आषाढ -श्रावणा ची वाटचाल चालू झाली की माझ्या मनात अनेक ओल्या आठवणी पिंगा घालू लागतात! कधी पाऊस लवकर येतो तर कधी त्याची सुरुवात उशिरा होते, पण जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा आपोआपच मन आठवणीच्या पावसात चिंब भिजवून निघतं आणि आठवतात त्या छोट्या मोठ्या सफरी! अगदी अलीकडे म्हणजे साठी ओलांडल्यावरही माझ्या असं लक्षात आलं की अजूनही पावसाचं तितकंच आकर्षण आपल्याला आहे! खिडकीतून पाऊस बघताना छोटे छोटे वाहणारे पाण्याचे प्रवाह, पाण्यात खेळणारी मुलं आणि साठलेल्या पाण्यात सोडलेल्या कागदाच्या होड्या आपल्या ला आकर्षित करत असतात.
असंच एक वर्षी आम्ही लवासाची छोटीशी सफर केली. माझी बहीण , तिचे मिस्टर, आणि आम्ही दोघे कारने लवासाला जायला निघालो होतो. आभाळ भरून आले होते, पण पावसाची सुरुवात नव्हती. लवकर जाऊन येऊ या म्हणून चहा घेण्यात सुद्धा वेळ न घालवता, आम्ही थर्मास मध्ये चहा भरून घेतला आणि तीन वाजता निघालो! जसजसे आम्ही माले गावापर्यंत आलो तसं बाहेरचं वातावरण बदलत चालले होते .पाऊस नव्हता.. हिरवाई मनाला प्रसन्न करत होती. आल्हाददायक निसर्ग दिसत होता.
डोंगरावरून फेसाळत येणारे धबधबे मनाला उत्साह देत होते. हळूहळू वातावरण बदलत गेलं आणि झिमझिम पडणाऱ्या पावसाने बऱ्यापैकी जोर धरला. पुढे पाऊस इतका वाढला की, गाडीतून आता उतरताच येणार नाही असं आम्हाला दिसून आलं. डोंगर उतारावर सगळीकडे लवासाची बांधलेली घरं ,पण हालचाल कुठेच दिसत नव्हती .शेवटी आम्ही लवासाच्या रस्त्यावरून दोन-तीन फेऱ्या मारल्या. गाडीत बसूनच चहा पिण्याचा स्वर्गसुख अनुभवलं! एकीकडे पावसाची मजा वाटत होती तर दुसरीकडे आपण बाहेर उतरून फिरू शकत नाहीये याचं वाईट वाटत होतं! पण निसर्गापुढे आपलं काही चालत नाही!
आता रस्त्यावर पाण्याचे प्रवाह मोठे दिसत होते.बाहेर गार वारा सुटला होता, पण जाऊ दे काय व्हायचं ते होऊ दे, अशा विचारांने पावसाचा आनंद घेत होतो. पाऊस जरासा थांबला. खिडकीच्या काचा उघडल्या. तेव्हा एका झाडाखाली लहानशा खोपटा जवळ एक मुलगी कणसे विकत बसली होती.शेजारी छोट्याशा पाटीत निखारे फुलवून ती कणसं भाजत होती अर्थातच त्या तिथे आम्ही थांबलो. शाळेत जाणारी ती मुलगी सुट्टी असल्याने कणसं भाजून विकत होती. ती घेतली. कणसाचा आस्वाद घेत पुढे चाललो आणि भज्याची गाडी दिसली.
भजी खाण्याचा आनंद घेतला आणि पुण्याकडे परतलो. जसे पुण्याकडे येऊ लागलो होतो, तस तसे वातावरण शहरी झाले. लवासाच्या ट्रीप मध्ये दिसलेला निसर्ग मनाच्या कोपऱ्यामध्ये ठेवून आम्ही पुन्हा एकदा शहरातील पावसाकडे परतलो. आठवणींचा एक पाऊस असा होता!
