” हं सांगा मला काय काय आणायचं ते,मी घेऊन येतो” बापुसाहेब तयार होऊन सरलाताईंना म्हणाले
“अहो तुम्ही राहू द्या.वसंताला पाठवते मी”
“आम्हांला तरी कोणतं काम आहे?द्या ती लिस्ट आमच्याकडे”
“वसंताला घेऊन तरी जा सोबत “
“नको नको.तुमच्या मदतीला राहू द्या”
सरलाताईंनी थोड्या नाखुषीनेच सामानाची यादी त्यांना दिली.बापुसाहेब घराबाहेर पडले.सरलाताई त्यांच्या पाठमोऱ्या आक्रुतीकडे पहात राहिल्या.एवढा मोठा माणूस,आज भाजी आणि किराणा आणण्यासारख्या क्षुल्लक कामांसाठी बाहेर पडावा हे त्यांच्या मनाला पटत नव्हतं.
आज दसऱ्यानिमित्त ड्रायव्हरला सुटी दिली असल्याने बापुसाहेबांनी स्वतःच गाडी काढली आणि ते बाजाराकडे निघाले.आज दसऱ्याचा बाजार तुडूंब भरला होता.एका गल्लीत गाडी पार्क करुन ते बाजारात शिरले.त्यांना आपल्या तरुणपणाची आठवण झाली. दसऱ्याच्या दिवशी ते असेच भाजीबाजारात येऊन खरेदी करायचे.सोबत मुलं असली की अजुनच मजा यायची.त्यांचे प्रश्न आणि मागण्या यांचा भडीमार असायचा.
“एकट्याने खरेदी करण्यात मजा नाही” ते मनाशीच पुटपुटले.मग त्यांनी भरपूर भाज्या,झेंडूची फुलं खरेदी केली.एका किराणा दुकानात जाऊन सरलाताईंनी लिहून दिलेल्या वस्तू खरेदी केल्या.स्वीट मार्टमध्ये जाऊन त्यांचे आवडीचे मोतीचुरचे लाडू आणि संध्याकाळी भेटायला येणाऱ्यांसाठी पेढे घेतले.लहान मुलांसाठी चाँकलेट्स घेऊन ते घरी आले.पिशव्या भरभरुन त्यांनी आणलेला बाजार पाहून सरलाताईंना आनंदही झाला आणि आश्चर्यही वाटलं.
“अहो इतक्या भाज्या?घरात आपण इनमीन दोन माणसं!कधी संपणार हे?”
“असू द्या हो.आज इतक्या वर्षांनी बाजारात गेलो.इतक्या ताज्या हिरव्यागार भाज्या पाहून मोह आवरला नाही.”
सरलाताईं मनाशीच हसल्या.आपल्या नवऱ्याने असं सामान्य माणसासारखं वागलेलं पाहून त्यांना समाधान वाटलं.
विश्वासराव शिंदे उर्फ बापुसाहेब म्हणजे जिल्ह्यातलं मोठं प्रस्थ.एका सहकारी बँकेचे चेअरमन.बापुसाहेब या नावानेच ते प्रसिद्ध होते.जिल्ह्यात कोणत्याही पक्षाची सत्ता येवो बँकेत मात्र विश्वासरावांचंच पँनल जिंकून यायचं.पँनलमध्ये इतर सदस्य कोण आहेत याचं बँकेच्या सभासदांना काहिही देणघेणं नसायचं.त्यात बापुसाहेब आहेत म्हणजे झालं इतकी लोकप्रियता बापुसाहेबांची होती.बापुसाहेबांचं संघटन कौशल्य वादातीत होतं.कोणत्या माणसाला कसं ताब्यात ठेवायचं हे त्यांना माहित होतं.अगोदर फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली त्यांची बँक जिल्ह्याच्या खेड्यापाड्यात पोहोचली होती.प्रत्येक शाखा आधुनिक होती आणि जवळजवळ प्रत्येक गावात बँकेचं एटीएम होतं.या सर्वामागे बापुसाहेबांचं अफाट कर्तृत्व होतं.जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षाच्या आमदार,खासदारापासून ते खेड्यापाड्यातल्या गरीब शेतकऱ्यापर्यत सगळ्यांशी बापुसाहेबांचे प्रेमाचे संबंध होते.कर्जवाटपात जशी बँक जिल्ह्यात अव्वल होती तशीच कर्जफेडीतही आघाडीवर होती.बँकेचा एनपीए अतिशय कमी होता.कारभार तर इतका पारदर्शी होता की रस्त्यावरच्या माणसाने जरी चौकशी केली तरी त्याला एकही चुक दिसू नये.बँकेतला भ्रष्टाचार म्हणजे फक्त चहापाणी करणं किंवा खुप झालं तर सगळ्या स्टाफला पेढे वाटणं.बापुसाहेबांची लोकप्रियता बघून त्यांना बऱ्याचदा राजकीय पक्षाकडून लोकसभा,विधानसभा निवडणूक लढायच्या आँफर्स यायच्या.पण बापुसाहेबांना बँकेला निवडणूकीचा आखाडा बनवायचं नव्हतं किंवा बँकेच्या कारभारात राजकीय पक्षांना शिरुही द्यायचं नव्हतं.ते स्वतः जन्मजात गर्भश्रीमंत होते.गावाकडे प्रचंड शेती होती.शहरात दोन थ्री स्टार हाँटेल्स होती.वडिलांच्या नावाचं एक इंजीनियरींग काँलेज होतं.मुलीचं लग्न होऊन ती जर्मनीत स्थायिक झाली होती.मुलगाही साँफ्टवेअर इंजीनियर होऊन हैदराबादला एका मल्टीनँशनल कंपनीत नोकरी करत होता.त्याची बायकोही डाँक्टर होती.बापुसाहेबांनी एक नवरा म्हणून आणि एक बाप म्हणून त्यांची सर्व कर्तव्य पार पाडली होती. त्यात ते समाधानी होते.बँकेसोबतच बापुसाहेब किमान डझनभर संस्थांचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या कुशल नेत्रुत्वामुळे सर्वच संस्था भरभराटीला आल्या होत्या.
