एका रात्री पाहिला बहावा,
चंद्र प्रकाशी बहरताना!
गुंतुन गेले हळवे मन माझे,
पिवळे झुंबर न्याहाळताना!
निळ्याशार नभिच्या छत्राखाली ,
लोलक पिवळे सोनसावळे!
हिरव्या पानी गुंतुन लोलक ,
सौंदर्य अधिकच खुलून आले!
शांत नीरव रात भासली,
जणू स्वप्नवत् स्वर्ग नगरी!
कधी न संपावे ते अपूर्व क्षण,
आस लागली मनास खरी!
फुलल्या बहाव्याच्या मिठीत,
सामावून अलगद जावे!
मृदू कोमल स्पर्शाने त्याच्या,
अंगोपागी बहरुन यावे !