गाऊया क्रांतीचे गुणगान
क्रांतीविरांच्या पराक्रमांचे
स्मरणचि हा सन्मान।।ध्रृ।।
संसारी ना ध्यान तयांचे
शिर तळहातावरी
स्वराज्यप्राप्ती श्वास जयांचे
ध्यास उरी अंतरी
हास्य मुखावरी फासावरी ते चढले
शूर जवान
गाऊया क्रांतीचे गुणगान।।१।।
मंत्र करेंगे मंत्र मरेंगे
मंत्रघोष गाजला
ज्योतीने चेतवीत ज्योती
क्रांती घोष गर्जला
गुलामगिरी घन तिमिरी विलसे
क्रांती सूर्य महान
गाऊया क्रांतीचे गुणगान।।२।।
स्वातंत्र्याच्या वेदीवरती
आनंदे बलिदान
नाम कुणाचे अनाम कोणी
सार्थ वेचिले प्राण
स्वतंत्रतेच्या संग्रामातील सैनिक
सर्व महान
गाऊया क्रांतीचे गुणगान।।३।।
अमृत उत्सव स्वातंत्र्याचा
आनंद उत्सव हा
स्वातंत्र्यास्तव प्राण वेचिले
शहीद त्यांचा हा
कृतज्ञ आम्ही कधि न विस्मरु
नित्य करु सन्मान
गाऊया क्रांतीचे गुणगान।।४।।