असं म्हणतात की हवा फिरायला आणि नशीब बदलायला वेळ लागत नाही.यावेळी बँकेच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या तसं बँकेतलं वातावरणही बदललं.संचालक मंडळातल्या तरुण संचालकांच्या महत्वाकांक्षा जाग्रुत होऊ लागल्या.अनेक वर्षांपासून सत्ता भोगणाऱ्या बापुसाहेबांनी आता तरुणाईला संधी द्यावी असं खाजगीत बोललं जाऊ लागलं.पण इतक्या मेहनतीने डबघाईला आलेली बँक उत्कर्षाला आणलेले बापूसाहेब सहजासहजी पद सोडणार नव्हते.त्यांना निवडणुकीत हरवणंही कठीण होतं.ही गोष्ट माहित असणाऱ्या संचालकांनी नको ती गोष्ट केली आणि राजकीय पक्षाची बँकेत एंट्री करुन दिली.बापुसाहेबांचे सगळ्याच राजकीय पक्षांशी चांगले संबंध असले तरी बँकेच्या व्यवहारांपासून बापुसाहेबांनी त्यांना दुरच ठेवलं होतं हीच गोष्ट या पक्षांना खटकत होती.तर बऱ्याच संचालकांना बापुसाहेबांचं "मी खाणार नाही आणि कुणाला खाऊ देणार नाही"हे तत्व खटकत होतं.बापुसाहेबांना खाली खेचायचे प्लँन्स शिजू लागले.संचालक मंडळातल्या सदस्यांची चाचपणी सुरु झाली.बापुसाहेबांबद्दल कुणाची तक्रार नसली तरी बदल सगळ्यांनाच हवा होता.मग बापुसाहेबांच्या सर्वात विश्वासू संचालकाला फोडण्यात आलं.चेअरमनपदाची लालुच त्याला देण्यात आली. एवढ्या मोठ्या बँकेचं चेअरमनपद कुणाला नको होतं?त्यात आपल्या महाराष्ट्राला विश्वासघाताची फार मोठी परंपरा लाभलेली.मासा अगदी सहजासहजी गळाला लागला.गुप्त बैठक झाली.बाकीच्या संचालकांनी भावी चेअरमनकडून आपल्याला सोयीचे,कमाईचे विभाग मागून घेतले.बापुसाहेबांना काहीतरी घडतंय याची कुणकुण लागली होतीच पण प्रत्येक निवडणुकीच्या वेळी असंतुष्ट, महत्वाकांक्षी, दुखावलेले लोक अडचणी निर्माण करतातच हे त्यांना माहित होतं.आपल्याच गटातली माणसं आपल्याविरुद्ध कारस्थानं करताहेत याची मात्र त्यांना कल्पना नव्हती.निवडणूक झाली.अपेक्षेनुसार विरोधी पँनल भुईसपाट झालं आणि बापुसाहेबांचं पँनल सर्वच जागा मिळवून विजयी झालं.पदाधिकारी आणि संचालक मंडळ निवडण्यासाठी सभा झाली.सभेच्या सुरुवातीलाच ठरल्यानुसार बहुतेक जणांनी "आता वयस्कर सदस्यांनी थांबावं आणि तरुण रक्ताला संधी द्यावी"असा सुर आळवायला सुरुवात केली.सगळ्या पदांसाठी निवड झाल्यावर चेअरमनपदासाठी उत्सुक असणाऱ्या चार जणांची नांव घेण्यात आली.ही बँकेची पध्दतच होती.त्यात हरकत घेण्यासारखं काही नव्हतं.त्याच वेळी एक सदस्य उभा राहिला आणि म्हणाला
“मला वाटतं बापुसाहेबांनी गेली पंधरा वर्ष या बँकेचं चेअरमनपद भुषवलं आहे आणि बँकेला फार मोठ्या उंचीवर पोहोचवलं आहे.त्यांच्याबद्दल आम्हांला नितांत आदर आहे.पण जशी मागणी होतेय यावेळी त्यांनी तरुण रक्ताला संधी द्यावी.सल्लागार म्हणून त्यांचं मार्गदर्शन आम्हांला यापुढेही मिळत राहील यात शंका नाही.मी यावेळी चेअरमनपदासाठी सुधाकर देशमुखांचं नाव सुचवू इच्छितो”
बाकीच्या सदस्यांनी टाळ्या वाजवून या सुचनेचं स्वागत केलं.बापुसाहेबांना धक्का बसला.चेअरमनपदातून त्यांना वगळण्यात येईल अशी त्यांनी कधी अपेक्षाच केली नव्हती.
