आणि उद्याचा दिवस नवीन वर्षाची चाहूल! फरक तो काय एका रात्रीचा….
रात्रभर जागून मला पहायचंय खरंच काही वेगळं होतं का वर्ष संपतानाच्या रात्री?
तोच तर असणार रात्रीचा काळोख…
अवतीभवती नीरव शांतता….
मधूनच केकाटणारे कुत्रे…
कुठे वॉचमनच्या शिट्टी आणि काठी चा आवाज…..
एखाद्या जीवाला आलेली जीवघेणी खोकल्याची उबळ शांतता भंग करून जाते….
मनासारखे घडत गेले की आपण म्हणतो सगळे वर्ष मस्त गेले,
आणि बर्याच गोष्टी विरोधात गेल्या की खूप त्रासाचे आणि कटकटीचे गेले म्हणून मोकळे होतो.
स्वतःच्या सुखा पलीकडे पहाण्याचे धारिष्ट्य करणे जमतच नाही.
कशाला ती प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या वर्षाची मोजमाप करायची? सगळ्या जगाचे कॅलेंडर बदलणार म्हणून!
पण निसर्ग करतो का असा जल्लोष?
डवरलेल्या झाडाचे एखादे पान गळून पडले तर अगणित पानातील एक पान गळून पडल्याने झाडाला काहीच फरक पडत नाही…
तसेच तर या जीवाला मिळालेल्या आयुष्याचे आहे…
हे जगातील अव्याहतपणे निसर्गचक्रात फिरणारे मानवी जीवन पुढे पुढे जाणारे…..
सरले ते संपले….
समोर वाटचाल करत राहायची….
काय दिले काय घेतले याचा हिशोब नको!
निदान मी तरी असे ठरवले आहे..
बरेच वेळा इच्छा असो वा नसो कठोर शब्द वापरले गेले..
त्यामुळे अनेक जण दुखावले गेले असतील…
त्यांनी जमलेच तर मला माफ करावे 🙏
कारण माफ करणं न करणं हे त्या व्यक्तीला कितपत खोलवर जखम झालेली आहे यावर अवलंबून असते. तसेच प्रत्येकाच्या मनासारखे मला वागता येणार नाही कारण माझाही एक स्वतःच्या विचारसरणींचा स्वभाव बनवून गेलेला आहे..
नवीन वर्ष म्हणजे एक प्रकारचे बोनस आयुष्य सुरू झाले आहे…
तो टेक ईट ग्रांटेड करण्यात अर्थ नाही..
प्रथमतः आपली तब्येत सांभाळणे म्हणजेच इतरांना त्रासदायक होणार नाही…
हे पण फार महत्त्वाचे असते..
कारण घरातील एक व्यक्ती जरी आजारी असेल तरी साऱ्या कुटुंबाला त्याचा त्रास होतो..
आर्थिक शारीरिक आणि मानसिक..
म्हणून हा सल्ला मला मोलाचा वाटतो!
प्रत्येकाने पटला तर अमलात आणायचा प्रयत्न करावा 🙏
नवीन वर्षाची शुभेच्छा देताना शक्यतो प्रत्येकाने कमी बोलावे…
मुद्देसूद बोलावे, वाद विवाद भांडणे शक्यतो टाळावीत…
मनात कटूता ठेवू नये..
जिभेवर साखर न का ठेवेना कमीत कमी साखरेची चव आठवावी..
आणि त्याप्रमाणे मवाळ शब्दांचा वापर करावा 🙏
दिवसाच्या चारोप्रहर.. शुभ सकाळ शुभ संध्याकाळ शुभ रात्री असे मेसेज पाठवून आपण ग्रुप मध्ये मानसन्मान मिळवून असतो हा भ्रम दूर करावा.
उत्तम वाचलेले, किंवा त्या ग्रुपशी संबंधित विषय असलेले तेवढेच लेखन अथवा माहिती पाठवण्याचा प्रयत्न करावा 🙏
गेले ते वर्ष आले तेही वर्षच..
स्वागत करूया सहर्ष!
स्वतः सहित इतरांचाही होवो उत्कर्ष!
कामना करते भरभराटीचे यशाचे जावो सर्वांना होईल मनी हर्ष!