कुठंही जा…माणसंच माणसं
शांतता म्हणून नाही
संगीत रजनीत देखील
यांची रिंगटोन बंद होत नाही
पोस्टात जा…ज्येष्ठ नागरिकांची गर्दी
बँकेत जा..कर्जमाफीची रांग
हिमालय पण आलाय….या रांगेच्या कक्षेत
थंड हवेची ठिकाणं
नुसतीच नावाला
सगळीकडे नुसता बथ्थड माणसांचा गिजबिटकाला
मंदिरे तर भरुन वाहताहेत
देव देतोच आहे सगळ्यांना सगळं
असं समजून सारे जमताहेत
शाळा म्हणे विद्या मंदिर
संख्या सौष्ठवानं भरलेल्या खोल्या
अन् लावतात तासांची बत्त्ती
घडतात मेरीटचं स्वप्न लेवून कोमेजणारी मुलं
सण उत्सवांना धुमारेच फुटतात
रस्त्यांवर ढोल..नगारे कान फाटेस्तोवर गरजतात
काचा नि सिमेंट तडकतं तिथल्या तिथेच
समुहात ताकत असते
हे दाखवायला रोज एक समुह सरसावतोय इथं
या माणसांच्या ओझ्यानं
पृथ्वीही ढळतेय आता
पूर…भूकंप…त्सुनामी वाटतात नैसर्गिक
पण त्यांच्या पाठीशी समर्थ उभे आहेत
कारखानदार..खाणमालक..धुराड्यांचे पुरस्कर्ते