निवडणूक अधिकारीही अचंबित झाले.बापुसाहेबांव्यतिरिक्त कुणाचं नाव पुढे येईल असं त्यांनाही वाटलं नव्हतं कारण तसं कधी घडलंच नव्हतं.ते उभे राहिले.
“ठिक आहे.आपण बँकेच्या नियमानुसार हात उंचावून मतदान घेऊया.मी चेअरमनपदासाठी जे उत्सुक आहेत त्यांची नावं एक एक करुन घेतो”
बापुसाहेबांनाच सर्वाधिक मतदान होईल अशी त्यांना आणि बापुसाहेबांनाही अपेक्षा होती
पण अगोदरच ठरल्याप्रमाणे सगळ्यात जास्त हात सुधाकर देशमुख या नावाला वर झाले आणि बापूसाहेब हरले.सभागृहात एकच जल्लोष झाला. देशमुखांना सगळ्यांनी वर उचलून घेतलं.बापुसाहेबांचा चेहरा काळाठिक्कर पडला.सुधाकर देशमुख पुढे झाले.आपल्या भाषणांत त्यांनी सर्वांचे आभार मानले.बापुसाहेबांना संचालक मंडळात राहण्याची विनंती केली.बापुसाहेबांनी ती अर्थातच नाकारली.सर्वात विश्वासू असलेल्या सुधाकर देशमुखाने आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याची त्यांना जाणीव झाली.
विषण्ण मनाने ते घरी परतायला निघाले. बँकेसाठी त्यांनी केलेला त्याग,बँकेच्या प्रगतीसाठी झपाटल्यासारखी घेतलेली मेहनत,त्यामुळे कुटुंब, नातेवाईक,मित्र यांच्याकडे झालेलं दुर्लक्ष, शेतीची झालेली हेळसांड सगळं त्यांना आठवू लागलं.आजच्या या दगाफटक्याने हे सगळं मातीमोल करुन टाकलं होतं.
विचारा-विचारात घर कधी आलं तेच त्यांना कळलं नाही.”साहेब घर आलं.उतरताय ना?”ड्रायव्हरच्या बोलण्याने ते भानावर आले.कारचा दरवाजा उघडून ते आत शिरणार तोच ड्रायव्हरने त्यांना आवाज दिला.
“साहेब एक मिनिट”
वळून त्यांनी ड्रायव्हरकडे पाहिलं.तो पुढे आला आणि त्याने एकदम त्यांचे पाय धरले.
“अरे हे काय करतोहेस?”
” उद्यापासून मला नवीन चेअरमनसाहेबांच्या गाडीवर जावं लागेल.माझ्याकडून काही चुकलंबिकलं असेल तर माफ करा साहेब”आणि एकदम तो रडू लागला.
“काय झालं का रडतोहेस?”बापुसाहेबांनी त्या तरुण ड्रायव्हरला जवळ घेतलं
“साहेब या हरामखोरांनी तुम्हांला कट करुन बाजुला केलं.तुम्ही बँकेसाठी काय काय केलं याची कदर नाही ठेवली या नालायकांनी.साहेब आम्ही सगळे ड्रायव्हर आणि स्टाफ हे कळल्यावर खवळून गेला आहे.तुम्हांला सांगतो साहेब ,यांच्या बापाकडून ही बँक सांभाळली जाणार नाही.पहा तुम्ही पाच वर्षात यांचे काय हाल होतात ते”
बापुसाहेबांना त्याच्या भावना कळत होत्या.किंबहूना त्या सर्वच सभासदांच्या भावना होत्या.त्यांनी त्याच्या पाठीवर थोपटलं आणि म्हणाले
“बघुया.योग्य-अयोग्य काळ ठरवेलच “
ते आत गेले.उत्सुकतेने सरलाताई बाहेर आल्या.आपल्या नवऱ्याचा पडलेला चेहरा पाहून त्यांनी काय ओळखायचं ते ओळखलं.त्यांचा प्रश्नार्थक चेहरा पाहून बापुसाहेबच म्हणाले.
