कुठेतरी वीज कडाडली. त्या आवाजाने शहारुन अंजलीने खिडकीतून बाहेर पाहिलं. पावसाचा जोर वाढला होता. सकाळपासूनच तो वेड्यासारखा कोसळत होता. सकाळी रितेश आँफिसला जायला निघाला तेव्हाही तो कोसळतच होता पण आतासारखं त्याचं स्वरुप रौद्र नव्हतं म्हणून तर रितेशला तिने अडवलं नव्हतं. सात वाजले होते. थोड्याच वेळात रितेश येणार होता. रेनकोट घालून गेला असला तरी तो थोडाफार ओला होणारच होता.
अंजलीचा स्वयंपाक झाला पण रोज सात वाजेपर्यंत घरी येणाऱ्या रितेशचा पत्ता नव्हता.पावसामुळे त्याला उशीर होईल हे तिने ग्रुहित धरलंच होतं.पण सव्वाआठ झाले होते.प्रियाला भुक लागली असणार म्हणून तिने त्याला फोन लावला.बराच वेळ टूकटूक वाजत राहिलं .शेवटी फोन न लागताच बंद झाला.तिने लागोपाठ तीन चार वेळा फोन लावला पण प्रत्येक वेळी बराच वेळ टूक टूक वाजून फोन बंद होत होता.शेवटी कंटाळून तिने प्रियाला हाक मारली.
“प्रियू.ये आतमध्ये आणि जेवून घे”
प्रिया आत आली आणि म्हणाली
“मी बाबा आले की जेवणार आहे”
“अगं वेडी आहेस का?बाहेर पाऊस सुरु आहे.त्यांना किती वेळ लागेल माहित नाही. तू जेवून घे आणि झोप”
” नाही. मी बाबांसोबतच बसेन”
ती जणू हट्टालाच पेटली होती.
“बरं ठिक आहे. नऊपर्यंत वाट पाहू या. मग मात्र जेवून घ्यायचं हं मुकाट्याने” प्रियाने मान डोलावली. दोघीही हाँलमध्ये येऊन बसल्या.अंजलीने टिव्ही लावला.सिरीयलमध्ये नेमका एका पात्राचा अपघाती म्रुत्यु दाखवल्या जात होता.तो पाहून अंजलीला अस्वस्थ वाटू लागलं. तिने चँनल बदललं पण मनाची अस्वस्थता काही कमी झाली नाही. “आई बाबांना खुप ऊशीर झाला ना?फोन कर ना त्यांना”प्रिया म्हणाली .तिच्या बोलण्यात आणि चेहऱ्यावर चांगलीच व्याकुळता दिसत होती.अंजलीने मोबाईल घेऊन रितेशचा नंबर डायल केला पण मघासारखाच त्याचा फोन लागला नाही. काय करावं याचा विचार करत असतांनाच तिला एक कल्पना सुचली. रितेशचा मित्र, प्रकाशचा नंबर तिच्याकडे होता. तिने प्रकाशला फोन लावला “भाऊजी हे अजून घरी आले नाहीत. त्यांचा फोनही लागत नाहिये. काही आँफिसचं महत्वाचं काम होतं का?”
प्रकाशने फोन उचलल्यावर तिने विचारलं “नाही तसं तर काही काम नव्हतं आणि रितेश तर साडेसहालाच आँफिसमधून बाहेर पडला. आतापर्यंत घरी पोहचायला हवा होता. मीसुद्धा आताच घरी आलोय. वाटेत खुप पाणी साचलंय. पण तुम्ही काळजी करु नका वहिनी. येईल तो.रस्त्यात कुठंतरी अडकला असेल”
“तुम्ही फोन करुन बघता का त्यांना?”
