मिटिंग संपली तसा विकास आँफिसच्या बाहेर आला.पण आल्याआल्या बाहेरच्या दमट उकाड्याने तो घामाघूम झाला. थोड्याच वेळात आपण घामाने ओलेचिंब होणार हे त्याच्या लक्षात आलं. आणि झालंही तसंच.मुलूंडला जाणाऱ्या लोकलचं तिकीट काढायला तो सिएसएमटी स्टेशनवर जाईपर्यंत त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. मे महिन्यात मुंबईला यायला त्याला याच कारणाने अजिबात आवडायचं नाही. त्या घामाने त्याचा जीव घाबराघुबरा व्हायचा. कधी एकदा अंघोळ करतो असं होऊन जायचं. पण एकदा अंघोळ केल्यावरही अर्ध्याएक तासात तो परत घामाने ओला होऊन जायचा.
तिकिट काढून तो प्लँटफाँर्मवर आला आणि तिथली अफाट गर्दी पाहून हबकलाच. अर्थात ही गोष्ट त्याला नवीन नव्हती. वीस वर्षांपूर्वी तो मुंबईलाच नोकरी करत होता तेव्हाही गर्दी अशीच जीवघेणी असायची आणि लोकलला लोंबकळून त्यानेही अनेकदा प्रवासही केला होता. पण त्यावेळी तो तरुण होता.गैरसोयी सहन करण्याची त्याच्यात क्षमता होती. आता त्याने चाळीशी पार केली होती आणि त्याचं आयुष्य सुखासीन झालं होतं. माणसांची ही अफाट गर्दी त्याला नकोशी वाटू लागली होती. “माणसं कसली, हे तर वळवळणारे किडे. कसलीही स्वतंत्र ओळख नसणारे. या अफाट गर्दीत चेंगरुन, घुसमटून, कधीकधी खाली पडून मरणारे” स्वतःच दिलेल्या या उपमेने त्याचं मन अस्वस्थ झालं. त्या गर्दीत शिरायला त्याचं मन धजवेना.पण जाणं तर भाग होतं.
आजुबाजूच्या लोकांच्या अंगाला घासत तो प्लँटफाँर्मवर गेला. लोकल आली आणि ती थांबण्या अगोदरच प्लँटफाँर्मवर असणारे जीवाच्या आकांताने उभ्याने का होईना जागा मिळवण्यासाठी दणादण आतमध्ये उड्या मारु लागले. काही सेकंदातच लोकल गच्च भरली. विकास हतबुद्ध होऊन तो प्रकार पहात राहिला. आतमध्ये शिरायची त्याची हिंमत झाली नाही. ती लोकल गेली दुसरी आली. ती गेली तिसरी आली पण तो प्लँटफाँर्मवरच होता. आता मात्र आपण आत घुसायलाच पाहिजे या इराद्याने विकास धावपळ करत लोकलच्याआत शिरला खरा पण मागून आलेल्या रेट्याने तो आतमध्ये ढकलल्या गेला.
आतमध्ये त्याचा जीव गुदमरु लागला. किंचीतही हलायला आणि मोकळा श्वास घ्यायला जागा नव्हती. असह्य झालं तसा तो आजुबाजूच्या लोकांना ढकलत, त्यांच्या शिव्या खात प्लँटफाँर्मवर उतरला. त्याचक्षणी लोकल हलली. “बस, पूरे झाली ही नाटकं. आता आपण टँक्सीने जाऊ. जातील चारपाचशे रुपये पण आरामात जाता येईल” त्याने निर्णय घेतला आणि स्टेशनच्या बाहेर येऊन टँक्सीला हात दिला. मागच्या सीटवर बसून त्याने खिडकीच्या काचा खाली केल्या. हवेचा एक झोत अंगावर घेतांना त्याला खुप बरं वाटलं.
मुलुंडला तो त्याचा चुलतभाऊ श्रीकांतच्या अपार्टमेंटला पोहचला तेव्हा सहा वाजून गेले होते. १२ व्या मजल्यावर जाऊन त्याने श्रीकांतच्या फ्लँटची बेल वाजवली. श्रीकांतच्या मुलाने दार उघडलं. विकासला पाहून त्याला आश्चर्य वाटल्यासारखं दिसलं.
” काय रे आहेत का पप्पा मम्मी घरात?”
” हो आहेत “
विकासला ” या, बसा” न म्हणता तो आतमध्ये निघून गेला. विकास स्वतःच आतमध्ये जाऊन सोफ्यावर बसला. दोनच सेकंदात श्रीकांतदादा बाहेर आला.
“अरे विकास, आज अचानक कसा काय?”
” अचानक?अरे दोन दिवसांपूर्वीच तर मी तुला येण्याबद्दल फोन केला होता “
” अरे कामाच्या गडबडीत कुणाच्या लक्षात रहातंय ते! तू आज सकाळी तरी फोन करायचा होतास “
विकासला आपली चुक लक्षात आली. आपण श्रीकांतदादाला ग्रुहीत धरायला नको होतं हे त्याच्या लक्षात आलं. तेवढ्यात मेघावहिनी बाहेर आली. तिच्या साडीवरुन कळत होतं की ती बाहेर जायला निघालीये.
” विकासभाऊजी असं अगोदर न कळवता अचानक कसं येणं केलंत? “नाराजीच्या सुरात तिनं विचारलं.
विकासने श्रीकांतकडे पाहिलं.त्याच्या नजरेतले भाव ओळखून श्रीकांत घाईघाईने म्हणाला.
