अय्या, ईश्श झालंय टाईमबार
आता, शोना-बाबू बोल ना यार
अडगुलं मडगुलं ज्यांनी म्हणायचं
तेच झालेत आता स्वीटू बेबी
सगळंच चाललंय खुल्लमखुल्ला
गायब झाली स्वप्नांतली छबी
येता जाता सगळ्यांनाच
प्रसादासारख्या मिठ्या नी पापे
गडबडून जातात सगळे
अचानक मोबाईलवर पडता छापे
अबोल आणि अबोध प्रेम
लुप्त झालंय का काळाच्या पोटात?
कामाशिवाय पती-पत्नींनाही
प्रवेश निषिद्ध एकमेकांच्या गोटात..
पुन्हा वाटतं कधीतरी द्यावा
व्हाईटवाॅश वर्तमानाला
लाजरं-बुजरं रंगवून टाकावं
प्रत्येकाच्या मनाला
हळूच उलगडत जावी
अलवार नात्यांची गोडी
त्यात विहरू दे पुन्हा
अय्या न् ईश्श ची जोडी..