“हो करतो ना!आणि लगेच तुम्हांला अपडेट्स कळवतो” “ओके.थँक्स” तिने फोन ठेवला दहा मिनिट्स झाले पंधरा झाले तरी प्रकाशचा फोन आला नाही. शेवटी अंजलीने त्याला फोन करण्यासाठी मोबाईल उचलला तेवढ्यात त्याचाच फोन आला. “वहिनी तीनचार वेळा त्याला फोन लावायचा प्रयत्न केला पण फोन काही लागत नाहिये. मला काय वाटतं आपण अकरापर्यंत थांबावं. मग नंतर मी कुणालातरी घेऊन त्याला पहायला जातो”
“भाऊजी पोलीस कंम्प्लेंट केली तर?” “त्यासाठी आपल्याला सीटी पोलिस स्टेशनला जावं लागेल.एकतर सध्या जोरदार पाऊस सुरु आहे शिवाय ठिकठिकाणी झाडं कोसळून पडली आहेत. त्यामुळे आपल्याला तिथपर्यंत जाणंच मुश्कील. दुसरं म्हणजे मला नक्की नियम माहित नाही पण पोलिसही किमान चोवीस तास वाट बघायला सांगतात मगच तक्रार स्विकारतात. आपण असं करु उद्या सकाळी पोलिस स्टेशनला जाऊ तोपर्यंत वाट बघूया रितेशची”
“चालेल भाऊजी मी अकरा वाजता फोन करते तुम्हांला” तिने फोन ठेवला तशी प्रिया एकदम येऊन तिला बिलगली
“आई बाबा येतील ना गं?” तिच्या डोळ्यात आसवं जमा होत होती. “हो गं बेटा.येतील.तू चल बरं जेवून घे आणि झोप.उद्या सकाळी शाळेत जायचंय ना?” प्रियाने मान डोलावली “पण मला भुक नाहिये.बाबा आल्यावर आपण एकत्रच जेवूया ना”
“नको. त्यांना उशीर झाला तर तू झोपून जाशील. आणि मग जेवणार नाहिस”
तिला ते पटलं असावं. म्हणून मग ती आईच्या मागे किचन मध्ये गेली. अंजलीने तिला वाढलं “आई तू पण जेव ना!”
“नाही बेटा मी बाबांसोबतच जेवते तुला माहितेय ना?”
“हो” प्रियाने जेवायला सुरुवात केली पण चतकोर पोळी खाऊन होत नाही तर ती म्हणाली
“आई बस झालं मला भुक नाहिये”
“अगं असं काय करतेस? तेवढी पोळी संपव तरी!”
“नको ना आई प्लीज. मला खरंच भुक नाहिये”
“बरं चल. हात धू आणि झोप”
तिला बेडरुममध्ये झोपवून ती बाहेर हाँलमध्ये आली. परत तिने रितेशला फोन लावला पण तोच प्रकार पुन्हा घडला. मग तिने टिव्ही लावला. तिची आवडती सिरीयल सुरु होती पण ती बघण्यातही तिचं मन लागेना. नवरा करतो तशी चँनल वारंवार बदलून ती सर्फिंग करु लागली पण मन मात्र थाऱ्यावर नव्हतं. जरासा गाडीचा आवाज आला की तिचे कान टवकारायचे. टिव्ही म्युटवर करुन ती फाटक उघडण्याचा आवाज ऐकायचा प्रयत्न करायची. दोनतीनदा तर तिने दरवाजा उघडून बाहेरही बघितलं होतं.
पाऊस सुरुच होता. खरंतर पाऊस तिला खुप आवडायचा. रिमझिम पावसात तिला भिजायला खुप आवडायचं. पण आताचा पाऊस जीवन देणारा नसून जीवन हिरावून घेणारा होता. या पावसाने आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार कोसळणार होते. उभ्या पिकांना झोपवून टाकल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची स्वप्नं भंग पावणार होती. अर्थातच एरवी रोमँटिक वाटणाऱ्या या पावसाला आता मात्र ती मनातल्या मनात शिव्याच देत होती.
दहा वाजले. आता बेडरुममध्ये जाऊन पडावं असं वाटून ती उठायला लागली तोच प्रिया बाहेर आली
“आई बाबा अजून आलेच नाही का गं?” तिने रडक्या आवाजात विचारलं
“नाही बेटा. पण येतील.तू जाऊन झोप”
“त्यांचा फोन आला होता?”
“नाही. पण मला वाटतंय ते लवकरच येतील” आपल्या स्वतःच्या बोलण्यावर तिला विश्वास नव्हता पण तीच्या समाधानाकरता ती बोलली.
प्रिया एकदम जोरजोरात रडायला लागली
“आई मला बाबांची खुप आठवण येतेय गं!”
अंजलीने तिला जवळ घेतलं
“अगं वेडाबाई इतकं रडायला काय झालं? अगं येतील बाबा”
“आई त्या आर्यांच्या बाबांसारखे माझे बाबा देवाघरी तर नाही ना गेले?”