“अगं त्याने परवा सांगितलं होतं पण मी ते तुला सांगायला विसरलो “मेघावहिनी त्याच्याकडे एक जळजळीत नजर टाकून आतमध्ये निघून गेली. काहितरी गडबड आहे. आपण आलेलं कुणालाच आवडलेलं दिसत नाहिये हे विकासच्या लक्षात आलं आणि तो अस्वस्थ झाला.
मग त्याने बँगेतून फरसाणचं पाकीट आणि कैऱ्यांची पिशवी काढली. श्रीकांतच्या हातात देत तो म्हणाला
“आपल्या शेतातल्या आहेत. आईने आठवणीने दिल्या आहेत लोणच्यासाठी “
” सध्या इकडेही चांगल्या कैऱ्या मिळतात. पण आम्ही त्या आणत नाही. लोणचं टाकायला वेळच कुठे असतो आम्हांला! सरळ विकतचं लोणचं आणून खातो आम्ही “
विकासचा चेहरा पडला. तरी तो आईला कैऱ्या आणायचं नाही म्हणत होता. एकतर बँगेचं वजन खुप वाढलं होतं. दुसरं,या लोकांना त्याची किंमत नव्हती. बाजारात तर सगळंच विकत मिळतं पण प्रेमाने दिलेल्या भेटवस्तूमागे काहीतरी आपुलकीच्या भावना असतात हे या लोकांना कळत कसं नाही?
“काय घेतोस? चहा, काँफी, सरबत? “श्रीकांतदादाने विचारलं
खरं तर विकासला अंघोळ करायची होती. घामाने त्याच्या सर्वांगाला खाज सुटली होती. अंघोळ करुन जेवण झाल्यावर मस्त एसी रुममध्ये ढाराढूर झोपायचं असा त्याचा बेत होता. पण ते आता काही शक्य दिसत नाही हे त्याच्या लक्षात आलं.
“पाणी दे अगोदर, खुप तहान लागलीये. आणि सरबत चालेल”
“ओके.अरे जय एक ग्लास पाणी आणि सरबत घेऊन ये रे”
पाणी आणि सरबत पिऊन झालं. श्रीकांतदादा चुप बसला होता. बराच वेळ झाला तो बोलला नाही तेव्हा तो अस्वस्थ आहे हे विकासच्या लक्षात आलं.
“श्रीकांतदादा काही प्राँब्लेम आहे का? नाही म्हणजे वहिनी नाराज दिसतात म्हणून विचारलं”
” काही नाही रे!बऱ्याच वर्षांनी आमचं आज मुव्हीला जायचं ठरलं होतं. आमचं म्हणजे मेघाच्या दोन मैत्रीणी आणि त्यांच्या फँमिलीज असे १४-१५ जण मुव्हीला जाणार होतो. मुव्ही संपल्यावर तिकडच्या तिकडे हाँटेलमध्ये जेवायला जायचं ठरलं होतं.आज सकाळीच तो प्रोग्राम ठरला. म्हणून तुला म्हंटलं की सकाळी तू मला तुझ्या येण्याबद्दल रिमाईंड केलं असतं तर हा प्रोग्राम ठरवला नसता “
अच्छा ! असं आहे का? तरीच मेघावहिनी का चीडचीड करतेय आणि श्रीकांतदादा का अस्वस्थ झालाय ते विकासच्या लक्षात आलं. तो घाईघाईने म्हणाला “अरे मग जा ना!मी वैशालीकडे जातो ठाण्याला.तिलाही मी येण्याचं सांगून ठेवलंय “
श्रीकांतदादाचा चेहरा खुलला. मेघावहिनी आणि तिची मुलगी लगेच बाहेर आल्या.दोघींच्याही चेहऱ्यावर आता आनंद दिसत होता.
” अरे पण तू आता तीन वर्षांनी घरी येतोय आणि आम्ही बाहेर जायचं ते बरं वाटेल का आम्हांला? “श्रीकांतदादा औपचारिकता दाखवत म्हणाला.
” काही प्राँब्लेम नाही दादा.मी पुढच्या महिन्यात येणारच आहे तेव्हा येईन तुमच्याकडे “
“बरं मग नक्की या हं भाऊजी.आणि फोन करुन या म्हणजे मग अशी गडबड होणार नाही” मेघावहिनी म्हणाली. विकास उठला तसे सगळेच उठून त्याच्यामागे बाहेर आले.
“अरे पण वैशालीला तू येतोय असं आज कळवलंय की नाही? नाहीतर आमच्यासारखी परिस्थिती व्हायची”
विकास चमकला. त्याने पटकन मोबाईल काढून वैशालीला फोन लावला. पण तिने तो उचलला नाही. त्याने परत लावला पण परत तेच घडलं.
“ती फोन उचलत नाहिये. जसं तुला सांगितलं तसंच तिलाही मी कळवलंय पण मी उद्याचं कळवलंय “
” काही हरकत नाही. तिचे सासूसासरे आजारी असतात त्यामुळे ती कुठेच बाहेर जात नाही. आणि ती माझेही फोन उचलत नाही.आणि दोनतीन दिवसांनी विचारते फोन का केला होता म्हणून. तू बिनधास्त जा तिच्याकडे. ती घरीच असेल “श्रीकांतदादा हसत म्हणाला.
