श्लोक १
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा| मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा|
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा| गमूं पंथ आनंत या राघवचा||
अर्थ: जो इंद्रियांचा स्वामी आहे, जो सत्व रज तम या त्रिगुणांचे अधिष्ठान आहे आणि जो निर्गुणांचा आरंभ आहे, त्या गणेशाला व परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चार वाणींचे मूळ असलेल्या देवी शारदेला मी नमस्कार करतो आणि अनंत स्वरूप असलेल्या ईश्वराचा मार्ग सांगतो.
मनुष्य मन हे अतिशय चंचल असतं. वाईट गोष्टी किंवा चुकीच्या मार्गावर ते लवकर आणि सहज भटकून जातं. विकारांना बळी पडतं. कितीही प्रयत्न केला तरी काम, क्रोध, मद, मत्सर याकडे त्याला आकर्षित व्हायला वेळ लागत नाही. पण यामुळेच मनुष्य अनेक वेळा आयुष्यात गोंधळलेल्या स्थितीत अडकतो. काय करावे? कसे करावे? काय उपाय असेल? असे असंख्य प्रश्न त्याच्या डोक्यात आणि मनात घर करू लागतात. यावर समर्थ रामदासस्वामी म्हणतात, “भक्तीसाठी व परमार्थासाठी मनावर चांगले संस्कार घडवून ते मजबूत करावे लागतात. मनाची शक्तीच मनुष्याला पारमार्थिक प्रगती करण्यास मदत करते.” म्हणून समर्थांनी मनाला ‘सज्जन’ असे संबोधले आहे.
आजचं जीवन अतिशय धकाधकीचं झालेलं आहे. प्रत्येक मनुष्य कोणता ना कोणता मानसिक त्रास भोगत जगतो आहे. असंख्य प्रश्नांच्या गोंधळांचा पसरा त्याच्या डोक्यात आणि मनात साचला आहे. उत्तर काही मिळत नाही. पण मुळात मनुष्य अश्या बिकट परिस्थितीत अडकतोच कसा? हा सुद्धा मनात गोंधळ घालणाराच प्रश्न आहे. हो ना?
मी सुद्धा रोजच्या जीवनात असंख्य मानसिक त्रासातून जात असतो किंवा जात आलेलो आहे. त्यामुळे हे प्रश्न जे आज समजातल्या असंख्य देहांना पडत असतील, ते मलासुद्धा पडतात. म्हणून मनाचे श्लोक याची मदत घ्यावी असं मी ठरवलं. पण हे श्लोक वाचत असताना आणि त्याचा अर्थ समजून घेताना मला काही गोष्टी सुचल्या. त्या गोष्टी काय आहे? कोणत्या आहे? कश्या प्रकारच्या आहे? ह्याचा उलगडा करायलाच मी हा एक प्रयत्न करून बघतो आहे. ह्या प्रयत्नाला मी ‘मनाचे श्लोक आणि आपण’ असे नाव दिले आहे. मुळात का आपण अश्या स्थितीतीत अडकतो ह्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन मी तुमच्या समोर मांडतो आहे. एक एक श्लोकाचा अर्थ आणि माझा दृष्टीकोन असे याचे स्वरूप असेल.
हिंदुस्थानात कोणत्याही कामाच्या किंवा नवीन गोष्टीच्या आरंभी देवांची पुजा केली जाते. आपलं कार्य सफल व्हावं, कार्य करताना मन एकाग्रचित्त असावं आणि ध्येय किंवा उदेश्य पूर्ण व्हावं म्हणून प्रथम गणेशाला आणि नंतर आपल्या इष्ट देवाची पुजा केल्या जाते. ह्या प्रयत्नाचा आरंभ करताना मी त्या गजननाला आणि आई शारदेला नमस्कार करतो आणि माझा हा प्रयत्न त्यांच्याच आणि रामदास स्वामींच्या आशीर्वादाने सफल होईल अशीच आशा करतो.
जय जय रघुवीर समर्थ|