स्वातंत्र्याच्या वेदीवरती,
किती आहुती पडल्या होत्या !
नाही त्यांची गणती काहीच,
आज घडीला स्मरूया त्या!
आद्य जनक ते स्वातंत्र्याचे,
लक्ष्मीबाई अन तात्या टोपे!
त्यांचीच धुरा हाती घेती,
शूरवीर वासुदेव फडके!
टिळक, आगरकर जगी या आले,
स्वातंत्र्य सूर्याची आस घेऊनी!
गांधीजींचे आगमन झाले ,
सत्त्याची ती कास धरूनी !
स्वातंत्र्यनभी सावरकर तळपले,
क्रांतीची ती मशाल घेऊनी !
भगत, राजगुरू, सुखदेव गेले,
फासा वरती दान टाकुनी !
पंच्याहत्तर वर्षे स्वातंत्र्याची,
कशी उलटली वेगाने !
घोडदौड देशाच्या प्रगतीची,
चाले लोकशाही मार्गाने !
देशाची सर्वांगीण प्रगती,
ध्येय हेच धरू या उरी !
शतकाकडे जाई वाटचाल ही,
जगास दाऊ स्वप्ने खरी!