शिक्षण संपले आणि अरुंधती पुण्यात नोकरीच्या शोधात आली.तिने इकाॅनाॅमिक्स विषय घेऊन बी ए पूर्ण केले होते. काॅम्प्युटरचा कोर्स ही केला होता. तिला नोकरी करत करत पुढे शिकायचे होते. एम बी ए करायची तिची इच्छा होती.त्यासाठी ती गावाकडून पुण्याला आली. तेव्हा एवढ्या मोठ्या शहरात आपला कसा निभाव लागेल अशीच भीती तिला वाटत होती. तिचे गाव फार मोठे शहर नव्हते, पण कॉलेज शिक्षणाची सुविधा होती. अरुंधतीचे शाळा, कॉलेजचे शिक्षण गावातच झाले.
शाळेत असतानाही अरुंधती अभ्यासात हुशार तसेच इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये सगळ्यात पुढे असे .दिसायला खूप सुंदर नसली तरी तिचा चेहरा तरतरीत प्रसन्न असा होता. प्रत्येकाला ती एक आदर्श मुलगी वाटत असे.बी ए पूर्ण झाल्यावर अरुंधती पुण्यात आली. सुदैवानं २/३ इंटरव्ह्यू दिल्यानंतर तिला एका ठिकाणी नोकरीचा काॅल आला. नोकरीसाठी ती एका वुमेन्स होस्टेलवर राहत होती.
तिचा रोजचा दिनक्रम ठरलेला असे. सकाळी उठले की रूमवर चहा घ्यायचा. आपलं आवरायचे.. जाता जाता मेस मध्ये जेवण करायचे आणि कामाला जायचे. संध्याकाळी परत आले की मेल बॉक्स बघायचा घरचे, मैत्रिणीचे, किंवा कामासंदर्भात काही पत्र आहे का ते बघायचं आणि रूमवर यायचे.
अरुंधती चे कुटुंब लहानसेच होते. आई, ती आणि तिच्या पाठचा भाऊ. वडील लवकर गेल्याने अरुंधतीवर नकळतच जबाबदारी पडली होती. आई नोकरी करत होती, तोपर्यंत काळजी नव्हती. पण अचानक आईचे आजारपण उद्भवले. तिला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला. त्यामुळे दवाखान्याचा खर्च, घरातील खर्च वाढला. आईची तब्येत ठीक नसल्यामुळे तिने निवृत्ती घेतली.
तरी पेन्शनचा आधार होता. त्यानंतर अरुंधतीने नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. पाठचा भाऊ इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये शिकत होता.त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तरी अरुंधतीला तिचा स्वतःचा काही विचार करता येणार नव्हता. तसं 26/ 27 वय म्हणजे ती फार काही मोठी नव्हती. अलीकडच्या काळात तीशी पर्यंत मुलींची लग्न होतच असतात. आता तर नोकरी करत करत तिचे एम बी ए चे वर्ष ही पूर्ण झाले होते. एमबीए झाले की तिला प्रमोशन ही मिळाले असते आणि पगारही वाढला असता! तिची स्वप्नांची मालिका इथपर्यंत येऊनच थांबत होती!
एक दिवस मेल बॉक्स मध्ये एक पत्र तिला मिळालं! त्या पत्राचा चेहरा मोहरा अपरिचित होता. म्हणजे नेहमीच्या व्यक्तीकडून येणाऱ्यापैकी ते खचितच नव्हतं.. पत्त्याच्या जागी नुसतेच आडनाव लिहिले होते आणि बाकीचा पत्ताही अंदाजे लिहिला होता. अक्षर निराळे होते. पत्र हातात घेतल्यावरच ते अनोळखी अपरिचित असल्याचे जाणवले. पत्र ही एक कागदी निर्जीव वस्तू असते पण ते उलगडण्यापूर्वीच त्यात असणाऱ्या मजकुराशी आपले मन उत्सुकतेने बांधले जाते.
ते हातात उचलताना एक संवाद मूकपणे आपोआपच घडतो. नुसती घडी मोडत असतानाच अनेक प्रश्न, कल्पना, अंदाज, तर्क यांची गर्दी मनात उसळते! अरूंधतीचेही तसेच झाले.. कुणाचं असेल हे पत्र! ती रूमवर आली, काही उत्सुकतेने तिने ते पत्र उघडले. ते पत्र होते एका अनोळख्या व्यक्तीचे! पत्रामधील व्यक्ती अरुंधती ला पहात होती, तिचे निरीक्षण करत होती, प्रत्यक्ष ओळख नव्हती तरी त्याने तिच्याबद्दल बरीच माहिती जमवली आहे असे दिसत होते.