” बरं बरं मी निघतो “
” हो चल.आम्हीही निघतोय “
बेसमेंटमधली कार आणायला श्रीकांत गेला. विकास रिक्षा पकडण्यासाठी निघाला. त्याच्यामागून श्रीकांतची कार येऊन पुढे निघून गेली. साधं रिक्षापर्यंत सोडण्याचं सौजन्यही श्रीकांतदादाने दाखवलं नाही याचा विकासला खुप संताप आला. खरं तर “तुही आमच्यासोबत मुव्हीला आणि पार्टीला चल” असं श्रीकांतदादा म्हणू शकला असता. किंवा ” तू घरीच थांब. मी बाहेरुन तुझ्यासाठी खायला मागवून देतो. जेवण करुन मस्त झोपून रहा “अशी आँफरही विकासला चालली असती. पण आपण त्या कुटूंबाला नकोच होतो हे विकासच्या लक्षात आलं. कदाचित “तू सांगितलं पण मी विसरलो “हे श्रीकांतदादाचं म्हणणं म्हणजे निव्वळ बहाणा तर नव्हता?
उद्विग्न मनाने विकास मुख्य रस्त्यावर आला. ठाण्याला वैशालीकडे जायला रिक्षा पकडली. वैशाली त्याची मावसबहिण. ठाण्यात उच्चभ्रूंच्या वस्तीत रहायची. विदर्भातलं बुलडाणा हे तिचं माहेर. तिचा नवरा नामांकित वकील होता. उच्चभ्रू लोकांमध्ये त्याची उठबस असायची. वैशालीही एका कंपनीत जाँबला लागलेली. त्यामुळे लग्नाअगोदर साधीसरळ, मनमोकळी आणि बडबडी असलेली वैशाली पार बदलून गेली होती. शहरी अहंकार आणि शिष्टपणा तिच्यात शिरला होता. खरं तर लहानपणी तिचं आणि विकासचं फार सख्यं होतं. विकासला बहिण नव्हती म्हणून वैशालीलाच तो सख्खी बहिण मानायचा. दर वर्षी राखी पोर्णिमा आणि भाऊबीजेला तिच्याकडे जाऊन ओवाळून घ्यायचा.
लग्नं झालं तेव्हा विकासच्या गळ्यात पडून ती खुप रडली होती. पण पैसा आणि स्टेटस आलं की काही माणसं नात्यांना किंमत देत नाहीत. वैशालीचं तेच झालं होतं. अर्थातच भाऊबहिणीच्या त्या प्रेमात आता फक्त औपचारिकता उरली होती. विकासला ते आठवलं आणि त्याने घाईने तिला फोन लावला. याहीवेळी तिने उचलला नाही. “काय करावं? तिच्याकडे जाणं कँन्सल करावं का?”असा विचार त्याच्या मनात आला. पण “निघालोच आहे तर तिचाही अनुभव घेऊन पाहू “असा विचार करुन तो शांत बसला.
रिक्षा तिच्या अपार्टमेंटजवळ येऊन थांबली. रिक्षावाल्याला पैसे देऊन तो शेकडो शंका मनात घेऊन लिफ्टमध्ये शिरला.
परत एकदा त्याने तिला फोन लावला पण आताही तिने उचलला नाही. आठव्या मजल्यावर लिफ्टमधून बाहेर पडून त्याने तिच्या फ्लँटची बेल वाजवली. त्याच्या भाचीने दार उघडलं. त्याला पाहून ती आश्चर्यचकित झाली.
“आई विकास मामा आलाय गं ” ती आतमध्ये तोंड करुन ओरडली. मग विकासला म्हणाली
” ये ना आत. बैस”
विकास आत येऊन सोफ्यावर बसला. वैशाली घाईघाईने बाहेर आली.
“अरे विकास, अचानक कसा काय?”
आता मात्र विकासला रागच आला. तो थोडा जोरातच बोलला
“मी परवाच तुला कळवलं होतं. एवढंच आहे की मी उद्या येणार होतो. आज श्रीकांतदादाकडे थांबणार होतो पण त्याला आज कुठल्यातरी पार्टीला जायचं होतं. रात्री यायला उशीर होणार होता म्हणून तुझ्याकडे आलो “
“ओके. पण मग येण्याआधी फोन तर करायचास”
विकास हसला.
” तुझ्या मोबाईलवर बघ माझे किती मिस्ड काँल आहेत ते. एकदाही तू फोन उचलला नाहीस”
” अरे बापरे ! हो का? बरोबर. मी तो चार्जिंगला दुसऱ्या रुममध्ये लावला आणि आम्ही दुसऱ्या रुममध्ये गप्पा मारत बसलो होतो “
आतून खुप जोरजोरात हसण्याखिदळण्याचा आवाज ऐकून विकासने तिला विचारलं
“घरी कुणी पाहुणे आलेत का?”
“हो अरे. ह्यांची अमेरिकेची बहिण आणि जपानमधला भाऊ कुटूंबासहित एका लग्नासाठी इथं आले आहेत. घरात खुप गर्दी झालीये. आणि आज ह्यांच्या भाचीचा वाढदिवस आहे. आम्हीही तो सेलेब्रेट करायला
हाँटेलला जातोय “
विकासचा चेहरा पडला. म्हणजे इथेही तो नकोसा पाहुणा होता आणि त्याला आज झोपायला जागा मिळणार नव्हती. सुन्न मनाने त्याने फरसाणचं, पापडांचं पाकीट आणि कैऱ्यांची पिशवी तिच्या हातात दिली.
“आईने पाठवलंय. तुला आवडतात म्हणून पापड करुन पाठवलेत “
” थँक्स ” तिने कोरडे आपुलकीशुन्य धन्यवाद दिले.
” कधी आलास मलकापूरहून?”
“सकाळीच आलो “
” अच्छा. तुमच्या त्या आँफिसर्स रेस्ट हाऊसला उतरला असशील?”
विकास गडबडला. घाईघाईने म्हणाला
“अं? हो हो”
तिचा ताणलेला चेहरा एकदम सैल झाला.
” काय घेतोस?चहा की काँफी?”