“आम्ही आता चेअरमन नाही राहिलो,सुधाकर देशमुख नवीन चेअरमन झाले”
बापुसाहेबांचे सर्वात विश्वासू म्हणून सरलाताई सुधाकर देशमुखांना ओळखत होत्या.त्यांना झालेल्या दगाफटक्याची कल्पना आली.अशावेळी बायका उत्तेजित होतात.नको ते प्रश्न विचारुन हैराण करतात.दगाबाजी करणाऱ्याला शिव्यांची लाखोली वाहतात.पण हे सगळं करुन काहीच साध्य होणार नाही याची सरलाताईंना जाणीव होती.त्या एवढंच म्हणाल्या
” जे होणार होतं ते झालं.तुम्ही फारसं मनावर घेऊ नका.फ्रेश व्हा.आपण जेवायला बसू”
त्या दिवसानंतर बँकेचा विषय मनातून काढून टाकायचा बापुसाहेब प्रयत्न करु लागले.वर्तमानपत्रात येणाऱ्या बँकेच्या बातम्याही वाचणं त्यांनी सोडून दिलं होतं.बँकेव्यतिरीक्तही जीवन आहे याची जाणीव त्यांना होऊ लागली.ते अजुनही त्यांच्या काँलेजचे अध्यक्ष होते.दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांची दोन हाँटेल्स फारशी चालत नव्हती.त्यांचं नुतनीकरण आवश्यक होतं.शेतीही आजकाल बेभरवंशाची झाली होती.बेरोजगारी वाढलेली असतांना कामाला मजूर मिळत नव्हते.शेतीचं उत्पन्न घटलं होतं तिकडेही लक्ष देण्याची गरज होती.बापुसाहेबांचा दिवस शेती,काँलेज,हाँटेल्स यात संपू लागला. असं म्हणतात की नियती जेव्हा एक दार बंद करते तेव्हा दुसरी दोन दारं उघडत असते.ही उघडलेली दारं फक्त आपल्या लक्षात यायला हवीत.बापुसाहेबांच्या ती लक्षात आली होती.
बापुसाहेबांचं चेअरमनपद गेलं आणि त्यांच्या जीवावर चालणाऱ्या सामाजिक संस्थाही हळूहळू बंद पडू लागल्या.त्यांच्या समाजाची संस्था बापुसाहेबांनी म्रुतावस्थेतून पुनर्जीवित केली होती.संस्थेचे अनेक कार्यक्रम बँकेच्या प्रायोजकत्वावर चालायचे.बापुसाहेबांचं चेअरमनपद गेल्यावर बँकेने त्यांना प्रायोजकत्व देणं बंद केलं.संस्थेच्या संचालकांमध्ये दुसरीकडून प्रायोजकत्व मिळवण्याची धमक नव्हती.संस्थेचे कार्यक्रम बंद पडले.याचा ठपका संचालकांनी बापुसाहेबांवर ठेवला आणि त्यांना अध्यक्षपदावरुन काढून टाकलं.
एक एक संस्था हातातून जात असतांना बापुसाहेब हे सगळं निर्विकार मनाने पहात होते.वाघ जखमी झाला की त्याच्या शिकारीवर जगणारे कोल्हे वाघाची किंमत ठेवत नाहीत याचा अनुभव ते घेत होते.खोट्या मोठेपणासाठी आपण ही बांडगुळं पोसली याचा त्यांना आता पश्चाताप होत होता.
दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी बापुसाहेबांकडे
प्रचंड गर्दी असायची.बँकेचे संचालक, कर्मचारी, हाँटेल,काँलेजचा स्टाफ,सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांची नुसती रेलचेल असायची.सगळ्यांना चहा काँफी देतादेता सरलाताई थकून जायच्या.रात्री बारा वाजेपर्यंत लोकांची ये जा सुरुच असायची.आता मात्र लोकांच्या या समुद्राला ओहोटी लागली होती.मागच्या वर्षी तर बोटावर मोजण्याइतकी माणसं आली होती.नाही म्हणायला जुने विश्वासू सहकारी अजुनही यायचे पण त्यांची संख्या अतिशय कमी होती शिवाय त्यात सातत्यही नव्हतं.