कधी कशाच्या अधेमध्ये नसणारी ही सरळ मार्गी मुलगी आहे हे त्याने ओळखले होते. अरुंधतीच्या लक्षात आले की, ही व्यक्ती बहुतेक आपल्या जवळपास राहणारी आहे आणि आपले निरीक्षण करीत असावी. त्या पत्रात त्याने स्वतःची माहितीही दिली होती. प्रशांत सबनीस, शिक्षण बी. ई. पुण्यातील चांगल्या कंपनीत नोकरी, मूळ गाव बार्शी, आई वडील आणि एक बहीण गावाकडे राहतात, शेती आणि घर आहे, त्यांनी ही सर्व माहिती देऊन शेवटी लिहिले होते की तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर संपर्क साधा.. अरुंधतीला हे सर्व वाचून धक्काच बसला आत्तापर्यंत सरळ चाललेल्या आयुष्यात हे कोणते वळण असावे तिला कळेना!
तिला फारशा मैत्रिणीही नव्हत्या की ज्यांच्याशी ते शेअर करू शकेल! तरीही इथे आल्यावर कंपनीतील जान्हवीशी तिची वेव्ह लेंग्थ चांगली जुळली होती. जान्हवी ही अशीच हुशार, गावाकडून आलेली, शिकलेली चांगली मुलगी होती. उद्या आपण तिच्याशी बोलूया, असा अरुंधतीने विचार केला. रात्री तिला झोप लागेना !हाच असेल का आपला परीकथेतील राजकुमार? प्रत्येक तरुण मुलीला पडते तसेच स्वप्न अरुंधतीला पडले!
दुसरा दिवस कधी उजाडतो आणि जान्हवी शी मन मोकळं करतो असं तिला झालं! दुसऱ्या दिवशी कॉफी टाईम मध्ये तिने जान्हवी ला हे सर्व सांगितले. जान्हवीची पहिली प्रतिक्रिया आली की ‘हे पुणे आहे, इथे असे फसवणारे ही बरेच असतात. लगेच हुरळून जाऊ नकोस, हे सर्व खरे आहे की खोटे याची शहानिशा केली पाहिजे ना?’अरुंधतीलाही तसेच वाटत होते. आता जान्हवीची मदत घेऊन हा प्रश्न सोडवायला हवा होता.
जान्हवी सोलापूर कडची होती. तिने त्याचा पत्ता वगैरे घेऊन त्याचा शोध लावायचे मनावर घेतले. अरुंधतीला ‘आठ दहा दिवसात तुला नक्की काय ते सांगते’ असं जान्हवीने आश्वासन दिले! अरुंधती रोजच्याप्रमाणे नोकरीसाठी जात येत होती. ती व्यक्ती कशी असेल, कोण असेल यासंबंधी अरुंधती अंदाज घेत होती. पण तिच्या पाठलागवर कोणी दिसले नव्हते तिला ! मात्र ती घरी येण्याच्या वेळी एक जण रोज कोपऱ्यावर उभा असलेला दिसत असे. पण इकडे तिकडे फारसे बघण्याचा अरुंधतीचा स्वभाव नव्हता. लक्ष दिले नाही.
चार आठ दिवसातच जान्हवी ने त्या व्यक्तीची खरी माहिती काढून अरुंधतीला दिली. तो माणूस असाच सुशिक्षित असलेला पण लफंगा होता. मुलींना जाळ्यात ओढणे, स्वतः सुशिक्षित पणाचा बुरखा पांघरून अलगद जाळे टाकणारा असा होता. अनेक मुलींना त्याने फसवले होते. जान्हवी ला हे कळल्यावर अरुंधतीला सावध राहण्याचा सल्ला दिला. अरुंधती वाचली पण तिच्या मनात आलं,’ ‘सुदैवाने आपल्याला हे लवकर कळले, पण त्याला याचा धडा शिकवलाच पाहिजे’.
त्याला रिस्पॉन्स देण्याचे नाटक केले. गोड गोड बोलून त्याची सर्व माहिती रेकॉर्ड केली आणि योग्य वेळ येताच त्याला साक्षी पुराव्यासह पोलिसांच्या ताब्यात दिले. समाजातील अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांना धैर्याने आणि सावध पणाने तोंड दिले पाहिजे, जे अरुंधतीने केले होते. तिच्या या कामाचे पोलीस खात्याकडून कौतुक केले गेले. अरूंधती सारख्या तरूणींची समाजात आता गरज आहे.सुशिक्षित बेकारी मुळे ही असे अनेक तरूण वाईट मार्गाला लागतात.फसवणूक करतात, अशा गोष्टीना आपणच आळा घातला पाहिजे हे मुलींना कळले पाहिजे, हाच धडा यातून मिळतो ना!