” काहिही नको.श्रीकांतदादाकडे सरबत पिऊन आलोय “
तेवढ्यात वैशालीचा नवरा बाहेर आला. विकासने त्याला नमस्कार केला. त्यानेही हात जोडले. माणूस कमालीचा गर्विष्ठ होता. त्याचा चेहरा तसाच भावनाहीन राहिला.”आपल्याला त्याने ओळखलं नाही की काय?”अशी दाट शंका विकासच्या मनात दाटून आली. पण मागे वैशालीसोबत तो मलकापूरला आला होता. चांगला तीन दिवस तो विकासच्या घरी राहिला होता. तेव्हा तर चांगला बडबड करत होता.
दोन मुली चांगल्या सजून धजून आतून बाहेर आल्या.
“आँटी, वुई आर रेडी. प्लीज बी क्विक. अदरवाईज वुई विल बी लेट “अमेरिकन उच्चारात एक मुलगी बोलली.
” येस डार्लिंग, जस्ट टू मिनिट “
आता आपल्याला निघायची वेळ आलीये हे विकासच्या लक्षात आलं
” चल मी निघतो ” विकास वैशालीकडे पहात म्हणाला.
“अरे थांबला असता.आमच्या सोबत हाँटेलला आला असता “
औपचारिक स्वरात वैशाली म्हणाली.
“नको. मला एका मित्राकडेही जायचंय “त्याने थाप ठोकली.
” बरं मग पुढच्या वेळी निवांत ये. साँरी घरातल्या गडबडीमुळे तुझ्याकडे लक्ष नाही देऊ शकले “
“हरकत नाही”तो उठला. तिच्या नवऱ्याकडे पाहून त्याने परत नमस्कार केला. उत्तरात त्याने फक्त एक हात वर केला. चेहरा तसाच दगडी होता. विकास खाली आला. बाहेर प्रचंड उष्मा होता. दोन मिनिटातच त्याचं शरीर घामाने चिंब झालं.
त्यात वैशालीकडे येण्याच्या पश्चात्तापाची भर पडली आणि त्याचा खुप संताप आला.” समजतात तरी कोण हे लोक स्वतःला?. मान्य आहे की पाहूणे आले होते. पण म्हणून काय इतका औपचारिकपणा दाखवायचा? आपल्याकडेही वेगवेगळे पाहुणे एकाच दिवशी येतात पण आपण तर कधी असं वागत नाही. साधं चहा पाजायचं सौजन्यही वैशालीने दाखवलं नाही. अमेरिकेतल्या नातेवाईकांशी त्याची ओळख करुन द्यायचंही वैशालीने टाळलं होतं. जणू तो कुणी परका माणूस होता. “हे असा हलकटपणा दाखवतात आणि आईचा जीव या नालायक माणसांसाठी तुटतो.
आता तुम्ही या मलकापूरला, मीही तुमच्यासारखंच वागून दाखवतो की नाही ते बघा”
विकास मनाशीच बडबडत चालला होता. खरंतर तो अनेक बाबतीत श्रीकांत आणि वैशालीपेक्षा वरचढ होता. पिढीजात श्रीमंतीत तो वाढला होता. मलकापूरला त्यांचं तीन मजली कपड्यांचं आलिशान दुकान होतं. त्याचा मोठा भाऊ ते सांभाळत होता. नांदूरा रोडवर पाच हजार स्क्वेअरफुट जागेत दोन मजली आलिशान बंगला होता. तीन फोर व्हिलर्स होत्या. मलकापूरजवळच्या वडोदा गांवात शंभर एकर शेती होती. विकास स्वतः सरकारी अधिकारी असला तरी बायकोच्या नावावर त्याची कन्स्ट्रक्शन फर्म होती.
पुर्ण बुलडाणा जिल्ह्यात त्याची कन्स्ट्रक्शनची कामं सुरु असायची. संपत्तीचा विचार केला तर श्रीकांतदादा आणि वैशाली त्याच्यासमोर कुठंच लागत नव्हते. विकास आणि त्याचा भाऊ अनेक वेळा कुटुंबासहीत विदेशवारी करुन आले होते. पण पैसा प्राँपर्टीने तुम्ही कितीही श्रीमंत असा,आचार विचारांनी कितीही आधुनिक असा तरी ही पुण्यामुंबईची माणसं तुम्हांला गावंढळच समजतात आणि “गांववाले” म्हणून हिणवतात याचा अनुभव विकासने अनेकदा घेतला होता. फक्त मोठ्या शहरात रहातो म्हणून माणूस खरंच आधुनिक होतो?विकासला अनेकदा हा प्रश्न पडायचा.
आज मोबाईल आणि इंटरनेटने इतकी क्रांती घडवली होती की खेड्यातली माणसंही आधुनिक झाली होती. परंपरांचा आणि संस्कारांचा असलेला पगडा सोडला तर त्यांनाही खेडवळ म्हणणं चुकीचं झालं असतं इतकं जग जवळ आलं होतं. मग आधुनिकपणा म्हणजे काय? माणुसघाणेपणा?की स्वार्थीपणा?की आलेल्या पाहुण्यांचा अनादर करणं?त्याला आठवलं की श्रीकांतदादा आणि वैशाली जेव्हाजेव्हा मलकापूरला येत तेव्हा तो आपले अनेक ठरलेले कार्यक्रम रद्द करायचा. त्यांच्या आदरातिथ्यात कोणतीही कमतरता नको म्हणून सुटी घेऊन घरी रहायचा. मागच्याच वर्षी श्रीकांतदादा खामगांवला लग्नाला आला होता तेव्हा विकास आपली कामधामं सोडून स्वतः त्याला कारमध्ये घेऊन गेला होता.