अंजलीला एकदम धक्का बसला.लेकीच्या मनातली खळबळ तिच्या लक्षात येऊन तीही अस्वस्थ झाली
“चल काही काय बोलतेस.असं काही होणार नाही. आणि असं वाईट बोलायचं नसतं बेटा. चल तू झोप बरं”
“नाही. मला झोप येत नाहिये. मला माझे बाबा पाहिजेत”
ती अजुनच जोरात रडायला लागली “हो पण तू रडल्यामुळे तुझे बाबा परत येतील का?चल आपण दोघीही झोपू”
तिला तसंच उचलून अंजली बेडरुममध्ये आली. तिला झोपवून थोपटू लागली. प्रिया अजून रडतच होती. थोड्या वेळाने तिचा आवाज कमीकमी होत गेला आणि शेवटी ती झोपली. ती झोपल्याचं पाहून अंजलीने स्वतः झोपायचा प्रयत्न केला. पण नाना शंका कुशंकांनी भरलेलं मन तिला झोपू देत नव्हतं. ती उठून हाँलकडे आली. वाटेत देवघर दिसलं आणि ती थबकली. देवासमोर उभं राहून तिने हात जोडले.
“देवा काही चुकलं असेल तर माफ कर पण माझ्या नवऱ्याला सुरक्षित घरी येऊ देरे बाबा” तिने प्रार्थना केली. संकटाच्या वेळी तिची आई गणपती पाण्यात ठेवायची याची तिला आठवण आली.”आपणही ठेवावा का तसा?” तिला प्रश्न पडला.”नको. अजून तितकी वाईट वेळ आली नाहिये” तिने स्वतःच त्याचं उत्तर दिलं आणि ती हाँलमध्ये येऊन सोफ्यावर बसून राहिली. हाँलमधला लाईटही लावायची तिला इच्छा झाली नाही. बसल्याबसल्या रितेशचा हसरा तिच्या नजरेसमोर उभा राहिला. त्याच्यासोबत घालवलेल्या गेल्या सहासात वर्षातले अनेक बरेवाईट प्रसंग तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले. रितेश तसा चांगलाच होता.
हसतमुख होता, समजदार होता. पण आईवडिलांबाबतीत नको तेव्हढा संवेदनशील होता. त्यांच्यातले दाखवलेले दोष त्याला आवडायचे नाहीत. याचं कारणही तसंच होतं. रितेशला त्याच्या आईवडिलांनी अतिशय विपरीत परिस्थितीत वाढवलं होतं. त्याची जाण रितेशला होती म्हणून तो नेहमी आईवडिलांची बाजू घ्यायचा. मग ते चुकीचे असले तरीही. त्यामुळे अंजलीला सासूसासरे असेपर्यंत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला होता. सासूसासरे वारल्यानंतर मात्र सगळं सुरळीत झालं होतं.
तिला आता भयंकर उदास वाटू लागलं होतं. प्रिया म्हणत होती तसं खरंच झालं तर नसेल? पावसामुळे झालेल्या अपघातात रितेशचं काही बरं वाईट तर…एकदम तिला आठवलं रितेशच्या येण्याच्या रस्त्यावरच एक नाला होता आणि दरवर्षी त्याला पूर यायचा. पुर आलेल्या स्थितीत तो पार करतांना दरवर्षी चारपाच जण तरी वाहून जायच्या घटना घडायच्या. रितेशने तर तसा प्रयत्न केला नसेल?आणि…त्या कल्पनेनेच तिचा घसा कोरडा पडला. जीव घाबराघुबरा होऊ लागला. डोळ्यात आसवं जमा होऊ लागली. घशात हुंदका दाटून आला. ती आता मोठ्याने रडणार तेवढ्यात प्रिया डोळे चोळत चोळत बाहेर आली.
“आई बाबा अजून आले नाहीत?” तिने रडवेल्या स्वरात विचारलं.अंजलीने उठून लाईट लावला.
” नाही बेटा.पण ते येतीलच”
” तू केव्हाची म्हणतेय येतील येतील म्हणून.पण ते का येत नाहियेत?”
