दुःखालाही कंटाळा आला,
वास्तव्याला राहण्याचा !
सतत प्रश्न अन् कटु सत्याला,
संगत घेऊन जगण्याचा !…..१
कोण तू अन् कोण मी,
आपण सारे भाग सृष्टीचे
उत्पत्ती अन् लय यांचे,
साक्षी निसर्ग किमयेचे !….२
कुठे, कसे, कधी जन्मा यावे,
हे तर आपल्या हाती नाही
लक्ष योनीतून फिरता फिरता,
जगी काळ घालवतो काही !…३
धागे सारे मोह मायेचे ,
उगीच बांधतो स्वतःभोवती
मोहवणाऱ्या जगी जिवाला,
गुंफून घेतो अवतीभवती !….४
सत्य चिरंतन मना उमगते,
जेव्हा येते कधी आपदा
निमित्त मात्र ही असतो आपण,
भू वरी या सदा सर्वदा !…५