वैशाली तर जेव्हा जेव्हा माहेरी बुलडाण्याला जायची तेव्हा अगोदर मलकापूरला विकासकडेच उतरायची. मग तिला बुलडाण्याला कारने सोडायचं काम विकासच करायचा. इतकं प्रेमाने वागूनही या माणसांनी आज आपल्याशी असं वागावं? राग आणि दुःख यांचं विचित्र मिश्रण मनात घोळवत विकास ठाण्याच्या स्टेशनकडे निघाला. “आता काय करायचं ?”त्याला प्रश्न पडला.आँफिसर्स रेस्ट हाऊसला जाता आलं असतं पण श्रीकांतदादाकडे मुक्काम करायचा म्हणून त्याने ते अगोदर बुक केलं नव्हतं.
अर्थातच तिथे रुम मिळण्याची शक्यता नव्हती. हाँटेलमध्ये जाऊन रहाणं हाच एक पर्याय शिल्लक होता. अचानक त्याला आठवलं त्याचा एक वानखेडे नावाचा बँचमेट ठाण्यातच होता. दोन महिन्यांपूर्वी विकासला तो भेटला होता तेव्हा त्याने ठाण्याला घरी यायचं निमंत्रण दिलं होतं. ते आठवून तो त्याचा नंबर मोबाईलमध्ये शोधू लागला. शोधताशोधता त्याला अचानक ” विठूकाका” नांव दिसलं आणि तो चमकलाच. मागच्याच महिन्यात विठूकाका घरी आले होते तेव्हा म्हणत होते “विकासदादा रमेशने कल्याणला नवीन फ्लँट घेतलाय. मुंबईला आले की जरुर या बरं का आमच्याकडे ” ‘काय हरकत आहे विठूकाकाकांकडे जायला? आपण गेलो तर त्यांना आनंदच होईल.
त्यांच्याकडे रहाण्याची सोय नाही झाली तर तिथेच कल्याणला हाँटेलला मुक्काम करु ” या विचारासरशी विकासने विठूकाकांना फोन लावला. ” हँलो विठूकाका, मी विकास बोलतोय”
” अरे विकासदादा! आज कसा काय फोन केला? मुंबईला आलते का?”त्यांच्या स्वरातला आनंद पाहून विकास सुखावला
” हो विठूकाका. सध्या ठाण्यात आहे”
” अहो मग या ना कल्याणला. या! लई आनंद होईन आम्हांला “
त्यांच्या या वाक्याने विकासला खुप आनंद झाला. शेवटी गांवाकडची माणसं ती! कुणाच्या घरी येण्याने त्यांना आनंदच होणार.
” बरं काका येतो. तुमचा पत्ता पाठवता का व्हाँटस्अपवर?”
” काही काळजी करु नका दादा. सुनील घरी आहे त्याला पाठवतो स्टेशनवर तुम्हांला घ्यायला.फक्त डोंबिवली पास झालं की मला फोन करा “
” बरं करतो “
आपल्या येण्याने कुणाला का होईना आनंद होतोय याचं विकासला हायसं वाटलं. त्या समाधानातच तो ठाणे स्टेशनवर आला.टँक्सी किंवा रिक्षा करुन कल्याणला जायचा विचार देखील त्याच्या मनात आला नाही. सुदैवाने फक्त कल्याणपर्यंत जाणारी लोकल त्याला मिळाली. त्यात त्याला दाटीवाटीने का होईना बसायला जागा मिळाली. बसल्याबसल्या विठूकाकांचा विचार त्याच्या मनात आला. विठूकाका त्याच्या कापड दुकानात पस्तीस वर्षं सेल्समन म्हणून नोकरीला होते. मुलामुलींची लग्नं झाल्यावर शेतीकडे लक्ष देता यावं म्हणून त्यांनी नोकरी सोडली होती. अत्यंत प्रामाणिक,नम्र आणि सज्जन माणूस. कधीही उध्दटपणा नाही, रागाने बोलणं नाही. कोणतंही काम द्या सदैव तयार. विकास आणि त्याचा भाऊ लहान असतांना दुकानात गेले की विठूकाका त्यांचे फार लाड करत.
त्यांना चाँकलेट्स ,कुल्फ्या घेऊन देत. विकासलाही इतर सेल्समनपेक्षा ते फार आवडत. गरीब असुनही त्यांनी मुलामुलींना चांगलं शिकवलं होतं. दोन्ही मुली पदवीधर होत्या. एक मुलगी चेन्नईत होती तर दुसरी दिल्लीत होती. दोघींचे नवरेही उच्चशिक्षित आणि चांगल्या पगारावर नोकरीला होते. मुलगा रमेश आय.टी.इंजीनियर होऊन मुंबईतच नोकरीला लागला होता. नुकताच त्याने कल्याणला वन बीएचकेचा फ्लँट घेतला होता.
“कसा असेल रमेशचा फ्लँट? वन बीएचके म्हणजे छोटाच असणार. बहूतेक खाली फरशीवरच झोपावं लागणार. त्यात एसी. नसला तर आपल्याला झोप येईल का? मुख्य म्हणजे विठूकाका आपल्याला रहाण्याचा आग्रह करतील की नाही? की चहापाणी झाल्यावर आपल्याला श्रीकांतदादा आणि वैशालीसारखं कटवतील. असंही त्या छोट्या फ्लँटमध्ये विठूकाकाच्या कुटूंबाची अडचण करणं आपल्याला तरी बरं वाटेल का?”शेकडो प्रश्न विकासच्या मनात उभे राहिले.
