चांदोबाच्या गोष्टीतला चांदोबा तू !
माझे सारे बालपण व्यापून टाकलेस !
कधी भाकरी सारखा गोल गोल,
तर कधी चवथीच्या कोरी सारखा !
मामाचा वाडा चिरेबंदी ठेवणारा,
आणि लिंबा मागे जाऊन लपणारा !
तारुण्यात येताना तुझ्या साक्षीने,
आणाभाका घेतल्या,
तर लग्नानंतर मधुचंद्रात
तू मिरवलास !
नंतर मात्र…
माझ्या बाळाच्या संगतीत
मी तुझ्याशी भावाचे नाते जोडले!
आणि तू चंदा मामा झालास !
पुढे पौर्णिमा ते संकष्टी..
दिसलास तू आभाळी ..
बदलत्या रूपात, आकारात...
तुझे सहस्रचंद्र बघणारा
किती भाग्यवान !
म्हणून सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यात,
तुझा किती मान!
असा तू चांदोबा,
सगळ्यांचा लाडोबा !
बालपणापासून वार्धक्यापर्यंत,
सर्वांना लोभवणारा….
आणि मला भुलवणारा ….