‘ती’ असता तुझ्या सोबत फिरताना मला कसलीच भीती नसते. तिच्या साथीने मग निवांतपणा लाभल्यासारखे वाटते, तुझे ते बेफाम होणे, क्षणार्धात कोसळणे, चिंब चिंब भिजून जाणे, पण तिच्या साथीने सुसह्य होते.
तसं बघायला गेले तर, तुझ्यापुढे ती नाजूक नार ! पण तुझ्यासोबत उघडपणे फिरताना जेवढा संकोच वाटतो ,तेवढेच ती सोबतअसताना आश्वस्त वाटते.
तिच्याशिवाय तुझ्यासोबत फिरणे मला मान्य नाही. माझ्यापेक्षा समाजाला, समाजातील नजरांना, ते मान्य होत नाही. त्यांच्या नजराच ते सांगून जातात… तुझे ते बेफाम बेधुंद वार्यासवे धडकणे, मोठमोठाल्या जल बिंदूंनी वाट्टेल तसे भिजवून जाणे, माझं नखशिखांत भिजणे, खरे तर मलाच फार आवडते ❤️ पण ते जनमानसात योग्य नसते ना! म्हणून तिला सोबत घ्यावे लागते.
ती असताना बघणाऱ्यांच्या नजरा पार बदललेल्या असतात. त्यांच्या नजरेत एक प्रकारचा पारदर्शक पणाचा बुरखा जाणवतो. कारण मग तिच्या सोबत असताना माझे वागणे शालीन, कुलीन व घरंदाज होऊन जाते. स्वैर पणाचा लवलेशही नसतो. आणि हे ही समाजच ठरवतो 😀
कारण’ती’कुलवंत स्त्रीप्रमाणे माझ्यासोबत असते. मग तिच्या अंगावरील वस्त्र जीर्णशीर्ण झालेले का असेना, ते फाटून तिच्या देहाच्या काड्या चारी बाजूंनी दिसल्या तरी चालतील!तिचे फाटके वस्त्र… तुझ्या स्वैराचारी वर्तनाने कोसळताना ! तिच्या देहापासुनी उलटेपालटे झाले तरी चालेल! माझे सर्वांग भिजलेले असले तरी, मी सुरक्षित नजरेने न्याहाळली जाते, कुलीन ठरते, तुझ्यामुळे झालेली माझी परिस्थिती, ही तुझ्यावरच रोष दाखवून निवळली जाते. मला एकदम सुरक्षितता जाणवते 😀😀
ती असताना तुझ्याबरोबर भिजताना कसलीच तमा बाळगण्याचे कारण नसते, तू कितीही लगट केलीस, तरी ते कोणत्याच नजरांना आक्षेपार्ह वाटत नाही. कारण मी घरंदाज ठरते..
पण तिच्या शिवाय तुझ्यासोबत फिरले तर, सारे जगच माझ्याविरुद्ध जाते. माझ्या तुझ्या सोबत फिरण्याला निर्लज्जतेचा साज चढवला जातो. दूषित नजरा मला विद्ध करतात. अनेक बोचरे टोमणे, माझ्या हृदयाला विव्हळ करतात. अगदी लाज सोडली वाटते! थोडे थांबायचे ना.. कुठेतरी आडोसा पाहून, तुझ्या माझ्या ताटातुटीची वाट पाहायची असे सूचित केले जाते….
मनातल्या मनात मी फार आनंदी असते, अगदी तुझा प्रत्येक थेंब अमृताचा भास होत असतो, गोड शिरशिरी, थंडगार वाऱ्यासवे भिजताना मन अगदी प्रफुल्लित उल्हासित होते, मी मस्त एन्जॉय करते (. पण सोबत ती असताना )😀 ती माझी खरी सखी आहे कारण फक्त तिलाच तुझ्या माझ्या प्रेमाचे गुपित माहित आहे.
सारी गंमत नाही का? एवढीशी ती माझ्या सोबत असताना, आणि नसताना किती हा समाजातील नजरांचा घोळ आणि तुझा माझा खेळ…..
दरवर्षी वर्षांसमयी… फार फार आवडते….