अवतीभवती सगळे इमोजी🤗…
गंमतच नाही का ही! ईमोजी हा शब्द अगदी नवीन नवीन आलाय माझ्या डोक्यात…. म्हणजे शिरलाय….. जसे मोबाईल फ्रेंडली झाले तेव्हापासून, सुरुवातीला असे काहीतरी चित्रविचित्र तोंडे कोणीतरी व्हाट्सअप वर पाठवली की कळायचेच नाही! हे काय? असले तोंड काय? मग मुले सांगायची’ अग हे इमोजी आहेत’म्हणजे तुमच्या भावना व्यक्त होणारे चेहरे! रडके, हसणारे, रागावलेले आणि त्यातील असंख्य प्रकार…. म्हणजे त्या त्या कृतीची किती खोली आहे असे दाखवणारे….
मग काय लागला मला चाळा😀 …. कुठे गेले की प्रत्येकाचे चेहरे न्याहाळण्याची खोड लागली…. आणखी समोरील चेहऱ्यासाठी कोणता ईमोजी योग्य आहे याचा शोध सुरू व्हायचा सापडला की स्वतःचे स्वतःला अफाट हसू यायचे…. बरे तर बरे माझा चेहरा मला कोणत्या इमोजी सारखा आहे हे कोणी सांगितले नाही आणि माझे मला पण कळले नाही….
एकदा खूप वेळ आरशासमोर उभे राहून तोंड वेडेवाकडे करून, डोळे तिरळे मोठे करून, चित्र विचित्र हावभाव करून पाहिले, पण ओळखणे शून्य….. माझ्या मनात आले बहुतेक आपल्या सारखा चेहरा असलेला इमोजी अजून सापडलाच नसेल…. एकदम युनिक…. आणि परत एकदा माझे मला तुफान हसू आले… तसं असा विचार आणि असले प्रकार करायचे माझे वय नाही… तरीपण कृती तर केली…
खरे तर बरेच काही लिहावेसे वाटते या इमोजी वर. अगदी आपल्या घरातला मेंबर असल्यासारखे झाले आहे. पण जरा आवरते घेते, नाहीतर कोणी’बकवास’ ‘ओकारी’ सारखा ईमोजी टाकून मोकळे होतील…. कसा जोक केला म्हणून स्वतः चे हसतेय हा हा हा…
आज काल सगळी लहान मुले अगदी हुबेहूब इमोजी सारखी तोंडे करून आपले म्हणणे न बोलता व्यक्त होत असतात. आश्चर्य आहे हे इतके सुंदर कसब कसे काय आत्मसात केले असेल त्यांनी. पण बरे झाले, शब्दांचे पाल्हाळ लावून आपल्या मनातील तगमग, आनंद, मनातील विचार पटकन एका इमोजीत व्यक्त करता येतात…. फॉरवर्ड करायला सोपे…. समजणाऱ्याला समजायला सोपे….
नुसते आपले इकडून तिकडे इमोजी गडे…..
शब्द गेले कुणीकडे…..