हे अनुभवतानाच लहानपणचे अनेक आठवणींचे पाऊस माझ्या मनामध्ये रिमझिम करू लागले! रत्नागिरीत असताना पाऊस भरपूर! शाळा जवळ असली तरी छत्री, रेनकोट घ्यावा लागतच असे. शाळेत असताना शाळेच्या मैदानावरच छत्री उलटली आणि नखशिखांत भिजत घरी यावे लागले. त्यानंतर मात्र लाल, निळा आणि हिरवा असे तिरंगी रेनकोट घालून आम्ही तिघी मैत्रिणी पावसातून घरी येत असू ती ओली आठवण आली की अजूनही डोळ्यासमोर धूसर असे शाळेचे ग्राउंड दिसायला लागते!
कॉलेजच्या काळात घाटावर सांगली सारख्या शहरात आले आणि पावसाची मजा कमी झाली.
रस्ते अगदी घाण करणारा तो पाऊस झिमझिमत आला की अजिबात आवडत नसे, कारण कोकणात कितीही पाऊस पडला तरी तो डोंगर उतारावरून आलेला पाऊस क्षणात रस्ता कोरडा करत असे. पण घाटावर मात्र रस्त्यावर अगदी रपरपाट होत असे! पण घाटावरचा वळवाचा पाऊस मात्र खूप आवडला, कारण त्या पावसात गारा वेचत भिजायला मिळाले आणि गारांची एक ओली आठवण मनामध्ये रुतून बसली !
पण खरी मजा आली ती लग्नानंतर प्रथमच कोयना नगरच्या डॅम वर पावसात फिरताना! त्यावेळी डॅम वर जाण्यासाठी फारशी परवानगी लागत नसे त्यामुळे आम्ही छत्र्या हातात घेऊन डॅमवरून चालत फिरत होतो. नव्या नवलाईच लग्न आणि पावसातून फिरताना होणारा त्यांचा ओला स्पर्श, चाळीस-पंचेचाळीस वर्ष होत आली तरी ती ओली आठवण विसरू म्हणता विसरत नाही!
संसारात मुलांच्या आगमनानंतर मात्र हे पाऊस प्रेम थोडं कमी करावं लागलं! पावसात भिजलं की होणारे परिणाम स्वतःबरोबर सर्वांनाच भोगावे लागत! पण अजूनही पाऊस आला की गरमागरम भजी करण्याचे स्वप्न डोळ्यासमोर येते.
आभाळात ढग दिसू लागले की, रानात मोर नाचू लागतात, तसं पहिला पाऊस आला की माझ्या मनमोराचा पिसारा फुलून येतो! या पहिल्या पावसाला भज्यांचा नैवेद्य दाखवावा लागतो. उन्हाळ्याच्या दाहकतेनंतर येणारा पाऊस हा प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या आठवणींची उजळणी करणारा असतो असं मला वाटतं! मंगेश पाडगावकर दरवर्षी पावसाच्या सुरुवातीला ‘लिज्जत’ पापडाच्या जाहिरातीत पावसाचे एखादे गाणे लिहीत! ती पावसाची गाणी वाचत आपण मोठे झालो. सर्व ऋतूंचे आगमन हे जरी आपापल्या परीने आल्हाददायक असले तरी पाऊस हा त्यात खूप महत्त्वाचा आहे!
27 नक्षत्रातील नऊ गेली तर किती उरली? असं कोडं आम्ही लहानपणी घालत असू. नऊ नक्षत्रे पावसाची गेली तर उरली किती? शून्य असं उत्तर असे. असा हा पाऊस! ओल्या आठवणींच्या पाऊसगारा वेचताना किती वेचू अन् किती नको असे होते! पण शेवटी गारच ती! जमिनीवर पडली की काही वेळातच ती विरघळते! तसं माझ्या मनात होतं!” ओल्या आठवणी” वेचता वेचता मन किती आणि कुठे भरकटत जातं कळतच नाही!