काळ कुणासाठी थांबत नाही.बँक सोडून बापुसाहेबांना आता साडेचार वर्षं होत आली होती.बापुसाहेब आता चांगलेच रुळले होते.या दरम्यान त्यांच्या काँलेजला उत्कृष्ट काँलेजचा पुरस्कार मिळाला.नुतनीकरणामुळे हाँटेलचा दर्जा वाढला होता.धनाढ्य लोकांची लग्न,समारंभासाठी पहिली पसंती त्यांच्या हाँटेलला मिळू लागली.कमी पाऊस पडुनही विविध तंत्रज्ञानामुळे आणि चांगल्या नियोजनामुळे बापुसाहेबांच्या शेतीचं उत्पन्न दुप्पट झालं होतं.पुढच्या वर्षी बँकेची निवडणूक होती.आपण उभे राहिलो तर नक्कीच निवडून येवू याची बापुसाहेबांना खात्री होती मात्र बँकेचं राजकारण कोणत्या वळणावर गेलंय हे सांगता येत नव्हतं.निवडून आलो तरी विद्यमान संचालक मंडळ त्यांना चेअरमनपदाची संधी देईलच याची खात्री देता येत नव्हती.
संध्याकाळी बापुसाहेब तयारी करुन एकटेच देवीच्या मंदिरात गेले.देवीच्या पाया पडतांना ” आई भवानी या वर्षी तरी माझं चेअरमनपद मला परत मिळू दे” असं मागणं मागायची त्यांना तिव्र इच्छा झाली पण का कुणास ठाऊक, मागणं मागतांना त्यांची जीभ काही रेटली नाही.आपट्याच्या पानांचं “सोनं”घेऊन ते परतले.सरलाताईंनी नेहमीप्रमाणेच घर छान सजवलं होतं.अंगणात सुंदरशी रांगोळी काढली होती.आयुष्यात प्रथमच बापुसाहेबांनी ती रांगोळी निरखुन पाहिली.त्यांना ती फार आवडली.घरात आल्यावर ते सरलाताईंना म्हणाले देखील.
“व्वा फार सुंदर रांगोळी काढलीये आणि घरही छान सजवलंय”
सरलाताई हसल्या
“अहो त्यात नवल ते काय?दर दसऱ्याला असंच असतं आपलं घर.यावर्षी तुम्ही लक्ष देऊन पाहिलं म्हणून तुम्हांला ते जाणवतंय”
लग्न होऊन आता तीस वर्षं लोटली होती आणि बायकोतल्या कलागुणांची आपल्याला आता ओळख व्हावी याची बापुसाहेबांना खंत वाटली.
हळुहळू काँलनीतले रहिवासी, काँलेज,हाँटेलचा स्टाफ सोनं द्यायला घरी येऊ लागले.इतक्या फुरसतीने बापुसाहेब त्यांच्याशी पहिल्यांदाच गप्पा मारत होते.मग नातेवाईकांची येजा सुरु झाली. बापुसाहेबांचं चेअरमनपद जाऊन आता चार वर्ष झाली होती तरीसुध्दा “बापुसाहेब तुम्ही आता चेअरमन नाही ना?परत कधी आहेत निवडणुका?परत चेअरमन व्हायचे तुमचे चान्सेस किती आहेत?”असे प्रश्न वारंवार विचारुन जखमांवर मीठ चोळण्याचे प्रकार चालुच होते.चेअरमन असतांना बापुसाहेबांचे वारंवार वर्तमानपत्रात झळकणारे फोटो,बातम्या पाहून कुणी कौतुक केल्याचं बापुसाहेबांना आठवत नव्हतं.ते प्रश्न ऐकून संताप येत असतांना देखील बापुसाहेब हलकसं हसून टोलवाटोलवी करत होते.तुमचं उत्तम चालू असतांना कुणाला त्यात इंटरेस्ट नसतो पण थोडंसं काही वाईट होऊ द्या, चांभारचौकशा करुन उपदेशाचे डोस पाजण्यात नातेवाईकांना असुरी आनंद मिळत असतो हे त्यांना माहीत होतं.
साडेनऊ झाले.आता कुणी येणार नाही या विचाराने सरलाताई स्वयंपाक करायला किचनमध्ये गेल्या.तेवढ्यात बाहेर दोनतीन गाड्या पाठोपाठ उभ्या राहिल्याचा आणि त्यानंतर गेट उघडण्याचा आवाज आला.कोण आलं या विचारात असतांनाच मंडळी आत आली.
“येऊ का आत बापुसाहेब?”
बँकेचे २-३ संचालक आणि १०-१२ अधिकारी आल्याचं पाहून बापुसाहेबांना आश्चर्य वाटलं.
“या या बसा” असं म्हणून बापुसाहेब बसत नाही तोच एक संचालक त्याच्यासमोर हात जोडून उभे राहिले .
“बापुसाहेब माफ करा.आम्ही चुकलो.आता बँकेला संकटातून तुम्हीच बाहेर काढू शकता”
“संकट?कसलं संकट आलंय बँकेवर?”
“कमाल करता बापुसाहेब!पेपरमधल्या बातम्या नाही वाचल्या तुम्ही?”