” बेटा पाऊस किती जोरात पडतोय बघ.ते कुठतरी थांबले असतील”
” तू फोन लाव ना त्यांना.त्यांना म्हणा प्रियू वाट बघतेय त्यांची “
” मी मगाशी लावला होता फोन पण लागलाच नाही”
“मग तू परत एकदा लाव ना गं फोन” ती परत एकदा रडायला लागली. अंजलीने उठून तिला जवळ घेतलं. तशी ती हमसून हमसून रडायला लागली. तिच्या रडण्याने अंजलीच्याही डोळ्यात पाणी आलं. “असं रडायचं नाही बेटा. तू शहाणी आहेस ना? बघ पाऊस कमी झालाय ना. येतीलच आता बाबा. तू झोप बरं” “मी तिकडे झोपणार नाही”
” बरं चालेल. इथेच झोप”
अंजलीने तिला सोफ्यावरच टाकून तिला थोपटायला सुरुवात केली. तशी ती झोपून गेली. ती झोपलीये हे पाहून अंजली तिला बेडरुममध्ये घेऊन गेली. ती उठू नये म्हणून ती बराच वेळ तिला थोपटत राहिली. मग ती परत हाँलमध्ये येऊन बसली. अकरा वाजत आले होते. तिने मोबाईल उचलून रितेशला फोन लावला. तो लागला नाही म्हणून तिने प्रकाशला लावला. पण त्यालाही लागला नाही. तिने मोबाईलच्या स्क्रिनकडे पाहिलं. तिथं रेंजच नव्हती. थोडाफार का होईना जो प्रकाशचा आधार वाटत होता.
तोही नाहिसा झाला होता. आता तिलाही खचल्यासारखं वाटू लागलं. काळजीने मन पोखरु लागलं. त्या नाल्याच्या पुरात रितेश वाहून तर नाही ना गेला या विचाराने तिचे डोळे अश्रूंनी भरुन आले. आता एकच उपाय उरला होता. गणपतीला पाण्यात ठेवायचा. तिने डबडबत्या डोळ्यांनी मनाशी निश्चय केला आणि ती धीर एकवटून देवघराकडे जायला निघाली तेवढ्यात …..
होय तोच तो आवाज ज्याची ती जीवाच्या आकांताने वाट बघत होती. तोच तो फाटक उघडण्याचा आवाज. रितेशची वाईट बातमी घेऊन कुणी आलं तर नव्हतं? धडधडत्या ह्रदयाने ती उठली.
डोळ्यातले आसू तिने पुसले. धीर धरुन तिने दार उघडलं. बाहेर काळ्या रेनकोटमधली एक आक्रुती गाडी लावत होती. तिने पटकन अंगणातला लाईट लावला. समोर रितेश उभा होता. रेनकोट असूनही नखशिखांत भिजलेला आणि थंडीने थरथर कापणारा. आनंदाने तिला भडभडून आलं. त्याला जाऊन घट्ट मिठी मारावी असं तिला वाटू लागलं पण तो ओला होता त्याला अगोदर घरात घेण्याची गरज होती.
“काहो इतका उशीर.आणि फोन तर करायचा.वाट बघून जीव जायची वेळ आलीये” “अगं काय करणार! पावसाने सगळीच वाट लावलीये.कंपनीतून निघालो तर पंचमुखी हनुमान जवळच्या नाल्याला हा पूर! एकदोन जण वाहून गेले म्हणे. त्यामुळे तो रस्ता बंद झालेला. सुभाष चौकाकडून यायला निघालो तर एका डबक्यात गाडी स्लिप झाली आणि मी पडलो. शर्टाच्या खिशातला मोबाईल पाण्यात पडला. तो शोधुन काढला. नंतर गाडी सुरुच होईना. पावसामुळे बहुतेक गँरेजेस बंद.एका गँरेजवाल्याकडे गेलो त्याने एक तास खटपट केली पण गाडी काही सुरु होईना. त्याच्याकडे गाडी ठेवायला जागा नव्हती म्हणून गाडी ढकलत आणू लागलो तर ठिकठिकाणी झाडं पडल्यामुळे रस्ते बंद. मी कसा घरापर्यंत पोहचलो ते माझं मलाच माहित”
“अहो पण एखादा फोन करायचा. मी शंभरवेळा तुम्हांला फोन लावायचा प्रयत्न केला पण तुमचा मोबाईल बंदच. प्रकाश भाऊजींनीही प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही”
“हो अगं. डबक्यात पडल्याने मोबाईल खराबच झाला असावा. मी गँरेजवाल्याच्या मोबाईलने तुला फोन केला होता पण त्याचं नेटवर्कच गायब होतं. बरं या तुफान पावसात मोबाईल बाहेर काढायलाच लोक तयार होत नाहीत” रितेश रेनकोट काढत म्हणाला
“थांबा मी टाँवेल आणते तुमच्यासाठी” ती टाँवेल आणायला वळत नाही तोच प्रिया जोरजोरात रडत बाहेर आली आणि “बाबाsssss” असं जोरात ओरडत तिने रितेशच्या पायांना मिठी मारली
“अगं थांब. त्यांना आत तर येऊ दे”
अंजली ओरडली पण प्रियाने ऐकलं नाही.
