रखुमाई नाजूकशी
सावळा रांगडा विठ्ठल
जोडी जमली कशी
मला पडे नवल
नाथांच्या घरी
हा भरे पाणी
जनीच्या मागे धावे
शेण्या उचलूनी
कबिर गाई दोहे
हा विणतो शेला
नाम्यासाठी हा
उष्टावतो काला
ज्ञानोबांसाठी हा
भिंत चालवतो
तुकोबांचे बुडलेले
अभंग वाचवतो
दामाजीनी गरीबांसाठी
रीती केली कोठारे
विठू महार होऊनी
हा परत ती भरे
चोखामेळा , गोरा कुंभार
याच्या भक्तांची किती गणती
आस लागलेल्या बायकोची
याला नसे काही भ्रांती
काळाचेही रहात नाही
याला काही भान
वाटेकडे डोळे रख्माईचे
लावूनी तनमन
भक्तांच्या हाकेला
हा सदा धावून जातो
शेजारच्या रखमाईला
मात्र विसरुनी जातो
मुलखाची भाबडी
माय भोळ्या भक्तांची
भाळली काळ्यावर
युगत ना कळली तयाची
विठूसंगे नाव सदा
येते रखुमाई
बरोबर असून नसे जवळ
रुसतसे बाई
याच्यासंगे राबे ही
सर्व भक्तांच्या घरी
बोल कोणा लावावा
तिचाच तो सावळा हरी….