भरतीमुळे उधाणलेला दर्या. अधीरतेने किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या त्याच्या असंख्य लाटा अन आता नुकताच विरघळेल आणि समुद्राच्या विशाल कवेत सहज सामावून जाईल असं वाटणारा तांबूस लाल रंगाचा गोळा … दिवसभराच्या श्रमाने तप्त आणि थकलेला देह श्रांत करायला जणू त्या अथांग जलाशयात उतरणारा तो तेजोनिधी लोहगोल. जाता जाता त्यानेच आसमंतात चितारलेले तांबूस लाल किरमिजी रंगाचे फटकारे आणि ह्या सर्वावर कडी म्हणजे समुद्राचा धीर-गंभीर गाज …
आज तिला न मला आमच्या आवडत्या ठिकाणी यायला अंमळ उशीरच झाला. शांत समुद्र किनारा, संध्याकाळचा समुद्रवारा प्राशन करायला आलेली मंडळी, सांज ढळून चालल्यामुळे ओढीने घरट्यात परतणारे जीव… हे सगळं नेत्रसुख अनुभवण्यास आम्ही रोज यायचो. ठरलेली बसायची जागा आणि तिच्या केसांत गजरा माळताना श्वासागणिक धुंदावणारी सांज-संध्या, अहाहा…तिच्या चेहऱ्यावर विलसत असलेला लालिमा डोळ्यांनी पिऊन तृप्त व्हावं आणि वाळूत रेघा मारताना तिच्या लांबसडक निमुळत्या बोटांची होणारी हालचाल काहीच न बोलता फक्त पहात रहावी… माझा आवडता छंदच होता तो. वाळूत मारलेल्या रेघांतून ती बरंच काही बोलायची. कौलारू घर आणि त्यात मारलेल्या तीन उभ्या रेघा. आम्ही दोघे आणि आमचा एक… फक्त तीनच रेघा. आज सहज मला थट्टा करायची लहर आली. तिची लांब सडक तर्जनी धरून मी अजून एक रेघ ओढली आणि लाजून चूर झालेली तिची नजर माझ्या नजरेत मावेनाशी झाली. पुढच्याच क्षणी श्वास एकमेकात गुंफले गेले. वाळूत मारलेल्या त्या चार रेघांबरोबरच आसमंतात पसरलेला लाल किरमिजी रंग अजूनच गडद झाला…
यथावकाश आम्ही दोघे नाजूक बंधनात अडकलो. आता रोजची समुद्र किनाऱ्यावरची संध्याकाळ, रोज केसांत माळलेल्या गजऱ्याचा सुगंध, तिच्या चेहऱ्यावर रोज लालिमा पसरवून पाण्यात विरघळणारं ते तेज, रोजचीच ती अन मी … आणि रोजच्याच प्रमाणे तिने वाळूत रेखाटलेल्या रेघांची चित्रं. एक सांगू कां …? अहो, माझीच काय पण तिथे किनाऱ्यावर धडकू पहाण्याऱ्या लाटांमध्ये सुद्धा तिने वाळूत मारलेल्या रेघा पुसायची तर सोडाच पण त्यांना स्पर्श करायची सुद्धा हिंमत नव्हती. रेघांच्या रूपाने वाळूत काढलेल्या चित्ररेषा मनात साठवत आम्ही तिथून निघायचो. एक निश्चय रोजच डोक्यात असायचा… तो म्हणजे दोघांनी रेखाटलेल्या प्रीतीच्या रेघा जीवनात कधीही न पुसण्याचा. चालताना बोटं गुंफली गेली की तळहाताच्या रेघाही एकमेकांत एकरूप होऊन जायच्या. विलग न होण्यासाठीच …
समुद्राच्या वाळूत तिच्या लांबसडक, नाजूक बोटांनी आखलेल्या त्या घरात अजूनही तीन रेघा होत्या. मात्र ओलसर दमट वाळूत आखलेल्या रेघांचं कौलारू घरकुल आता प्रत्यक्षात उतरलं होतं. बराच कालावधी लोटला होता पण अजूनतरी दोनाच्या तीन रेघा झाल्या नव्हत्या. घरी कुजबूज आणि चिंता दोन्हीचा एकदम वावर नित्याचाच झालेला. निष्णात धन्वंतरी, उपास तापास, घरगुती उपाय, सगळं सगळं पार पडलं तरी पुढे प्रश्नचिन्हच. भौतिक सुखांनी घरात ठाण मांडलेलं. पण आमच्या दोघांच्या मानसिक आणि भावनिक सुखावर कशाची तरी पडछायाच…. आणि तीही दिवसेंदिवस अधिकच गडद होत जाणारी. आता तर तिच्या मनाची समजूत काढणं महाकठीण झालं होतं. मुळचंच हळवं, कोमल असलेलं तिचं मन आता अजूनच तरल झालं होतं आणि मी …माझं काय …? ओहोटीच्या वेळेस खूप खोलवर गेलेल्या समुद्राच्या पाण्यास शांततेचा एक विशिष्ट आवाज असतो. आमच्या कौलारू घरातही मानसिक सुखाला लागलेल्या ओहोटीमुळे स्पष्ट ऐकू येणाऱ्या नैराश्याच्या गाजेने मेंदू कुडतरायला लागला होता. समुद्राची भरती निसर्ग नियमाप्रमाणे येतेच येते. ती कधीच चुकत नाही. इथे तर पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा ओहोटीच. भरती कधी येणार हे त्या नियंत्यालाच ठाऊक. असो.. कालाय तस्मै नमः म्हणतात ना, तेच खरं …
दिवस … रात्र … भरती … ओहोटी … निसर्गचक्र साचेबद्धपणे अव्याहत सुरूच होतं. पण माझ्या घरात देवच काय निसर्गही रुसला होता. आमचं समुद्रावर जाणं आता कमी झालं होतं. गेलोच तर तिच्या लांबसडक बोटांनी मारलेल्या रेघा आता विस्कटलेल्या वाटायच्या. कधी तरी कौलारू घर रेखाटलं गेलंच तर तिथे दोनच रेघा दिसायच्या. त्यात अजून दोन काय पण एक रेघ सुद्धा रेखाटायची हिंमत आता माझ्यात नव्हती.मी सुन्न होऊन पहात राहायचो. पण ती? ती तर शांतपणे शून्यात नजर लावून बसलेली असायची. इतकी शांत की कुठल्याही क्षणी तिच्या मेंदूत स्फोट होईल. अचानक सांज लालिम्या ऐवजी भेसूर भाव चेहऱ्यावर उतरायचे. त्या भेसूर भावस्थितीत वाळूत काढलेलं कौलारू घर आज उध्वस्त झालं होतं. मी मात्र सवयीनुसार समुद्रकिनारी आमच्या नेहमीच्या ठिकाणी बसून वाळूत तिचं आवडतं कौलारू घर आणि त्यात तीन रेघा काढायचा जमेल तसा प्रयत्न करतो होतो. एकटाच… एकाकी. ऋतुचक्राप्रमाणे भरती-ओहोटी सुरूच होत्या. माझ्या नशिबी आता फक्त ओहोटीच…. आणि आज ???
आज वाळूत मारलेल्या रेघा किनाऱ्यावर धडकणाऱ्या आणि डोळ्यांतून कोसळणाऱ्या लाटांमध्ये विरघळून सामावून गेल्या होत्या आणि वाळूची चित्र- चौकट समोर पसरलेल्या अथांग अश्या दर्यात विसर्जित झाली होती … कायमची….