‘कशी आहे ती?’ नारीशक्ती वरील एक लेख सहज वाचनात आला! खरंच कशी आहे स्त्री?-स्त्री ही घराची शोभा! संसाराचा गाडा ओढणारी, कुटुंबाशी निगडित असलेली व्यक्ती! फार प्राचीन काळी गार्गी, मैत्रेयी सारख्या विद्वान स्त्रिया होऊन गेल्या. त्यानंतरच्या काळातही अहिल्या, द्रौपदी, तारा,सीता, मंदोदरी यासारख्या पंचकन्यांना स्त्री सन्मान मिळाला.त्यानंतर जिजाऊ,राणी लक्ष्मीबाई, ताराराणी यांसारख्या कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या. पण मध्यंतरी चा एक काळ असा आला की स्त्रीला चूल आणि मूल या चक्रात अडकून पडावे लागले. तेव्हा स्त्रीशिक्षणाचा अभाव होता. पुरुषप्रधान संस्कृतीच्या वलयाखाली स्त्री चे अस्तित्व दडपले गेले. कुटुंब सांभाळणारी, आल्या गेल्याचे स्वागत करणारी, वेळप्रसंगी एक हाती संसार करणारी हेच स्त्रीचे रूप राहिले. संसार रुपी रथाची दोन चाके म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांचा विचार आपण करतो. स्त्री हे चाक असे काही पेलून धरते की, कधीकधी दोन्ही चाकांचा बोजा तिच्या अंगावर असतो. स्त्री ही अशी गृहिणी, सहधर्मचारिणी असते!
पूर्वी स्त्रियांना शिक्षण कमी होते, पण व्यवहारज्ञान मात्र खूप होते. पैसा कमी होता पण असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग जास्तीत जास्त कसा करता येईल याकडे लक्ष असे. त्यामुळे स्त्री काटकसरीने संसार करून तो यशस्वी करून दाखवत असे.
श्यामची आई मधील आई ही अशीच गरिबीत राहून स्वाभिमानाने संसार करणारी स्त्री होती. त्याकाळी कित्येक विधवा स्त्रियांना संसार करून मुलांची, कुटुंबाची जोपासना करावी लागली आहे. माझीच आजी एका मोठ्या घरातील होती.पतीच्या निधनानंतर शिक्षण नाही, हातात पैसा नाही, मुलांची शिक्षणे व्हायची होती, अशावेळी तिने न डगमगता संसार केला. मोठ्या घरातील फक्त दोन-तीन खोल्या स्वतःकडे ठेवून बाकी सर्व खोल्या विद्यार्थ्यांना रेंट वर दिल्या आणि त्या भाड्याच्या पैशात रोजचे व्यवहार भागवायला सुरुवात केली. घर हाच तिचा मोठा आधार होता. हातात असलेले दागिने विकून मुलांची पुढील शिक्षणे केली. त्यानंतर सुनांसाठी पुन्हा सोने खरेदी करून दागिने करून घातले. स्वतःच्या कर्तृत्वाने असे घर सांभाळणाऱ्या त्या काळातील अनेक महिलांच्या गोष्टी आपण ऐकतो.
काळाच्या ओघात शिक्षणाबरोबर स्त्रीच्या कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावल्या आणि स्त्री पुरुषाशी बरोबरी करता करता त्याच्यापुढे कधी निसटून गेली हे कळलेच नाही! आज प्रत्येक आघाडीवर स्त्री पुढे आहे. अवकाश क्षेत्र, संशोधन, संरक्षण क्षेत्र, राजकारण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेतच पण रोजच्या जीवनातही बरेचसे व्यवहार स्त्रिया सांभाळतात. पूर्वी मुलांवर असलेली माया, प्रेम स्वयंपाकघरातील कुशलतेवर अधिक दिसत असे. मुलांना स्वतः करून चांगले चांगले खाऊ घालणारी, प्रेमाने घास देणारी,कोंड्याचा मांडा करणारी स्त्री आदर्श होती. पण नंतरच्या काळात नोकरी करून, स्वतःची ओढाताण करून मुलांसाठी घरी पदार्थ बनवणारी स्त्री हळूहळू कालबाह्य झाली. कामावरून घरी येतानाच वडापाव, दाबेली, केक यासारखे पदार्थ घरी येऊ लागले, तर काही वेळा ऑर्डर करून आणलेल्या पिझ्झा मुलांना खुश करू लागला. काही ठिकाणी घरी स्वयंपाकाला बाई ठेवून ती गरज भागवू लागली. काही तडजोडी कराव्या लागल्या, पण त्याला इलाज नव्हता. त्यांची मुलांवरील माया, प्रेम कमी झालं असं नाही, पण दिवसभर ऑफिस काम करून घर सांभाळणे ही तिच्यासाठी तारेवरची कसरत होती. शेवटी तिच्या कष्टानाही मर्यादा असतेच ना!
अपूर्ण….