डोंबिवली पास झाल्याचं त्याने विठूकाकाकांना कळवलं. कल्याणला उतरुन तो स्टेशनबाहेर आला तेव्हा सुनील त्याची वाटच बघत होता. विकासला पाहिल्याबरोबर पुढे होऊन त्याने त्याला पदस्पर्श करुन नमस्कार केला.
“याला म्हणतात खरे संस्कार ” श्रीकांत आणि वैशालीच्या मुलांनी त्याची दखलही घेतली नव्हती हे आठवून विकास मनाशीच बडबडला. सुनील बाईकने त्याला घरी घेऊन गेला तेव्हा अपार्टमेंटच्या फाटकाजवळ विठूकाका आणि काकू आनंदी चेहऱ्याने त्याची वाटच बघत होते. तो विठूकाकांच्या पाया पडायला गेला पण काकांनी त्याला उचलून छातीशी धरलं.
“या विकासदादा ” विकासचा हात धरुन विठूकाका त्याला वर घेऊन गेले. तो सोफ्यावर बसत नाही तोच सुनीलची बायको आणि मुलं त्याच्या पाया पडायला आली. ” विकासदादा,तुम्ही आले लई आनंद झाला बघा. आपल्या गावाकडंचं कुणी बी आलं की लई छान वाटते ” विठूकाका म्हणाले तशी विकासला श्रीकांतदादा आणि वैशालीच्या वागण्याची आठवण झाली. ती दोघंही पण गावाकडचीच. श्रीकांतदादा तर मलकापूरचाच. वरुन नातेवाईक. पण वागणं……?
विकासचं मन विषादाने भरुन आलं.
” दादा आता आलेच आहात तर दोनतीन दिवस मुक्काम करा ” विठूकाका आग्रहाने म्हणाले.
” नाही काका. उद्या सकाळी मला परत आँफिसला जायचंय आणि संध्याकाळी सात वाजताच्या गाडीचं माझं रिझर्वेशन आहे “
“काय दादा ! असे घाईगडबडीत काऊन येता? बरं मग आजच्या दिवस इथेच मुक्काम करा “
“अहो सीएसएमटीच्या आँफिसर्स रेस्ट हाऊसला माझं आजचं बुकींग आहे” विकास आढेवेढे घेत खोटं बोलला.
“कँन्सल करा ते दादा. आज आम्ही तुम्हांला अजिबात जाऊ देणार नाही. उद्या नाश्ता झाल्यावर भलेही तुम्ही जा “सुनील आग्रहाने बोलला. त्या आग्रहाने विकास सुखावला.
“बरं बरं.थांबतो “
पाण्यासोबत कैरीचं पन्हं घेऊन रमेशची बायको आली.
“दादा पन्हं पिऊन झालं की मग छान अंघोळ करुन घ्या. इथल्या घामाने जीव लई कासावीस होते ” काका त्याच्या मनातलं बोलले.पन्हं पिऊन झाल्यावर रमेश त्याला बाथरुमकडे घेऊन गेला.विकासकडे खरंतर टाँवेल, साबण होता पण रमेशने त्याला नवाकोरा टाँवेल आणि साबण काढून दिला. अंघोळ झाल्यावर त्रुप्त मनाने तो बैठकीत येऊन बसला.
मग विठूकाका, काकू आणि रमेशशी त्याच्या गप्पा रंगल्या. त्याच्या वडिलांच्या आठवणीने विठूकाका हळवे झाले.
“दादा गोपाळशेठ म्हणजे लय भला माणूस. आम्ही नोकर असुनही आमच्याशी नेहमी मोठ्या भावासारखे वागायचे.अडिअडचणीत मदत करायचे. दर दिपावळीला सगळ्यांना घरी बोलवून गोडाधोडाचं जेवण द्यायचे. आमच्यासकट आमच्या लेकरायलेबी कपडे करायचे “
विठूकाका म्हणत होते ते खरंच तर होतं.त्याचे वडील पुर्ण मलकापूर शहरात प्रसिद्ध होते ते मोठ्या मनाचा माणूस म्हणून.व्यापारात त्यांनी पैशापेक्षा माणसं कमावली होती. म्हणून तर जेव्हा ते वारले तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला अख्खं मलकापूर लोटलं होतं. आजही मलकापूर शहरात विकासच्या कुटूंबाला मान होता तो त्याच्या वडिलांमुळेच.
गप्पा रंगलेल्या असतांनाच रमेशची बायको स्वयंपाक तयार असल्याचं सांगायला आली. तसे विठूकाका आणि रमेश उठले. त्यांनी हाँलमध्येच पाटं मांडली. जेवणाचा मेनू एकदम फक्कड होता. पुरणपोळी, मसाला वांगी, आंब्याचा रस, मटकीची उसळ, तळलेले पापड, वरण भात.
” बापरे! इतके पदार्थ? एवढं करायची काय गरज होती वहिनी?”विकास रमेशच्या बायकोला म्हणाला तसे विठूकाका म्हणाले
“असू द्या विकासदादा.पहिल्यांदा आलेय तुम्ही आमच्याकडे. पण दादा तुम्ही दोनतीन दिवस राहिले असते तर लय आनंद झाला असता बघा”
” बरं. पुढच्या वेळी येईन तेव्हा नक्की दोनतीन दिवस राहिन “
” आणि दादा. जेव्हाजेव्हा मुंबईला याल तेव्हातेव्हा आमच्याचकडे उतरायचं बरं का! तुमच्या त्या रेस्ट हाऊसला रहायचं नाही”सुनील मध्येच म्हणाला.