दुसऱ्या संचालकाने आश्चर्याने विचारलं.
“नाही.गेली चार वर्ष मी बँकेच्या बातम्याच वाचत नाही”
“बापुसाहेब बँकेची स्थिती अतिशय नाजुक झालीये.खेड्यापाड्यातल्या बऱ्याचशा शाखा बंद पडल्याहेत.एटीएममधे खडखडाट आहे.भ्रष्टाचार बोकाळलाय.कुणी कुणाचं ऐकेनासं झालंय.मुदत ठेवींचे पैसे परत मिळत नसल्याने ठेवीदार रोज येऊन भांडणं करताहेत”
“अहो तुम्ही पण तर संचालक आहात.का नाही तुम्ही पदाधिकाऱ्यांना खडसावत?”
बापुसाहेब संतापून म्हणाले.
“अहो चेअरमनच भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालताहेत म्हंटल्यावर आम्ही तरी काय करणार?”
” आणि तुम्ही?”कर्मचारी युनियनच्या अध्यक्षाकडे पाहून बापुसाहेब म्हणाले”तुमची युनियन काय करतेय?”
“साहेब आम्ही त्यांना नोटीस दिलीये.आमचे पगार रेग्युलर झाले नाहीत तर आम्ही संपावर जाणार आहोत”
बापुसाहेबांनी कपाळावर हात मारुन घेतला
“अहो बँकेच्या भल्यासाठी कुणी काहीच करणार नाही का?बापरे फार भयंकर आहे.बँकेची केवढी बदनामी होत असेल.नाही?पण हे एवढं झालं कसं?”
“बापुसाहेब,तुम्ही निघालात आणि बऱ्याच ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढून घ्यायला सुरुवात केली.त्यात संचालक मंडळात गटबाजी सुरु झाली. कुणी कोणताही निर्णय घ्यायला लागलं.चेअरमनसाहेबांचा कुणावर वचक राहिला नाही.अधिकाऱ्यांना कुणाचे आदेश पाळायचे हे समजेनासं झालं”
क्षणभर शांतता पसरली.थोड्या वेळाने एकजण म्हणाला.
“बापुसाहेब येत्या जुलै-आँगस्टमध्ये निवडणुका आहेत.यावेळी तुम्हीच चेअरमन होणार हे नक्की. तुमच्याशिवाय पर्याय नाही बापुसाहेब”
“हो बापुसाहेब आमच्यावर दया करा आणि परत या”
“ठिक आहे.मला कळवत रहा.बघुया काय करता येईल ते”
“खुप खुप धन्यवाद बापुसाहेब”सगळे उठून बापुसाहेबांच्या पाया पडू लागले.
त्यांना निरोप देऊन बसत नाही तोच बऱ्याच संस्थांचे पदाधिकारी येऊन बसले.विषय तोच,बंद पडलेल्या किंवा निष्क्रिय झालेल्या संस्थांना सक्रीय कसं करायचं!थोड्या वेळाने त्यांच्या समाजाच्या संस्थेचे कार्यकर्ते आले.बापुसाहेबांची माफी मागून म्हणाले
“बापुसाहेब तुम्ही परत एकदा बँकेचे चेअरमन होणार अशी बातमी सध्या पसरलीये.झालं गेलं विसरुन जा.आम्ही सर्वांनी तुम्हांला परत एकदा अध्यक्ष करायचा निर्णय घेतलाय”
“सध्याच्या अध्यक्षांचं काय?”
“अहो त्यांना काय अध्यक्ष म्हणायचं?चार वर्षात एकही कार्यक्रम घेतला नाही त्यांनी.कुणाकडून शंभर रुपये आणायचीसुध्दा लायकी नाही त्यांची”
बापुसाहेब हसले.आपल्यामागेही हे असंच आपल्याबद्दल बोलत असतील याची त्यांना खात्री होती.तेवढ्यात बँकेतल्या विरोधी पँनलचे लोक आले.त्यांना पाहून बापुसाहेब आश्चर्यचकीत झाले.
“बापुसाहेब तुमच्याच विश्वासू मित्रांनी तुमच्याशी दगाबाजी केली.बघितलंत ना काय धुळधाण उडवली बँकेची.आता त्या पँनलमध्ये जाऊच नका.आमच्या पँनलमध्ये या.आपण त्यांना धडा शिकवू.यावेळी विजय आपलाच आहे.आणि हो आमचे चेअरमन तुम्हीच बरं का!”
बापुसाहेब फक्त हसत होते.
चहा पिऊन ते सगळे गेल्यावर सरलाताईंनी स्वयंपाकाला सुरुवात केली.टेबलावर ताटं घेतली तेवढ्यात दारावरची बेल वाजली.बापुसाहेबांनी स्वतःच उठून दार उघडलं.बाहेर सुधाकर देशमुख आणि चारपाच पदाधिकारी उभे होते.
