयेभिल्लपुरन्ध्री चन्दनतरुकाष्ठमिन्धनं कुरुते॥
अर्थ :-
(कोणाशीही) अति ओळख (अति जवळीक) आपला मान (किंमत कमी) करते आणि सारखे सारखे (कोणाकडे) जाण्यामुळे आपल्याविषयीचा आदरभावही कमी होतो.
(अहो, आता हेच पहा ना,) मलयपर्वतावर राहणारी भिल्लीण (भिल्ल स्त्री) चंदनाच्या लाकडाचा चुलीसाठी सरपण (इंधन) म्हणून उपयोग करते.
टीप :-
‘अतिपरिचयात अवज्ञा’ या संस्कृत उक्तीचा मराठीतही सर्रास उपयोग होतो.
‘अतिपरिचयादवज्ञा’ हा शब्द योजलेले अजून काही श्लोक पाहू,
अतिपरिचयादवज्ञा संतत गमनादनादरो भवति।
लोकः प्रयागवासी कूपे स्नानं समाचरति॥
अति ओळखीने आपली अवज्ञा होते. आपल्या शब्दाचा मान कमी होतो आणि सततच्या येण्याजाण्याने आदर कमी होतो. (हेच बघा ना) प्रयागनिवासी लोक विहिरीतल्या पाण्याने अंघोळ करतात.
या श्लोकातही आधीच्या श्लोकाप्रमाणेच अतिपरिचय योग्य नाही असेच सुचवले आहे.
प्रयाग हे तिर्थ त्रिवेणीसंगम तिर्थ आहे. तिथे संगमावर अंघोळ करणे हिंदू मान्यतेनुसार पुण्यदायक मानले जाते. देशाच्या सर्वभागातून लोक तिथे संगमस्नानासाठी येतात पण खुद्द प्रयाग वासियांना त्याचे एवढे अप्रूप वाटत नाही. त्रिवेणी संगम स्नानाची किंमत त्यांना नाही. ते आपले घराजवळच्या विहिरीच्या पाण्यानेच स्नान करतात.
आता आपण जो पुढचा श्लोक पहाणार आहोत तो मात्र आध्यात्मिक आशयाचा आहे. पहा,
अतिपरिचयादवज्ञा इति यद्वाक्यं मृषैव तद्भाति।
अतिपरिचितेऽप्यनादौ संसारेऽस्मिन्न जायतेऽवज्ञा॥
अतिपरिचयाने मान कमी होतो हे वाक्य खोटं असावं असं वाटतं. कारण आपल्याला अतिपरिचित असणारा अनादी असा हा संसार (अनादी असे हे ब्रह्मांड जिथे आपण कोट्यावधी जन्म येरझार्या घालतो असे म्हणतात), त्या या संसाराचा लोक अतिपरिचयामुळे अनादर (तिरस्कार) करताना दिसत नाहीत.
अजून एक श्लोक आहे ज्यात चार सुवचने समाविष्ट आहेत तो असा,
अतिपरिचयादवज्ञा। अतिलोभो विनाशाय।
अतितृष्णा न कर्तव्या। अति सर्वत्र वर्जयेत् ॥
अतिपरिचयादवज्ञा
‘पिकते तिथे विकत नाही’ हेच खरे.
जे आपल्याकडे मुबलक प्रमाणात असते त्याची किंमत आपल्याला नसते किंवा जोपर्यंत एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत तिचं खूप अप्रूप असतं एकदा ती गोष्ट प्राप्त झाली की किंमत शून्य.
यावरून निदा फाजलींचा एक उर्दू शेर आठवला,
दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है।
मिल जाए तो मिट्टी है खो जाए तो सोना है।
हा संसार, ही दुनिया ज्याला म्हटलं जातं ते एक जादूचं (मायावी) खेळणं असावं. कारण जोपर्यंत इथे एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत त्या वस्तूला सोन्याची किंमत असते आणि एकदा ती वस्तू मिळाली की तिचं मूल्य आपल्या लेखी मातीमोलाचं होतं.
माझ्याही एका गझलेत अशाच अर्थाचा एक शेर आहे. तो असा,
पाहतो आहेस तू रोखून का शिखरा?
संपते स्वारस्य माथा गाठल्यानंतर फेसबुक व व्हॉटस्ऍप वर ‘अतिपरिचयादवज्ञा’ करणार्यांपासून सुटके साठीच तर ब्लॉक, अनफ्रेंड, डिलिट इ. ऑप्शन्स दिलेले असतात.