लेकीच्या त्या आक्रोशाने रितेशच्या डोळ्यात पाणी आलं त्याने तशाच ओलेत्या स्थितीत तिला उचलून छातीशी धरलं “बाबा तुम्ही लवकर का नाही आले? मला खुप भिती वाटत होती” त्याच्या गळ्याला मिठी मारुन ती रडतरडत म्हणाली.
” हो गं बेटा. साँरी हं बेटा या पावसामुळे मला येता नाही आलं. आता यापुढे असं नाही करणार”
“प्राँमिस?”
“हो बेटा. प्राँमिस”
रितेशच्या गळ्याला मिठी मारुन प्रिया रडत होती.
अंजली टाँवेल घेऊन आली. बापलेकीचा तो संवाद ऐकून तिलाही गहिवरुन आलं. मोठ्या मुश्किलीने तिने अश्रू आवरले
“उतर बेटा खाली. बाबांना कपडे बदलू दे. तुझाही फ्राँक ओला झाला असेल तोही बदलून घे” थोड्यावेळाने ती आणि रितेश जेवायला बसली असतांना प्रिया आली आणि रितेशच्या मांडीवर जाऊन बसली “आई मलापण खुप भुक लागलीये. पण मी बाबांच्याच हातून जेवणार आहे”
अंजली आणि रितेश दोघांनाही हसू आलं. रितेश तिला हाताने भरवू लागला. जेवण झाल्यावर प्रिया अंजलीला म्हणाली
“आई मी आज मी बाबांजवळ झोपणार आहे” अंजलीला हसू आलं. रोज खरं तर ती दोघांच्या मध्ये झोपायची पण आज ती रितेशच्या कुशीत त्याला घट्ट बिलगून झोपणार हे नक्की होतं. झालंही तसंच ती रितेशच्या कुशीत जाऊन झोपल्यावर अंजलीने रितेशला संध्याकाळपासूनच प्रिया किती बैचेन होती ते सांगितलं.तिच्या मनात चाललेल्या घालमेलीबद्दल,भीतीबद्दल सांगितल्यावर रितेश म्हणाला “खरंच अंजू मुलींचं बापावर किती प्रेम असतं हे आज मी प्रत्यक्ष पाहिलंय.त्या मोठ्या झाल्यावरही असंच रहातं का गं हे प्रेम”
“प्रश्नच नाही. मुली कितीही मोठ्या झाल्या, अगदी लग्न होऊन त्यांची मुलं मोठी झाली तरी वडिलांवरचं त्यांचं प्रेम थोडंही कमी होत नाही. तुम्हांला आठवतं मागच्या वर्षी माझे वडिल वारल्यावर सात दिवस मी जेवले नव्हते. एकही मिनिट असा गेला नसेल ज्यात मी रडली नसेन” “तसं असेल तर अंजू आपल्याला दुसरीही मुलगीच झाली तरी मला आवडेल” अंजू समाधानाने हसली. मुलगी झाल्याचा सल रितेशच्या डोक्यातून कायमचा गेला हे बरंच झालं होतं. कारण अंजली आता गरोदर होती. पुन्हा मुलगीच झाली तर नवऱ्याची नाराजी आता रहाणार नव्हती.
रितेश प्रेमाने प्रियाच्या डोक्यावर, अंगावर हात फिरवू लागला. त्याच्या स्पर्शाने प्रिया जागी झाली. झोपाळलेल्या स्वरात ती रितेशला म्हणाली “बाबा तुम्ही मला खुप आवडता” रितेशने तिला छातीशी घट्ट कवटाळलं. तिच्या गालाचा मुका घेत तो म्हणाला
“बेटा तू पण मला खुप खुप खुप खुप आवडतेस”