“बापुसाहेब”जोरात ओरडून देशमुखांनी बापुसाहेबांना मिठी मारली आणि ते रडू लागले.त्यांच्या खोट्या रडण्याची बापुसाहेबांना गंमत वाटली.
“बापुसाहेब आमच्याकडून फार मोठा अपराध घडला.चपलांनी मारा बापुसाहेब आम्हांला पण तुमच्यापासून दुर करु नका.नको आम्हांला ते चेअरमनपद. त्याच्यावर खरा हक्क तुमचाच आहे बापुसाहेब”
बापुसाहेबांनी सगळ्यांना बसवलं.सरलाताईंनी पाणी आणलं.ते पिऊन देशमुख म्हणाले
“बापुसाहेब आम्ही असं ऐकतोय की तुम्ही विरोधी पँनलकडून निवडणूक लढवताय?”
बापुसाहेब सावध झाले. पण तोंडावर हसू आणून म्हणाले
“तसं काही नाही.त्यांच्याकडून आँफर आलीये.बघुया काय निर्णय होतो ते”
” नाही बापुसाहेब. आपल्या पुर्वीच्या मित्रांना दगा देऊ नका.आणि आम्ही म्हंटलंय ना आमचे चेअरमन तुम्हीच!करुन पाहिलं आम्ही.नाही जमलं तुमच्यासारखं.”
“हो बापुसाहेब तुमच्यासारखं कुणीच नाही” एक पदाधिकारी मध्येच तोंड खुपसत म्हणाला.
“ठिक आहे.मी तयार आहे.पण संचालक मंडळात मी माझ्याच पसंतीची माणसं घेणार.चालेल?” देशमुखांकडे पहात बापुसाहेब म्हणाले.देशमुखांसह सगळ्यांचेच चेहरे भकास दिसू लागले.सत्तेची हाव काही जात नाही हे बापुसाहेबांच्या लक्षात आलं.ते हसले.
“अहो मी गंमत करत होतो.एवढं सिरीयस होऊ नका”
त्यांनी असं म्हंटल्यावर प्रचंड हशा पिकला.सगळे त्यांच्या परत पाया पडून निघाले.
जेवणाच्या ताटावर बसल्यावर सरलाताई म्हणाल्या
“वा आज तर मजा आली.परत एकदा चेअरमन बनणार तुम्ही.खुप खुश असाल ना?”
बापुसाहेब गंभीर झाले.
“नाही सरलाजी आम्ही उलट आज सीमोल्लंघनाचा निर्णय घेतलाय.”
” सिमोल्लंघन?म्हणजे?मी नाही समजले”
“आम्ही या बँकेच्या राजकारणातून आणि समाजकारणातून निव्रुत्ती घेऊन सामान्य माणसाचं आयुष्य जगण्याचा निर्णय घेतलाय”
“काय सांगताय?अहो पण कशासाठी?आता आलीय ना संधी परत चेअरमन बनायची?ती सोडायची कशाला?”
सरलाताईंनी आश्चर्याने विचारलं.
“नाही सरलाजी,आम्हांला नाही व्हायचं चेअरमन.तुम्हीच विचार करा,इतिहासच काय अगदी रामायण,महाभारताच्या काळापासून अनेक मोठमोठे राजे,महाराजे आले आणि गेले.मुघल आले ते गेले,इंग्रज या देशातून जातील असं वाटत नव्हतं त्यांनासुद्धा जावं लागलं”
“अहो ते तर होणारच.जगात शाश्वत असं काय आहे?”
“मी तेच तर म्हणतोय.एवढ्या मोठमोठ्या सम्राटांना सत्ता सोडावी लागली.मी तर एका सहकारी बँकेचा साधा चेअरमन.मी का सत्तेची हाव करायची?या बँकेच्या कल्याणाकरता मी रक्ताचं पाणी केलं.कुटुंब, नातेवाईक, शेती,स्वतःचं सुख यांच्याकडे दुर्लक्ष केलं.तुम्ही समजदार आणि खमक्या होत्या म्हणून सगळे नातेसंबंध टिकून राहिले.मुलं चांगल्या मार्गाला लागली.एवढं सगळं करुन शेवटी मला काय मिळालं?जरा कुठे बँकेचे चांगले दिवस आले होते तर या नालायक लोकांनी सत्ता माझ्या हातातून हिसकावून घेतली आणि खड्यासारखं मला बाहेर फेकून दिलं.आज त्यांची अवस्था वाईट आहे तर माझे पाय धरताहेत”
“जगरहाटी अशीच असते बापुसाहेब. सत्ता असली की शिरजोर व्हायचं ,सत्ता गेली की लाचारी दाखवायची”
“मला वीट आलाय या स्वार्थी लोकांच्या टोळ्यांचा”
“पण मग हा तुमचा उलटा प्रवास होईल.शिखराकडून पायथ्याकडे”
“शिखरावर कोण टिकून राहिलंय आजपर्यंत सरलाजी?मोठमोठे अभिनेते,खेळाडू,पाच वर्षापुरतीचे पंतप्रधान, राष्ट्रपती सगळ्यांना याच अनुभवातून जावं लागतं”.
