भूतकाळ इतिहास जमा झालेला, भविष्य काहीच नाही, आणि वर्तमान काळ व्यतीत होत नाही, मग करायचे काय? तारुण्याची उतरंड झालेली, अंगातील रग तोंडावाटे बाहेर पडणारी आणि स्वतःच्या प्राक्तनाने सगळे असून एकाकी जीवन जगत असलेली, तिरसट, अर्धवट, मूर्ख, सरकलेली आणि डोक्यावर परिणाम झालेली अशी बिरुदे तिच्या नावाआधी लागलेली’ ती ‘.. समाजामध्ये मान सन्मान मिळावा म्हणून स्वतःच्या जीवावर उदार होऊन प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावून अनाठाई पण’ तिच्या’ दृष्टीने मोलाचा सल्ला देण्याचा प्रयत्न करत असते, तिला स्वतःचे असे नाव नाही.
पण या टेक्नोसॅव्ही जगात अशा कितीतरी ( ती ) नावाच्या स्त्रिया असहाय जिणे जगत आहेत, कशाला करतात ह्या इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात लुडबुड,? शांत बसवत नाही का?, पण नाही… वयाचा फायदा घेऊन आम्ही तर काय चांगला सल्ला देण्याचे किंवा चांगले सांगण्याचे काम करतो तुम्हाला ऐकायचे तर ऐका असे त्यांचे म्हणणे… आपले ऐकावे हाच हेका असतोच..
असो, एकंदरीत ती स्वतःही अन साऊंड असते आणि दुसऱ्याना पण आपल्याच रेषेत आणून ठेवण्याचा प्रयत्न करते.
म्हणजे या कोणी तथाकथित, सो कॉल्ड, ‘ती’ आहेत, त्या सर्व समाजव्यवस्थेमध्ये मोठी ‘ समस्या ‘ आहेत, यांचे प्रश्न कोण सोडवणार? कोणीच नाही ! कारण समाजाला म्हणजेच त्यात आपणही येतोच, एक घटक म्हणून आपणही आपला ‘नाकर्तेपणा ‘लपवु शकत नाही.
आणि मग’ ती’ नावाची समाजामध्ये अक्राळ विक्राळ रूप धारण करून सतत समोर येत राहते, तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी, तिचे तिच्या जगण्यासाठी असलेले एकमेव हत्यार म्हणजे जे तिला मिळालेले एकाकी जगण्याचा शाप, आणि त्यातून मुक्त न होता तेच धारदार शस्त्र म्हणून इतरांचे आयुष्य सपासप’ वार’ करून इथे’ वार ‘म्हणजे सल्ला, अनुभव आणि स्वतः दिलेला अन्यायाविरुद्ध लढा, किंवा केलेली धडपड हे तिचे ‘वार ‘होत..
‘ ती ‘तिच्याच सारख्या तिच्या दृष्टिकोनातून, हा मुद्दा महत्वाचा… पीडित असलेल्या तिला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसते, वेळप्रसंगी स्वतःची दमछाक करून घेते, अपमान सहन करते, आणि मग जेव्हा हाच समाज’ तिला ‘तुझे आयुष्य तु जग.. आमच्या भानगडी मध्ये हे पडू नकोस म्हणून तिला धुडकावून लावतो..
आणि ‘ ती ‘ परत आपल्याच कोषात एकाकी जीवन कंठत रहाते, सतत विचार करते की,’ मीच चुकले का?, माझेच चुकले का? बिचारी.. या प्रश्नांच्या भेंडोळ्यात एक त्यातीलच ‘ चीटोरा ‘कस्पट म्हणून भिरभिरत रहाते…