दिवाळी या आपल्या मोठ्या सणाची सुरुवात वसुबारस पासून होते. वसुबारस म्हणजे गाई प्रति कृतज्ञता दाखवण्याचा सण!
महाराष्ट्र हे राज्य शेतीप्रधान असल्याने वसुबारस या दिवसाचे महत्त्व आहे.
अश्विन कृष्ण द्वादशीला वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य व त्यासाठी असलेली बारस म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते त्यांच्या पायावर पाणी घालून हळदी कुंकू वाहून पूजा करतात. गाईला नैवेद्य म्हणून पुरणपोळी खाऊ घालतात.
हिंदू संस्कृतीत गाईला गोमाता समजले जाते व तिच्या उदरात देवांचा वास आहे म्हणून गाई प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
तसेही आपल्या संस्कृतीत नाग, बैल अशा निसर्गात असणाऱ्या प्राण्यांचे पूजा करून ते दिवस साजरे करण्याची प्रथा आहे. वसुबारस पासून अंगणात तुळशीपाशी घराबाहेर पणत्या, आकाश कंदील लावून दिवाळीची सुरुवात केली जाते..