गेली अनाथांची माय
करून पोरके साऱ्यास
कशी रोखावी डोळ्यात
ह्या आसवांची तळी
माय फिरते जगात
परी लक्ष सर्व पिल्लांवर
घाली पाखर मायेची
जशी दुधाची ती साय
पिल्लू शोधे रानोमाळ
तिच्या ममतेची सय
नाही दिसे कुठे सावली
कशी कुठे हरवली माय
आपल्या चोचीतला घास
भरवे सगळ्या पिल्लाना
देण्या ममतेची ऊब
सोडी आपल्या पिल्लाला
किती बाळांची ही माय
आज पहुडली शांत
परी पिल्लांच्या मनात
भरून राहिला आकांत
आता कोण घेईल जवळ
साऱ्या पोरक्या पिल्लाना
स्वतः पांघरून ऊन
देईल सावली त्यांना
किती आठवणींचा माळ
तुडवून लेक आली
तुझ्या मायेच्या उबेसाठी
आज झाली ती पारखी..
कशी काढावी समजूत
कसे करावे सांत्वन
कोण देई आता तिला
आपल्या बोटाचा आधार
आले अंधारून अवेळी
दिशा झाकोळल्या दाही
आज त्या मायेसाठी नभ
जणू कोसळे अवकाळी