अनंत चतुर्दशी झाली! आज सकाळ उगवली, तीच मुळी मरगळलेली! सकाळी उठून बाल्कनीत गेले तर मागच्या कॉर्पोरेशनच्या मैदानावर वेगळेच दृश्य दिसत होते. कॉर्पोरेशनचे कामगार कामावर येऊन स्वच्छता मोहीम सुरू झाली होती.
कालपर्यंत मंगलमय वातावरणात असणारे ते ठिकाण, आज अगदी मांडव परतणे झाल्यावर दिसणाऱ्या लग्न कार्यालयासारखेच दिसत होते! जिकडे तिकडे कागद, फुलांचे निर्माल्य, डेकोरेशनचे मोडके तोडके साहित्य, आणखी काय काय!
तिथे दोन मोठे पाण्याचे टॅंक गेले दहा दिवस पाण्याने भरून ठेवले होते. प्रत्येकाच्या गणेश विसर्जनाच्या पद्धतीप्रमाणे- दिवसाप्रमाणे रोज गणपती विसर्जनासाठी लोक येत होते. बाजूलाच कचरा टाकण्यासाठी निर्माल्य कुंड होते. कोणी त्यात व्यवस्थितपणे कचरा टाकत, तर कोणी दुरूनच फेकत! ज्यामुळे कुंडा बाहेरही कचरा! आरती साठी दोन टेबले होती, जिथे गणेश मूर्ती ठेवून लोक बाप्पाची आरती म्हणणे, नारळ फोडणे, पुन्हा पुन्हा देवाला ‘लवकर ये पुढच्या वर्षी’ अशी प्रार्थना करून मगच गणपतीला उचलत होते!
आज सकाळी ते मोठे पाण्याचे टॅंक ग्राउंड वरच ओतले गेले. तळाशी राहिलेली माती खोऱ्याने काढली जात होती. रंगीबेरंगी पाण्याचे ओघळ बाहेर लांब पर्यंत वाहत होते. गेले २/३ पाऊस असल्याने आधीच भिजलेले ते मैदान आता आणखी चिखलमय दिसत होते.जणू काही सगळ्याचेच विसर्जन झाले होते. शेवटी गणेशाच्या मूर्तीची माती या जमिनीतच मिसळून जात होती. मन भरून आले! कालपर्यंत देव्हाऱ्यात विराजमान झालेल्या या मूर्ती आज पुन्हा मातीत मिसळल्या! मातीचा होतो, मातीत मिसळलो याप्रमाणे! मधला काळ म्हणजे फक्त रंगमंचावरील काही काळाचे आगमन असंच वाटलं मला!
नकळत मनात आलं, शेवटी आपण म्हणजे तरी काय जन्माला येतो ते मातीचा गोळा म्हणून! त्याला घडवत आकार देत वाढवले जाते. आयुष्याच्या बालपण, तरुणपण, वृद्धत्व अशा अवस्था अनुभवत शेवटी मातीलाच मिळतो. पार्थिव गणेश आपल्याला हेच सांगतो. ‘या जगाचा मोह करू नका, हे तर सोडून जायचंच आहे, पण जोपर्यंत देहात आहात, तेव्हा चांगलं काही करा. प्रत्येक क्षण आपल्या आयुष्याचा उत्सव असू दे!.’ जगण्याची ही उर्मी, आनंद आपण या गणेशा कडून शिकला पाहिजे….
कालच वाचनात एक कविता आली….
तळाशी जाता जाता,
आधी अंगावर लागलेली कौतुकाची निर्माल्य उतरवून ठेवायची..
मग अपेक्षांचा अबीर बुक्का तरंगू द्यायचा पाण्यावर..
अलंकाराचे ओझं हलकं करायचं, कालांतराने..
स्वतःला गोंडस बनवणारे रंगाचे थर विरघळू द्यायचे..
इतरांनी आपल्यावर चढवलेले श्रद्धेच्या पताका, दैवत्वाची झालर सोडून द्यायची,
आणि त्याच मातीचा भाग व्हायचं,
जिथून आपण आलो होतो..
पुन्हा एकदा तितकंच गोंडस रूप घेऊन येण्यासाठी,
बाप्पा जाता जाता सुद्धा बरंच काही शिकवून जातो…’
अशी एक सुंदर कविता आज व्हाट्सअप वर वाचायला मिळाली. कवी कोण आहे ते लिहिले नव्हते, पण अगदी सुंदर शब्दात बाप्पाच्या जाण्याच्या रूपाची सांगता या कवितेत व्यक्त झाली आहे, ती आपल्याला बरंच काही शिकवून जाते!
‘गणेशोत्सव’ हा आता आपल्या सामाजिक जीवनाचे एक अंग झाला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य प्रती जागरूकता आणि एकत्र येण्याची वृत्ती वाढावी म्हणून गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले. स्वातंत्र्य तर मिळाले, पण सार्वजनिक गणेशोत्सव मात्र वाढत्या प्रमाणात साजरा होऊ लागला..
त्याचे काही चांगले, काही वाईट असे रूप आता आपल्याला बघायला मिळते.
गेला महिनाभर सार्वजनिक गणेशोत्सवाचे कार्यकर्ते राबत असतात. आपला देखावा अधिकाधिक चांगला, नाविन्यपूर्ण होण्यासाठी धडपडत असतात. तात्कालीन नवनवीन विषयांचा विचार करून त्यावर आधारित देखावे, जसे यंदा चांद्रयान मोहीम, पुण्याची मेट्रो यासारखे उत्तम उत्तम देखावे उभारले गेले. काही मंडळे समाजोपयोगी कार्यक्रम यानिमित्ताने आखतात. जसे रक्तदान शिबिरे, गरजूंना मदत, वेगवेगळ्या स्पर्धा…. या उत्सवामुळे समाजातील सर्व थरातील लोकांना काम मिळते. उद्योग धंदा वाढतो, त्यामुळे पैसा खेळता राहतो. नवीन पिढीसाठी हे उत्साहाचे टॉनिक असते. शाळा शाळातून गणपती पूजा, अथर्वशीर्ष या गोष्टी मुलांना शिकवल्या जातात. शाळेतील गणपतीचेही चांगले डेकोरेशन केले जाते. मुलांच्या रोजच्या शाळेच्या चाकोरीबद्ध जीवनात हा एक चांगला बदल असतो. आनंददायी अशा या गणेशोत्सवाची सांगता आज झाली.
या बुद्धी दात्या गणेशाला आनंदाने निरोप घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा त्याच्याकडून घेऊया, म्हणजेच या गणेशोत्सवाची खरी सांगता झाली असे म्हणता येईल! जय गजानन!