परिस्थितीच्या धक्क्यांतून अन् जवळच्या नातेवाईकांच्या धोक्यातून…
कणखर बनत गेलीस !
घडवलंस स्वतःला…स्वतःचीच सोबत घेऊन…
पुस्तकांचीही साथ मिळाली तूला..तूच निवडलंस त्यांना विश्वासू सोबती म्हणून….
शब्दांवरची पकड घट्ट केलीस !
झिडकारली गेलीस..समाजाकडून..टाकली गेलीस..
तरी तुटली नाहीस..झुकली नाहीस
वाकड्या मार्गाला गेली नाहीस…
मनाचा अंतर्दिप विझू दिला नाहीस !
अनेक अनाथांची माय झालीस..उभं केलंस त्यांना..या सोसाट्याच्या वादळात
सन्मानानं नि जबाबदारीनं राहणारे नागरिक घडवलेस…तूझ्या आश्रमशाळेत..
सिंधु संस्कृतीचं विद्यापीठच झालीस !
तूझं बोलणं ऐकत रहावं असं…सर्व विषयांना स्पर्श करणारं
अनेक पुस्तकांचं सार तूझ्या आयुष्यात उतरलेलं…
अखंड ऊर्जेनं तू बोलायचीस…नि उच्चशिक्षितालाही लाजल्यागत व्हायचं !
समाजानं तूला दगा दिला…पण तू त्याच समाजाला धडा दिलास…
समाजानं पाजलेलं विष पचवून…समाजाला तू अमृतच दिलंस !
तूझे ऋण अनाथांबरोबरच समाजावरही राहतील !