विठूकाकांनी खुप आग्रह करकरुन त्याला जेवू घातलं. जेवणही खुपच चवदार होतं. त्यामुळे विकासही आडवा हात मारुन जेवला. दहा वाजले तसे विकासचे डोळे झोपेने मिटू लागले. ते पाहून सुनील म्हणाला
” दादा चला झोपायला. बेडरुममध्ये तुमची व्यवस्था केलीये “
” आणि बाकीचे कुठे झोपणार?”
” इथेच हाँलमध्ये गाद्या टाकून “
” मग मीही इथेच झोपतो. मला आवडतं खाली झोपायला “
” नाही नाही. पाव्हण्यांना असं खाली झोपवायला आम्हांला चांगलं वाटेल का?”
वन बीएचके असला तरी फ्लँट बऱ्यापैकी ऐसपैस होता. बेडरुममध्ये गेल्यावर सुनीलने कुलर चालू केला.
” दादा मी या उन्हाळ्यात ए.सी.घेणार होतो पण अप्पा नाही म्हणाले. एकदा ए.सी.ची वाईट सवय लागली की मग ए.सी.शिवाय झोप नाही येत असं म्हणतात ते “
” बरोबर म्हणताहेत विठूकाका “
” पण तुम्ही तर घरी ए.सी.तच झोपत असाल ना! मग आज तुम्हाला इथे झोप येईल का?”
” कुलर आहे ना ! मग नक्की येईल “विकास म्हणाला खरं पण त्यालाही शंका होतीच.
” काका कुठं झोपताहेत?”
” ते हाँलमध्येच झोपतील. मी म्हंटलं होतं त्यांना तुमच्या सोबत झोपायला. पण मालकांसोबत एका बेडवर झोपणं काही त्यांना पटलं नाही”सुनील हसत म्हणाला. सकाळी सात वाजता विकास उठला तेव्हा आपण ए.सी.नसुनही ढाराढूर झोपल्याचं त्याच्या लक्षात आलं. विठूकाकांचं पुर्ण कुटुंब उठलेलं त्याला दिसत होतं. सकाळी लवकर उठण्याचे संस्कार लहान मुलांवरही बिंबवल्याचं कळून येत होतं. चहा नाश्ता,अंघोळ आटोपून विकास निघण्यासाठी तयार झाला तेव्हा नऊ वाजून गेले होते.
“चला काका निघतो मी “तो म्हणाला तसा रमेश म्हणाला
” पाच मिनिट थांबा दादा.डबा तयार होतोय तो घेऊन जा “
” अरे डबा कशाला? मी दुपारी कँटीनमध्ये जेवून घेतलं असतं”
” असं कसं विकासदादा?” विठूकाका म्हणाले “आपलं घर असतांना बाहेर कशाला जेवायचं? काही नाही फक्त पोळी भाजी केलीये ती घेऊन जा “
या कुटूंबाच्या आदरातिथ्यामुळे विकास भारावून गेला. अचानक त्याला आठवलं की या कुटूंबासाठी त्याने काहिही आणलं नव्हतं. कमीतकमी लहान मुलांसाठी तरी चाँकलेट्स वगैरे आणायला पाहिजे होते. ज्यांना माणसांची किंमत नाही त्यांच्यासाठी तो भरपूर काही घेऊन गेला होता. प्रेमाच्या माणसांसाठी मात्र त्याने काही आणलं नव्हतं. त्याला स्वतःचीच लाज वाटली.
रमेशच्या बायकोने आणून दिलेला डबा बँगेत ठेवल्यावर विकास काकाकाकूंच्या पाया पडला तशा काकू म्हणाल्या
“बरं का विकासदादा,आता पुढच्या वेळी मुंबईला याल तवा सुनबाईला आणि पोराईले बी घेऊन येजा “
“हो.नक्की आणेन काकू “
रमेशची मुलं पाया पडायला आली तसं विकासने पाकिटातून पाचशेच्या दोन दोन नोटा काढून दोघांच्या हातात दिल्या.
“अहो दादा हे काय करताय?”विठूकाकांनी पुढे होऊन त्या नोटा काढून विकासच्या समोर धरल्या
“अहो काका. राहू द्या. मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलो तर काहितरी आणायला पाहिजे होतं. अचानक ठरलं म्हणून काही आणता आलं नाही. आणि आईला मी तुमच्याकडे येतोय असं माहित असतं तर तिने असं मोकळ्या हातांनी येऊ दिलं असतं का?”
” ते खरंय दादा पण दोन हजार रुपये? तुमच्या समाधानाकरता दहावीस रुपये द्या “
” नाही काका. राहू द्या.आईने पाठवलेत असं समजा “
काकांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली पण त्या छोट्या मुलांचे चेहरे आनंदाने खुललेत हे पाहून विकासला समाधान वाटलं.
काकाकाकूंचं कुटूंबासहित येण्याचं दिलेलं निमंत्रण स्विकारुन विकास सुनीलबरोबर निघाला.
“दादा आता लोकलला जागा मिळणं मुश्किल आहे. तुम्ही एखादी सीएसएमटीला जाणारी एक्स्प्रेस पकडा. त्यात आरामात जागा मिळेल”
” हो बरोबर “
सुनीलने तिकीट काढून आणलं. त्याचे पैसेही त्याने घेतले नाहीत.
” परत या बरं का दादा आमच्याकडे “सुनील विकासचा हात हातात घेऊन म्हणाला
” हो नक्की येईन “
सुदैवाने विकासला सीएसएमटीला जाणारी एक्स्प्रेस लगेच मिळाली. विशेष म्हणजे तिच्यात भरपूर सीट्स रिकामेच होते.
