संध्याकाळी शाळेतून आल्यावर मला आमच्या झोपडीत एक विचित्र शांतता असल्याची जाणीव झाली. दिवसभराच्या कामातून घरी आलेली आई आज कधी नव्हे ते ताईवर तोंडसुख घेत होती. बोलताना मात्र डोळ्यांतून धारा वाहत होत्या. ताईला आज तिच्या कामाचे पैसे मिळणार आहेत हे आईला ठाऊक होते आणि ती त्याच बद्दल ताईस विचारत होती. पण आईचा चाललेला त्रागा तिच्यापर्यंत पोचत होता की नाही हे मलाच काय, पण आईलासुद्धा कळत नव्हतं. उद्यावर आलेला दसऱ्याचा दिवस कसा घालवायचा ह्याचं मोठ्ठ प्रश्नचिन्ह आईसमोर होतं. ताई तिच्या कामाचे पैसे मिळाल्याचं सांगत होती पण त्या पैशाचं तिनं काय केलं ह्या बद्दल काहीच बोलत नव्हती. त्याच मुळे आईच्या रागाचा पारा वर चढत होता. ताई मात्र ढिम्म. आता मलाही ताईचा खूप राग आला आणि मी काही बोलणार इतक्यात ताई उठून बाहेर पडली. आई इतकी अगतिक झालेली मी पहिल्यांदाच पहात होतो. उद्याचा दसरा कसा काढायचा ह्याची चिंता तिला होती. ती रात्र मी आणि आईने पाण्याबरोबर कोरडी काढली. कदाचित ताईने सुद्धा…
दुसऱ्या दिवशी दसऱ्याचा सण आणि घरात सुतकी वातावरण. आई गप्प आणि ताई घुम्यासारखी. मी ताईवर भयंकर चिडलो होतो. ती मात्र काल मिळालेल्या पैश्याचं काय केलं हे अजूनही सांगायला तयार नव्हती.आईची धुसपूस ताईच्या कालपासूनच्या काहीच न बोलण्यामुळे होत होती. जेवणाच्या वेळेआधी मात्र ताई अचानक उठली आणि घरात असलेल्या अडगळीच्या जागेतून एक डबा घेऊन आली. तिने तो डबा न बोलता आईच्या हातात दिला आणि शांतपणे बाजूला झाली. आई गोंधळलेल्या नजरेने तो डबा आणि शांतपणे समोर उभ्या असलेल्या ताईकडे आळीपाळीने पहात होती. शेवटी मीच आईच्या हातातून डबा घेतला आणि उघडला. विस्फारलेल्या नजरेने आईपुढे उघडलेला डबा धरला. आईचे डोळे सुद्धा विस्फारले. त्याच अवस्थेत तिने ताईकडे बघितलं आणि कालपासून गप्प असलेली ताई बोलती झाली. ती म्हणाली “ काल मी तुझं आणि सावकारीण बाईंचं बोलणं ऐकलं. तुला पैसे मिळाले नाहीत हे मला कळलं होतं आणि म्हणूनच तुला न सांगता मी हे सगळं केलं ते फक्त आजचा दसऱ्याचा सण गोड व्हावा म्हणून.”… आईने डबा माझ्याकडे दिला आणि ताईला आपल्या जवळ ओढलं. त्या डब्यात ताईने खास आजच्या सणासाठी बेसनाचे लाडू केले होते. आईचे डोळे पुसत ती म्हणाली ,” आई…! उद्या दसरा आहे हे मला माहित होतं आणि तुझे हक्काचे पैसे मिळालेले नाहीत हे सुद्धा कळलं होतं. म्हणूनच मी तुला न सांगता हे बेसनाचे लाडू केले आणि हे त्या रुपयातले थोडेसे उरलेले काही पैसे, घे आणि ठेव तुझ्याकडे.” आई आश्चर्याने ताई कडे बघतच राहिली. “ अगं ताई… ! तू हे कालच कां बोलली नाहीस? मी किती नको नको ते बोलले तुला..?” आई कळवळली. ताई फक्त हसली आणि म्हणाली, “ आई… कालच सगळं सांगितलं असतं तर आजचा दसऱ्याचा सण इतका गोड झाला असता का?” आईने ताईला कुशीत ओढली आणि बरोबर मलाही. ती हमसून रडू लागली. आता मात्र ताईने आईला सावरलं. बेसनाचे लाडू न खाताच आज आमच्या तिघांचीही पोटं भरली होती. दसऱ्याचा सण साजरा झाला होता. आनंदाचा गोडवा कायमच रहाणार होता.
सहजच एक विचार डोक्यात आला … आईत ताई असते की नाही हे मला माहित नाही. नक्कीच असेल. पण,ताईत आई असते हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. बाबा नसतानाही गरीब परिस्थितीत ताई खंबीरपणे नुसती आईच्या पाठीशीच उभी नव्हती तर मलाही परिस्थिती नुसार विचार करायला शिकवून आणि घडवून तिने ताठ मानेने ह्या जगात उभं केलं. केवळ ताईमुळेच आज आमची परिस्थिती खूपच चांगली आहे हे निर्विवाद सत्य मी आणि माझ्या पत्नीने कायम हृदयात जपून ठेवलं आहे. आम्ही दोघे आणि ताई नेहमीच आईच्या सेवेत हजर आहोत. जगाची दृष्ट लागण्या इतकं ताईला मिळालेलं सासर ही तर आईच्या सुखाची परिसीमाच. आजही वर्षानुवर्षे ताई दसऱ्याला सहकुटुंब आमच्याकडे येते आणि आजही आमचा दसरा ताईच्याच हातचे बेसनाचे लाडू खाऊनच साजरा होतो. नेहमीच कठीण परिस्थितीवर खंबीरपणे मात करण्याच्या कौशल्यामुळे आजही आईच्या डोळ्यात ताईबद्दल अपार कौतुक दिसतं आणि…
केवळ लेकीमुळेच त्यावेळी घराच्या उंबऱ्याबाहेर आमच्या गरीब आणि दरिद्री परिस्थितीने केलेले ‘ सीमोल्लंघन ‘ हीच खरी दसऱ्याला लुटलेल्या आपट्याच्या पानांची सोनेरी झळाळी मला आणि आईला आजही प्रकर्षाने जाणवते. अगदी दरवर्षी … प्रत्येक दसऱ्याला.