माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची
वेळ येताच कठोर होई
जणु धार पोलादाची..
ज्ञानराये आणिली गीताई
माझ्या मराठी भाषेत तुका नामया ची उजळली वाणी करता रचना भावभक्तीच्या अभंगांची..
माझी भाषा मराठी आहे
अमृताच्या गोडीची ll१ll
कानामात्रा अनुस्वार वेलांटी माझ्या भाषेचे वळणच आगळे
सज्जनांसी वाटे मायाळु
परी मान झुकविते ती गर्वाची
माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll२ll
कडेकपाऱ्यांतुन, अवखळ पाण्यातुन बदलते तिची हो धाटणी
येता प्रवाह सारेच एकत्र
वाहे खळाळत सरीता मराठीची..
माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll३ll
राजा शिवाजी चे स्वराज्य उभे या पावन मातीत
अजुनही गाते मायमराठी किर्ती शिवबाच्या पराक्रमाची..
माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll४ll
पु.ल. व.पु. कुसुमाग्रज आणि कितीतरी या भाषेची लेकरे
अजोड केली निर्मीती त्यांनी मराठीच्या साहित्याची..
माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll५ll
गदिमा शांता, सुरेश वसंत आणि मंगेश शब्द ज्यांचे दिवाणे
गळा मराठीच्या घालती माळ तेजस्वी शब्दमोत्यांची..
माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll६ll
लता, आशा, आणि अनेक गान सम्राज्ञी
तारा झंकारत्या वीणेच्या
मिरवीती अभिमानाने खांद्यावरी पताका ही मराठीची..
माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll७ll
श्रेष्ठ साऱ्या जगतात माझी ही मायबोली
झरती धारा अमृताच्या
ही वीणा जणु माय सरस्वतीची..
माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll८ll