विठूकाकांच्या आदरातिथ्याने भारावून गेलेला विकास कालच्या सगळ्या घडामोडींचा विचार करु लागला. नकळत त्याचं मन श्रीकांतदादा, वैशाली आणि विठूकाकांची तुलना करु लागलं. श्रीकांतदादा आणि वैशालीकडे थ्री बीएचकेचे मोठे ऐसपैस फ्लँट असुनही त्याला एका रात्रीपुरती जागा मिळाली नाही. मात्र विठूकाकांच्या कुटूंबाने स्वतःची अडचण सहन करुनही त्याची झोपायची सोय करुन दिली.
घरं मोठी असून चालत नाही माणसांची मनंही मोठी असावी लागतात हेच खरं. नातेवाईक असूनही वैशाली आणि श्रीकांतदादाने दाखवलेली औपचारिकता मनाला खुप वेदना देऊन गेली.” का वागतात अशी ही माणसं?” तो विचार करु लागला आणि त्याच्या लक्षात आलं की ही माणसं आपला कंफर्ट झोन सोडायला तयार नसतात.येणाऱ्या पाहुण्यांनी त्यांना अगोदर दोन दोन वेळा सांगितल्याशिवाय येऊ नये. सांगूनही आलं तरी त्याच्यासाठी आपले ठरलेले कार्यक्रम रद्द करण्याची विशेष म्हणजे पाहुण्यांमुळे होणारी अडचण सहन करण्याची त्यांची तयारी नसते.
त्यात आपल्या प्रायव्हसीचं नको तेवढं कौतुक त्यांना असतं. त्या प्रायव्हसीत बाधा आणणारी माणसं त्यांना नको असतात.”अतिथी देवो भव ” या संकल्पनेशी त्यांना काही देणघेणं नसतं. मग अतिथी मलकापूरसारख्या छोट्या गांवातून आलेले असले की ते त्यांना काहिच किंमत देत नाहीत. विकासला वैशाली आणि श्रीकांतदादाचा खुप संताप आला. ते मलकापूरला आले की आपणही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, त्यांना अजिबात किंमत द्यायची नाही हे त्याने ठरवलं. माणसांना किंमत देण्यावरुन अचानक विकासला आठवलं की विठूकाकांचं संपूर्ण कुटुंब त्याला पुन्हा पुन्हा परत येण्याचा आग्रह करत होते पण तो एकदाही त्यांना म्हंटला नाही की “मलकापूरला आले की आमच्याकडे जरुर या” “का आपण त्यांना तसा आग्रह केला नाही? मलकापूरला ते आपल्या घरी स्वतःहून येतात पण आपण त्यांच्याकडे फारसं लक्ष देत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना आपण किंमत देत नाही.
वैशाली आणि श्रीकांतदादा जसे आपल्याला गावंढळ आणि कमी दर्जाचे समजतात तसंच आपण विठूकाका आणि त्यांच्या कुटूंबाला तर समजत नाही? की ते आपल्या दुकानात नोकर होते म्हणून आपल्याला ते खालच्या दर्जाचे वाटतात?”
या विचारासरशी विकास एकदम दुःखी झाला. स्वतःच्या वागण्याची त्याला लाज वाटू लागली. आपण चुकीचं वागलो हे लक्षात आल्यामुळे एक विचित्र सल त्याच्या मनाला टोचू लागला.”विठूकाकांना आपण ते घरी आल्यावर त्यांना किंमत देत नाही हे त्यांच्याही लक्षात आलं असेल पण तो आकस मनात न ठेवता त्यांनी आपलं प्रेमाने स्वागत केलं आपला उत्तम पाहुणचार केला.माणसं अशी वागू शकतात?”अचानक त्याला एक प्रसंग आठवला. त्याच्या वडिलांना हार्ट अटँक आल्यावर त्यांना हाँस्पिटलमध्ये भेटायला येणाऱ्यांची रिघ लागली होती. पण जवळच्या नातेवाईकांनी तीन दिवस उलटून गेले तरी तोंड दाखवलं नव्हतं.त्याचा संताप येऊन तो वडिलांना म्हंटला होता “बघा तुम्ही त्या लोकांसाठी इतकं करता पण आहे का त्यांना तुमची काही किंमत.येणं तर सोडाच पण साधी विचारपूसही त्यांनी केली नाही”
त्याचे वडिल हसून म्हणाले होते. ” बेटा माणसं ही अशीच असतात.बघ काही माणसं थोडासा पैसा आला की माज दाखवतात,घमेंडी होतात. मी म्हणजे कोण? असं त्यांना वाटू लागतं. तर काही माणसं करोडपती असूनही नम्र असतात. काही माणसं आपण थोडंसं रागाने बोललं तर संबंध तोडून टाकतात पण काही माणसांना शिव्या दिल्या तरी ती अपमान सहन करतात आणि आपलं चांगलं वागणं सोडत नाहीत. स्वतःची पात्रता नसतांनाही काही माणसांचं आयुष्यच दुसऱ्यांना तुच्छ लेखण्यात जातं त्याउलट काही माणसं सर्वार्थाने मोठी असुनही आपला मोठेपणा दुसऱ्यांना जाणवू देत नाहीत. माणसं ही अशीच असतात. ती कशी का वागेनात आपण आपल्या स्वभावाप्रमाणे वागत रहायचं कारण त्यातूनच आपल्याला समाधान मिळत असतं “
आज विठूकाकांच्या कुटूंबाने हेच तर दाखवून दिलं होतं. ते आठवून विकासचं मन भरुन आलं आणि त्याने मनाशी निश्चय केला की कुणी कितीही खालच्या दर्जाचा असेना का किंवा तो आपल्याशी कितीही वाईट वागला तरी आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. शेवटी तीही माणसंच आहेत. त्यांना माणसाप्रमाणेच वागवलं गेलं पाहिजे.