मानवाने जन्म घेऊन कळतनकळत या वसुंधरे वर अनन्वित अत्याचार केले आहेत. मीही त्यातीलच.
हे जन्मभूमी वसुंधरे तू
तव उपकाराच्या ऋणात कृतघ्न मी
हिमाच्छादित सोनकिरणांची शुभ्रता तू
उजाड पर्वतावरील काळाकभिन्न कातळ मी
शांत सोज्वळ अखंड प्रवाहित गंगा तू
उथळतेने स्तोम माजविणारा जलप्रपात मी
शितलतेची मूर्त तरुरुपी सावली देणारी तू
परावलंबी खुरटे खुजे बांडगूळ मी
आसेतू हिमाचल द्वीपसमूहास बांधणारी तू
वंश जात धर्म प्रांतात अडकणारा मी
प्रेमपाखर अथक वृद्धिंगत करणारी तू
फाटक्या झोळीचा कायम याचक मी
वरदानांची नित्य बरसात करणारी तू
दे बुद्धी लवकर कधी उतराई होणार मी.
1 thought on “”
Comments are closed.
फारच सुंदर कविता सुनील…
अशाच छान छान कविता लिहीत जा तुझ्या पुढील लिखाणास खूप साऱ्या शुभेच्या…