सरली दिवाळी,
जपू मनी आनंदाचे क्षण!
प्रत्येक दिवाळीची,
मनी असे वेगळी आठवण!
वसुबारस ते भाऊबीज,
दिवस असती प्रकाशाचे!
तोच प्रकाश मनात राहो,
दिवे उजळीत अंतरीचे !
स्नेहभाव वाढीस लागे,
उणी दुणी विरघळून जाती!
दीपावलीच्या आनंदात,
झरती स्नेहाच्या बरसाती!
रेखते अंगणी रांगोळी,
ठिपक्यांची अन् नक्षीची!
तशी राखावी सर्वांची अंतरे,
रेखीव, सुंदर नात्यांची!
असेच राहो मन आनंदी,
निमित्त कशाला दिवाळीचे?
प्रार्थना करू ईश्वराची,
निरंतर राहो सौख्य मनाचे!