आयुष्याच्या उतरंडी मधली,
किती गाडगी मडकी उरली!
मोजून दिली ‘त्या’ कुंभाराने,
किती दिली अन् कशी रचली!
जन्माला येतानाच मृत्तिका,
घेऊन आली तिचे काही गुण!
फिरता गारा चाका वरती,
आकारा येई तिचे हे रांजण!
आयुष्याच्या भट्टीमध्ये,
भाजून निघते पक्के मडके!
असेल जरी ते मनाजोगते,
कधी लहान तर कधी मोठे!
मंद आच ही आता होईल,
वाटे शांत होईल ही भट्टी!
एक एक मडके सरतच जाई,
हाती राहील त्याची गट्टी!
नकळत कधीतरी संपून जाईल,
उरात भरली ही आग!
शांत मना सह निघून जाईल,
मडक्यांची ही सारी रांग !
बनले मडके ज्या मातीचे,
त्यातच तिचा असेल शेवट!
मिसळून जाईल मातीत माती,
ती तर असेल त्याचीच भेट!