“पण म्हणून कुणी हातात येणारी संधी किंवा सत्ता सोडून देत नाही”
“मान्य!पण खुर्चीला किती चिकटून रहायचं,गात्रं थकलेली असतांनाही तिच्यावर बसून रहायचं की धडधडीत असतांना तिला रामराम ठोकायचा हे आपण ठरवायचं असतं.पंधरा वर्षात आपण बँकेचा एक रुपया कधी घरी आणला नाही. ती पंधरा वर्ष आम्ही बँकेला वाहून टाकली.वैयक्तिक सुख,आनंद याकडे लक्ष दिलं नाही.मागची चार वर्ष आम्ही विस्कटलेली घडी नीट बसवण्यात घालवली.आता ती घडी आम्हांला बिघडू द्यायची नाहिये.आता आम्हांला वीट आलाय या स्वार्थी,संधीसाधू राजकारणाचा.आम्ही चेअरमन नाही झालो तर काय होईल?विरोधी पँनल सत्तेवर येईल.त्यांनीही बँकेला सांभाळलं नाहीतर बँकेला टाळं लागेल.समजा आमचं काही बरंवाईट झालं असतं तर यांनी काय केलं असतं?एक अजून लक्षात घ्या सरलाजी,या जगात कुणाचं कुणावाचून अडत नाही.बँकेचंही होईल सगळं व्यवस्थित”
सरलाताई निशब्द झाल्या.बापुसाहेबांच्या विचारात तथ्य होतं.
“पण मग तुम्ही ठरवलंय तरी काय?”
“खड्डयात गेली ती बँक आणि खड्डयात गेल्या त्या संस्था.मला आता सामान्य माणसाचं आयुष्य जगायचंय.आज मी बाजारात गेलो होतो.खुप आवडलं मला तसं जगणं.खुप वर्षात आपण सहलीला गेलो नाहिये.परदेशात जायची तुमची इच्छा आहे ना?चला आपल्या मुलीकडे जर्मनीत जाऊ.तिच्या बाळांना बघून बरेच दिवस झालेत. तिथून संपूर्ण युरोप बघून येवू.आपले चिरंजीव काय म्हणताहेत?लावा बरं त्याला फोन.मला आपल्या नातीशी बोलायचंय”
“अहो आता रात्रीचे अकरा वाजलेत.झोपली असेल ती”
“असू द्या.मुलगा,सुनबाईशी बोलून घेऊ”
सरलाताईंनी मुलाला फोन लावला.मुलाशी बोलून त्या सुनेशी बोलल्या आणि एकदम ओरडून बापुसाहेबांना म्हणाल्या
“अहो आनंदाची बातमी आहे.सुनबाई गरोदर आहेत”
“काय सांगता काय?द्या फोन आम्हांला”
सुनेचं अभिनंदन करुन ते म्हणाले
“सुनबाई तुमच्या पहिल्या बाळंतपणाला आम्ही येऊ शकलो नाही.पण यावेळी तुम्ही काही काळजी करु नका.तुम्हांला सातवा महिना लागला की आम्ही दोघंही येवू.आणि तुमचं बाळंतपण झाल्यावर आमचा नातू वर्षाचा होईपर्यंत तिथंच राहू.आम्हांला आता आजोबांचं कर्तव्य पार पाडायची ओढ लागलीये”
त्यांच्या मुलाने फोन घेऊन त्यांना बँकेबद्दल विचारलं.
“आता बँकबिंक काही नाही.आता फक्त कुटुंब. आम्ही आता युरोपला जातोय.तिकडून आलो की येतोच तुमच्याकडे.आमची नात जागी आहे वाटतं.थांब जरा मी व्हिडीओ काँल करतो”
आणि मग व्हिडीओ काँल सुरु करुन ते पिटुकल्या नातीशी बोलत बसले.तिचं ते गोड बोलणं,चेहऱ्यावरचे निरागस भाव पाहून त्यांना त्यांच्या मुलांच्या बालपणाची आठवण आली.त्या आठवणीने त्यांना एकदम भरुन आलं.शेवटी आपल्या नातवांमध्येच तर आपण आपली मुलं बघत असतो.त्यांच्या डोळ्यातून अश्रू टपकू लागले.पण त्यांनी ते थांबवले नाहीत.सामान्य माणसाचं जीवन खरंच सुखद असतं याचा त्यांना प्रत्यय येऊ लागला होता.