कृष्णावळ म्हणजे कांदा! हे मी पहिल्यांदाच ऐकलं आणि मनात त्याचा अर्थ लावत बसले! सहजच व्हाट्सअप डिक्शनरीत सापडले ते असं!कांदा उभा चिरला की तो शंखाकृती दिसतो आणि आडवा चिरला तर तो चक्राकृती दिसतो! ही दोन्ही आयुधे कृष्णाची म्हणून कांद्याला गमतीने कृष्णावळ म्हणतात!
किती छान शब्द मिळाला कांद्याला! आपल्या रोजच्या जीवनात कांद्याला खूप महत्त्व आहे हे आपण जाणतोच! झुणका- भाकरी, कांदा, असं गरिबांचे जेवण! कांदा -भाकर म्हटले की मस्तपैकी भाकरी, फोडून ठेवलेला कांदा आणि झुणका हे पदार्थ डोळ्यासमोर येतात. खरं तर आता सर्वांनाच या पदार्थांची अपूर्वाई झाली आहे!
बाकीचे पदार्थ हॉटेलच मिळतातच, पण अलीकडच्या काळात गरमागरम झुणका- भाकर केंद्र ही तेवढ्यात जोरात चालते! जेवणात कांदा नसेल तर ते जेवण अळणी वाटतं! फार पूर्वी काही समाजात कांदा लसूण हे पदार्थ निषिद्ध मानले जात. इतकं काय वाईट होतं त्यांत हे मला माहित नाही, पण माझं आजोळ कर्नाटकात, तिथे या गोष्टी घरात सुद्धा आणल्या जात नसत!
कांदा लसूण औषधासाठी म्हणून आणलं तर त्याची टोपली अगदी कोपऱ्यात एका बाजूला ठेवली जात असे. त्यामुळे माझी आई सांगत असे तिला कांदा लसूण याची अजिबात सवय नव्हती. अगदी त्याचा वास सुद्धा सहन होत नसे! पण सासरी आल्यावर हे पदार्थ सर्वांनाच लागत त्यामुळे ती हळूहळू शिजलेला कांदा, लसूण तरी खाऊ लागली.
खरंतर कांदा किती गुणदायी! एक तर कोणत्याही सीझन मध्ये मिळणारा आणि बटाट्याप्रमाणेच सर्वांशी मिळतेजुळते घेणारा! असा हा कांदा चातुर्मासात खात नाहीत.. पण मला वाटतं या गोष्टीला पूर्वजांनी एक वेगळा संदर्भ दिला होता. चातुर्मासाचे दिवस हे पावसाळ्याचे दिवस असतात. या दिवसात कांदा पचनासाठी योग्य नसतो तसेच तो बेसन पिठासह भजी, झुणका यात वापरला तर पोटाला आणखीच त्रासदायक! त्यामुळे तामसी आहारात कांदा- लसूण अधिक वापरला जातो असे आजी म्हणे.. अशा संस्कारात वाढलेली मी अजूनही कच्चा कांदा, लसूण फारसं खात नाही!
कांदा उभा पातळ कापून त्यात डाळीचे पीठ घालून केलेली गरमागरम खेकडा भजी , पावसाळ्यात तर अगदी तोंडाला पाणी आणतात! कांदा भजी हा तसा सर्वांच्या चावडीचा पदार्थ. तसेच कोणत्याही तोंडी लावण्यात कांदा घातला की तो पदार्थ टेस्टी बनतो.
आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हे चार महिने म्हणजे चातुर्मास! या काळात आपल्याकडे कांदा लसूण खात नाहीत. म्हणून आषाढ आतील नवमीला आपण कांदे नवमी करतो. आमच्याकडे जवळपासच्या सर्व बायका मिळून कांदे नवमी साजरी करत असत. कांदा भज्यांबरोबरच इतरही कांदे घातलेले पदार्थ घालून बनवलेले चमचमीत पदार्थ एकत्र जमून खाण्यात आणखीनच मजा येई. अर्थात कांदे नवमी केली तरी नंतर चार महिने कांदा खायचा नाही हे व्रत काही फारसं पाळलं जात नाही.
कांदा हा रोजच्या जेवणाचा भाग झाल्याने त्याच्या दराबद्दलही आपण विचार करतो. एरवी शंभर रुपयांला तीन किलो कांदे हा भाव एकदम कडाडतो तेव्हा शंभर रुपये किलो ही कांदा असतो. तेव्हा पावशेर कांद्यातच आपण भागवतो आणि प्रत्येक कांद्याची किंमत कळते! मध्यंतरीच्या काळात हे आपण अनुभवले आहे.
तसा कांदा हा रुचीवर्धक आणि पाचक प्रकृतीचा आहे. कांदा आणि आलं बारीक करून त्याचं मिश्रण घेतले की पोटाच्या तक्रारी कमी होतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने ही कांदा औषधी आहे. त्यातही पांढरा कांदा हा कांद्याचा विशिष्ट प्रकार उन्हाळ्यात पोटाला थंड म्हणून वापरला जातो. त्याच्या छान माळा बांधून भोर, लोणावळा या भागात विक्रीसाठी दिसतात. कोवळी कांद्याची पात ही आपण भाजीसाठी वापरतो.
थंडीच्या दिवसात कांद्याची पात, छोटे कोवळे कांदे बाजारात दिसू लागतात. महाराष्ट्रात कांद्याचे पीक बरेच घेतले जाते. लोणंद, नीरा या भागात तसेच नाशिक जवळच्या भागात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. एक ‘कृष्णावळ’शब्द वाचला आणि तो कांद्यासाठी हे कळले. लक्षात आले की कृष्णाने या निसर्गाची निर्मिती करताना किती विचारपूर्वक केली आहे.
मानवाला आवश्यक असे सर्व धान्य, भाजी, फळे यांची निर्मिती त्या त्या ठिकाणी केली आहे. ही निसर्ग किमया आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसते. आमचे एक स्नेही म्हणतात,” प्रत्येक गोष्टीत तुम्ही कृष्ण पहा म्हणजे सारे जगत कृष्णमय वाटू लागेल” आज तरी मला कांद्याची कृष्णावळ पाहताना मनात विचार आला, “कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी” हे सावता माळ्याने म्हटले आहे ते खरेच आहे! सर्व गोष्टीत हा ‘कृष्ण’ आहेच की!